आलिया आणि रणबीर कपूरच्या लग्नाचे फोटो बघून आलियाच्या लूकचं, मेकअपचं खूप कौतुक होतंय. लग्नातला भडक, ग्लाॅसी मेकअप टाळून आलियानं साध्या मेकअपला पसंती दिली. कपड्याच्या रंगापासून ते केस मोकळे सोडण्यापर्यंत सर्व काही साधं, मनमोहक आणि लक्ष वेधणारं होतं. सिम्पल गोष्टीही किती ॲट्रॅक्टिव्ह असू शकतात हे सांगण्यासाठी आलियांच्या नखांबद्दल बोललं तरी पुरेसं आहे.
Image: Google
लग्नात नवरीच्या मेकअपची, तिच्या पेहरावाची, तिच्या दागिन्यांची चर्चा होते. मॅनिक्युअर, पेडिक्युअरची नाही. मॅनिक्युअर, पेडिक्युअर हा तर तयारीचा पाया. पण आलियाच्या नखांमुळे तिच्यामॅनिक्युअरचीही चर्चा झाली. नवरीचा मेकअप म्हटला की नखांना लाल,मरुन अशा भडक रंगाची नेलपाॅलिश हे ठरलेलंच असतं जणू. पण आलियानं स्वत:च्या बाबतीत या गृहितकाला चुकीचं ठरवून फ्रेंच मॅनिक्युअरला पसंती दिली. या फ्रेंच मॅनिक्युअरमुळेच आलियाच्या लूकबद्दल बोलताना अगदी नखांबद्दलही चर्चा रंगतेय.
Image: Google
फ्रेंच मॅनिक्युअर म्हणजे काय?
फ्रेंच मॅनिक्युअर करताना नखांना बेसिक कोट हा गुलाबी, क्रीमी दिला जातो. तर नखांच्या टोकांना पांढरा रंग दिला जातो. बेसिक कोट आणि नखाच्या टोकाचा रंग यातील विरोधाभासामुळे नखं ॲट्रॅक्टिव्ह दिसतात. फ्रेंच मेनिक्युअर हे घरच्याघरी सहज करता येतं.
Image: Google
फेंच मॅनिक्युअर कसं करतात?
1. आधी नखांना लावलेली नेलपाॅलिश कापसाच्या बोळ्यानं नेल पाॅलिश रिमूव्हर लावून काढून टाकावी. नखांना गोलाकार किंवा चौकोनी जो आकर द्यायचा आहे त्या आकरात नखं ट्रिम करावी. फ्रेंच मेनिक्युअरसाठी नखं लांब हवीत. त्यामुळे बोटांच्या पेरापर्यंत नखं बारीक कापू नये. बोटांच्या पेरांच्या वर नखं वाढलेली हवीत. बोटांची नखं एकसारखी हवीत. त्यासाठी नेल क्लीपरचा उपयोग करत नखं एकसमान करावीत.
2. नखांना पाॅलिश करण्यासाठी ती गुळगुळीत असायला हवीत. नेल फाइलचा उपयोग करत नखांन एकसारखा आकार द्यावा. नखं गुळगुळीत करण्यासठी बफरचा उपयोग करवा.
3. नखं गुळगुळीत केल्यानंतर थोड्या वेळ हात कोमट पाण्यात बुडवून ठेवावेत. बोटांची नखं थोडा वेळ दुधात किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये बुडवावीत. यामुळे नखांची मुळं मऊ होतात. तेथील मृत त्वचा निघून जायला मदत होते. क्युटीकल कटरच्या सहाय्याने ही मृत त्वचा काढून घ्यावी. यानंतर नखांना क्युटिकल ऑइल लावावं.
4. नखांची बेसिक तयारी झाल्यानंतर नेल पाॅलिश लावायला घ्यावी. फ्रेंच मॅनिक्युअरमध्ये बेस कोट हा हल्का गुलाबी / क्रीमी रंगाचा असतो. नखांवर ब्रश खालून वर उभा फिरवत बोटांच्या सर्व नखांना बेस कोट लावावा.
Image: Google
5. बेस कोट वाळल्यानंतर पुन्हा त्यावर दुसरा कोट द्यावा. दुसरा कोट वाळल्यानंतर नखांच्या टोकांना ( नेल टिप्स) पांढरा/सोनेरी/ लाल/ हिरवा रंग द्यावा. नखांची टोकं रंगवताना हात हालायला/ थरथरायला नको. हात स्थिर असायला हवा. नखाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतर नखांची टोकं रंगवावीत. नखाची टोकं पूर्णपणे वाळू द्यावी. हवा तर दुसरा कोटही द्यावा. नखांची टोकं व्यवस्थित रंगवता यावी यासाठी पेंटर्स टेपचा उपयोग करावा. फ्रेंच मॅनिक्युअर किट आणल्यास हा टेपही त्यात मिळतो.
6. नखांच्या टोकाला दिलेले दोन्ही कोट वाळले की मग संपूर्ण नेलपाॅलिश सुरक्षित राहावी यासाठी शेवटी पारदर्शक रंगाचा अर्थात क्लिअर टाॅप कोट द्यावा.