उन्हाळ्यात एकूणच आपल्याला संपूर्ण आरोग्याची काळजी व्यवस्थित घ्यावी लागते. वाढत्या उष्णतेमुळे आपला जीव कासावीस होतो. उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. ऊन, धूळ, प्रदूषण, घाम यामुळे त्वचा खराब होते. उन्हानं त्वचा काळवंडते. उन्हाचा त्वचेवर परिणाम होवून त्वचेवर सुरकुत्याही पडतात. त्वचेच्या अनेक समस्यांवर वेगवेगळे उपचार शोधण्यापेक्षा कोरफडीचा एकच उपाय करणं फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यात सतत घराबाहेर पडून फिरावं लागतं, काम करावं लागतं तेव्हा तर त्वचा जपण्यासाठी कोरफडीचा गर फारच उपयुक्त ठरतो. घरातल्या बागेत कोरफड लावणं, वाढवणं सहज शक्य आहे. घरघ्याघरी वाढवलेल्या कोरफडीचा गर त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो.
कोरफड जेलमुळे त्वचेत कोलॅजन निर्मितीला चालना मिळते. तसेच त्वचेला झालेली इजा, त्वचेवरचे घाव कोरफडच्या गरामुळे पटकन भरतात, बरे होतात. चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. कोरफडच्या गरामध्ये दाह विरोधी, सूज विरोधी गुणधर्म असल्यानं त्वचेची आग, खाज कोरफडच्या गराच्या उपयोगानं दूर होते. कोरफडीच्या गरातले गुणधर्म त्वचेवर जिवाणू आणि बुरशी संक्रमणाला विरोध करतात. त्वचा सुरक्षित ठेवतात. कोरफडच्या गरात ९८ % पाणी असल्याने कोरफड गराच्या वापराने चेहरा ओलसर राहातो. उन्हाने रापणारी त्वचा, त्वचेवर येणाऱ्या घामोळ्या यावर कोरफडचा गर म्हणजे कूल सोल्यूशन म्हणून ओळखला जातो. त्वचेसाठी कोरफड नियमित वापरल्यास त्वचा मऊ आणि घट्ट होते. कोरफडमुळे एजिंगचा धोका कमी होतो(7 ways to add Aloe Vera to your summer skincare for healthy skin).
उन्हाळ्यात कोरफडीचा वापर नेमका कसा करावा ?
१. मॉइश्चरायझर म्हणून कोरफडचा वापर : - कोरफड जेल हे एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जे उन्हाळ्यात तुमची त्वचा हायड्रेट ठेवू शकते. सनस्क्रीन किंवा मेकअप करण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर एलोवेरा जेलचा पातळ थर लावा.
२. कूलिंग एजंट म्हणून कोरफड :- उन्हाळ्यात सनबर्न आणि त्वचेची जळजळ होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. कोरफडचा गर किंवा जेल त्वचेला शांत करण्यास आणि उन्हामुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करू शकते. उन्हाळ्यात त्वचेला होणारी जळजळ, आग यांसारख्या समस्यांपासून झटपट आराम मिळण्यासाठी प्रभावित भागावर कोरफडीच्या गराचा किंवा जेलचा पातळ थर लावल्यामुळे लगेच आराम मिळेल.
३. फेस मास्क म्हणून कोरफड :- त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आणि मुरुमांची संख्या कमी करण्यासाठी कोरफडचा आपण फेसमास्क म्हणून देखील वापर करु शकतो. काहीवेळा आपल्याला रणरणत्या उन्हांत कामासाठी बाहेर पडावे लागते. अशावेळी उन्हामुळे आपली त्वचा काळवंडते, उष्णतेमुळे त्वचेची जळजळ होते. उन्हामुळे त्वचेवर रॅशेज येणे, त्वचा लालसर होणे, बारीक बारीक पुरळ येऊन सतत खाज येणे यांसारख्या समस्या जाणवतात. अशावेळी कोरफडीच्या मध्यभागातील गर काढून तो चेहेऱ्यावर लावावा. हा फेसमास्क सुकेपर्यंत किंवा १५ ते २० मिनिटे चेहेऱ्यावर तसाच ठेवून द्यावा. नंतर पाण्याने चेहेरा स्वच्छ धुवून घ्यावा.
४. टोनर म्हणून कोरफड :- कोरफडीचा वापर आपण टोनर म्हणून देखील करु शकतो. कोरफडीच्या गराचा वापर टोनर म्हणून केल्यामुळे तुमच्या त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते. कोरफड जेल आणि पाणी यांचे सम प्रमाण घेऊन हे मिसळून घ्यावे आणि या मिश्रणाचा वापर आपण टोनर म्हणून करु शकतो. हे टोनर एका हवाबंद बाटलीत तयार करुन ठेवावे गरजेनुसार कापसाच्या बोळ्यावर टोनर घेऊन ते चेहेऱ्याला लावावे.
५. बॉडी लोशन म्हणून कोरफड जेल : - उन्हाळ्यात देखील तुमची त्वचा मऊ आणि गुळगुळीत ठेवण्यासाठी कोरफड जेलचा वापर बॉडी लोशन म्हणून देखील केला जाऊ शकतो. आंघोळीनंतर तुमच्या त्वचेवर भरपूर प्रमाणात कोरफड जेल लावा यामुळे भर उन्हाळ्यातही तुमची त्वचा दिवसभर हायड्रेटेड राहील. तसेच रात्री झोपण्यापूर्वी देखील आपण बॉडी लोशन म्हणून कोरफड जेलचा वापर करु शकता.
घामोळ्या झाल्या, फार खाज सुटते? ५ घरगुती उपाय, घामोळ्या होतील कमी लवकर...
६. लिप बाम म्हणून कोरफड जेल : - कोरफड एक नैसर्गिक लिप बाम म्हणून देखील वापरले जाऊ शकते. उन्हाळ्यात बऱ्याचदा उष्णतेमुळे आपले ओठ सुकू लागतात. काहीवेळा ओठांची त्वचा भेगा पडून निघू लागते. अशावेळी तुमचे ओठ हायड्रेटेड आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी दिवसभर आवश्यकतेनुसार थोडेसे कोरफड जेल ओठांना लावा.
७. कोरफड जेल डोळ्यांच्या आरोग्यासाठी :- उन्हाळात बऱ्याचदा आपल्याला डोळ्यांची जळजळ, डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे यांसारख्या समस्या सतावतात. अशावेळी कोरफडीचा गर रात्री झोपताना डोळ्यांवर लावावा. उन्हामुळे जळजळ होणाऱ्या डोळ्यांचा दाह कमी होण्यास मदत होते.