केसांची काळजी घेणं म्हणजे केसांन भरपूर तेल लावणं , रोज तेल लावून मालिश करणं असा आपला समज असतो. केस चांगले होण्यासाठी आणि ठेवण्यासाठी तेलाशिवाय पर्याय नाही असं मानून केसांना भरपूर तेल लावलं जातं. नियमित आणि भरपूर तेल लावून केसांना मसाज केला तरी केस गळण्याची समस्या पूर्वीसारखीच आहे असा अनेकींचा अनुभव आहे. ‘कोणत्याच तेलानं केस लांब वगैरे होत नाही, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका’ हे आम्ही म्हणत नाही तर हेअर स्टायलिस्ट आणि हेअर एक्सपर्ट म्हणून ज्यांची ओळख आहे ते जावेद हबीब हे सांगतात. हे ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पण जावेद हबीब सांगताय म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी तथ्यं असणार. तेव्हा ते असं का म्हणतात? तेल लावण्याबाबतचा त्यांचा सल्ला काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
काय म्हणतात जावेद हबीब?
* केसांना तेल लावल्यानं केस वाढले असते तर रोज तेल लावूनही अनेकांचे केस गळतात किंवा टक्कल पडतं हे कसं? त्यामुळे तेलानं केस वाढतात हा भ्रम आधी डोक्यातून काढून टाकायला हवा.
* आपण जिथे राहातो तिथे तयार होणारं तेल केसांना लावलं पाहिजे. म्हणजे उत्तर भारतात रहाणार्यांनी केसांना मोहरीचं तेल लावावं. दक्षिण भारतात राहणार्यांनी खोबर्याचं तेल लावावं. यामागचा जावेद हबीब यांचा विचार हा आहे की, क्षेत्रानुसार वातावरण ठरतं. आणि त्या वातावरणानुसार त्या त्या क्षेत्रात फळं, भाज्या पिकतात. आपल्या क्षेत्रात जे पिकतं , तयार होतं ते आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीरच असतं. उत्तर भारतात मोहरीचं तेल होतं त्यामुळे तिथल्या लोकांनी केसांना मोहरीचं तेल लावलं तर फायदा होईल. पण आपण राहातो महाराष्ट्रात आणि डोक्याला मोहरीचं तेल लावणार असू तर मग केसांचं नुकसानच होईल.
छायाचित्र:- गुगल
तेल लावायला चुकताय का?
केसांना नियमित तेल लावूनही केस गळतात या तक्रारीवर बोलताना जावेद हबीब उलटा प्रश्न विचारतात की तुम्ही तेल कसं लावता?
केसांच्य मुळाशी भरपूर तेल लावलं, जिरवलं तरच केस चांगले होतात हा विचार आणि त्यातून होणारी कृती हीच मुळी चुकीची आहे असं जावेद हबीब म्हणतात. कधीही केसांना तेल लावताना डोक्याच्या त्वचेला आणि केसांच्या मुळांना तेल लावू नये. हे असं केल्यानं डोक्यात कोंडा होतो.
यामागचं कारण सांगताना जावेद हबीब म्हणतात की बाहेरुन लावलेल्या तेलाचा केसांच्या मुळाशी असलेल्या नैसर्गिकपणे तयार होणार्या तेलाशी संपर्क होतो तेव्हा जी क्रिया होते त्यातून डोक्यात कोंड्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे लहानपणपासून आपल्याला असलेली केसांना तेल लावण्याची चुकीची सवय आधी बदलण्याचा सल्ला जावेद हबीब देतात.
.. ही आहे तेल लावण्याची योग्य पध्दत
छायाचित्र:- गुगल
* जावेद हबीब म्हणतात की, केसांना तेल लावण्याची योग्य पध्दत म्हणजे तेल हे केसांनाच लावायला हवं. केसांना आणि केसांच्या टोकांन तेल लावलं जायला ह्वं. केसांच्या मुळांना तेल लावू नये तर केसांच्य लांबीला तेल लावायला हवं .
* केसांना तेल लावलं की केसांचा हलक्या हातानं मसाज करावा. केसांच्या मुळाशी मसाज करायचा असेल तर तो तेलानं करु नये. तेलाशिवाय केवळ बोट केसांच्या मुळाशी गोल गोल फिरवत मसाज करावा. यामुळे केसांच्या मुळांशी असलेला रक्तप्रवाह सुधारतो.
* रात्री केसांना तेल लावून, चंपी करुन झोपणं आणि सकाळी शाम्पूनं केस धुणं ही बहुतेकांची सवय आहे. पण जावेद हबीब म्हणतात की डोक्यात कोंडा होण्यापासून जपायचं असेल तर रात्री केसांना तेल लावू नये. ‘रात्र ही झोपण्यासाठी असते, केसांना तेल लावण्यासाठी नाही’ असं जावेद हबीब विनोदानं म्हणतात. केसांना तेल लावायचं असेल तर शाम्पू करण्याआधी पाच दहा मिनिटं आधी लावावं आणि मग शाम्पूनं केस धुवावेत. तेल हे केसांनाच लावावं ते केसांच्या मुळांशी लावू नये.
छायाचित्र:- गुगल
* महागडं तेलं म्हणजे केसांना हमखास सुरक्षा असं आपला तेलाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. जावेद हबीब हा दृष्टिकोन निर्थक असल्याचं म्हणतात. ते म्हणतात महागड्या तेलाच्या मोहात पडण्यापासून स्वत:ला वाचवावं. तेल किती मौल्यवान आहे हे सांगण्यासाठी ते जास्त किंमतीला विकणं हे एक बाजाराचं तंत्र आहे. या तंत्रात फसण्याची गरज नाही. आपण ज्या राज्यात राहातो तिथे तयार होणारं तेल स्वस्त असलं तरी तेच फायद्याचं असतं.
* केसांची लांबी वाढावी म्हणून केसांना वेगवेगळ्या प्रकारचे तेल लावले जाते. पण जावेद हबीब म्हणतात की तेलामुळे केस वाढतात हेच मूळी चुकीचं आहे. तेलामुळे आपल्य केसांना आद्रता मिळते, केस मॉश्चराइज होतात. केसांच्या होणार्या नुकसानाला नियंत्रित करण्याचं काम तेल करतं. तेलानं केस लांब होत नाही.
जावेद हबीब म्हणतात की तेल लावण्याबाबत मी सांगितलेल्या या सूचनांचं पालन केलं तर नक्कीच केस चांगले राहातील. केस गळण्याचं किंवा टक्कल पडण्याचं तर तुम्ही विसरुनच जाल!