आपण जे खातो पितो त्याचा परिणाम जसा आरोग्यावर होतो तसाच तो त्वचेवर देखील होतो. त्वचा खराब होण्याची , चांगली दिसण्याची कारणं खाण्यापिण्याच्या सवयीत दडलेली असतात. सर्व ऋतूत आपली त्वचा सुंदर आणि निरोगी राहाण्यासाठी आहारात पोषक घटकांचं संतुलन ठेवावं लागतं. त्वचा चांगली राहाण्यासाठी काय खावं प्यावं हे समजून घेणं जसं महत्त्वाचं तसंच त्वचेस हानीकारक पदार्थ कोणते हे समजून घेतले तर खाण्यापिण्याच्या चुकांमधून त्वचेचं होणारं नुकसान टळू शकतं. जे आपल्या आवडीचं असतं, सवयीचं असतं तेच त्वचेस हानिकारकही ठरु शकतं हे त्वचेसाठी अयोग्य पदार्थांची यादी वाचून वाटल्याशिवाय राहाणार नाही.
Image: Google
त्वचेस हानिकारक पदार्थ
Image: Google
1. साखर आणि साखरेचे पदार्थ
साखर , साखरेचे पदार्थ हे रोजच्या आहारात असतात आणि ते आवडतातही. जिभेला साखर जास्त आवडत असली तरी आरोग्यासाठी जशी ती घातक असते तशीच ती त्वचेसाही नुकसानदायक असते. त्वचेतला गोडवा शोषून घेण्याचं काम साखरेतला गोडवा करतो. साखरेमुळे कोलॅजन निर्मितीस अडथळा येतो. कोलॅजनमुळेच त्वचा उत्तम् राहाते. कोलॅजन निर्मितीस अडथळा आल्यास त्वचा खराब होते. त्वचा सैलसर होते. त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचेची रंध्र बंद होतात. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या श्वास घेऊ शकत नाही. त्वचेवर मुरुम पुटकुळ्या येऊन त्वचा खराब होते. त्वचा निरोगी राखण्यासाठी आहारातील साखरेचं प्रमाण कमी करावं, नियंत्रित ठेवावं असा सल्ला त्वचाविकार तज्ज्ञ देतात.
Image: Google
2. साॅल्टेड फूड
मीठ ही जीवनावश्यक बाब असली तरी मीठ हे चिमूटभर, चवेपुरतंच लागतं हे वास्तव आहे, आहारातील अति मिठामुळे हदयाशी संबंधित आजारांचा धोका असतो तसंच मिठामुळे त्वचेची हानी होते. प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड यामध्ये मीठ जास्त असतं. असे पदार्थ आहारात जास्त प्रमाणात असल्यास हे मीठ त्वचेतील पेशींमधला ओलावा शोषून घेतं. यामुळे त्वचा कोरडी, रुक्ष होते.
Image: Google
3. कर्बोदकं
शरीरास कर्बोदकांची गरज असते पण ती थोड्या प्रमाणात. कर्बोदकं जास्त असलेले पदार्थ सेवन केल्यास त्वचा खराब होते. कर्बोदकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. शरीरातील इन्शुलिनचं प्रमाण वाढत. त्याचा परिणाम सिबम या तेलग्रंथीवर होतो. तेल निर्मिती जास्त होवून त्यामुळे मुरुम पुटकुळ्यांसारख्या समस्या निर्माण होवून त्वचा खराब होते. प्रक्रिया केलेले तृणधान्यं, कॅनमधील ज्यूस, साखर आणि मैद्याची बिस्किटं, बटाटा वेफर्स, फ्रेंच फ्राइज या पदार्थांमध्ये कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं. हे पदार्थ मर्यादेपेक्षा जास्त खाल्ल्यास त्वचा खराब होते.
Image: Google
4. अ जीवनसत्त्वाचा ओव्हर डोस
मुरुम पुटकुळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी त्वचा आणि आरोग्य निरोगी राखण्यासाठी म्हणून आहारात अ जीवनसत्त्वाचं महत्त्व जास्त आहे. आहारात अ जीवनसत्त्वंयुक्त पदार्थ खाल्ल्यास अ जीवनसत्त्वाची सप्लिमेण्टस घेण्याची गरज नसते. पण आरोग्य चांगलं राहावं, त्वचा चांगली राहावी म्हणून अ जीवनसत्त्वाचं जास्त आहार आणि सप्लिमेण्टस स्वरुपात जास्त सेवन केलं जातं. अ जीवनसत्त्वं शरीरात जास्त साठून राहिल्यास त्वचा शुष्क होते. शुष्क त्वचेमुळे त्वचेच्या इतर समस्या निर्माण होवून त्वचेचा पोत खराब होतो. रेटिनाॅइडस वाढतात. त्यामुळे त्वचा खाजते, त्वचेचे पापुद्रे निघतात. म्हणूनच डाॅक्टरांच्या सल्ल्यानं सप्लिमेण्टस स्वरुपातील अ जीवनसत्त्वं घ्यावं असा सल्ला तज्ज्ञ देतात.
Image: Google
5. दूध आणि दुधाचे पदार्थ
दुधातले घटक त्वचेप्रती संवेदनशील असतात. अनेकांना दुधातील लॅक्टोजची ॲलर्जी असते. तसेच गायीच्या दुधात हार्मोन्सचं प्रमाण जास्त असतं. यामुळे शरीरातील हार्मोन्सचं प्रमाण बिघडून त्वचा खराब होते. त्वचेविषयक समस्या निर्माण झाल्या तर त्वचाविकार तज्ज्ञ आहारातील दूध आणि दुधाचे पदार्थ नियंत्रित करण्यास किंवा बंद करण्यास सांगतात.
Image: Google
6. काॅफी
काॅफी ही मूड सुधारण्यास फायदेशीर मानली जाते. पण काॅफीच्या सेवनाचे नियम असतात. ते जर पाळले गेले नाही तर काॅफीमुळे सौंदर्यविषयक समस्या निर्माण होतात. काॅफीचा त्वचेवर कसा परिणाम होतो याबाबत तज्ज्ञ सांगतात, की काॅफीमुळे सजगता वाढते. काॅर्टिसाॅलची निर्मिती वाढते. त्याचा परिणाम तेल निर्माण करणाऱ्या ग्रंथीवर होतो. म्हणूनच काॅफी जास्त प्रमाणात आणि अयोग्यरित्या सेवन केल्यास त्वचेवर मुरुम पुटकुळ्या येण्याची समस्या उद्भवते.
7. तेलकट पदार्थ
स्वयंपाक हा तेलाशिवाय होत नाही, तसेच शरीरातील स्निग्धतेसाठी तेलाची आहारात गरज असते. पण आहारातील तेलाचं अती प्रमाण, तेलकट पदार्थांचं अती सेवन यामुळे ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे फॅटी ॲसिडस शरीरात जास्त जातात. या घटकांचं प्रमाण जास्त झाल्यानं त्वचेवर मुरुम पुटकुळ्या येतात.