टी शर्ट आणि जीन्स हा अनेक जणींचा ऑलटाईम फेव्हरेट ड्रेस. कारण अशा प्रकारच्या कपड्यांमध्ये त्यांना खूपच जास्त कम्फर्टेबल वाटतं. टी शर्ट हा प्रकारच थोडा सैलसर असतो. त्यात जर होजियरी किंवा कॉटन टी शर्ट म्हणजे आरामदायी कपड्यांचे सूख. असे कपडे तुम्ही कुठेही सहज कॅरी करू शकतो. त्यामुळेच तर प्रवासासाठीही अनेक जणी अशाच कपड्यांची निवड करतात. आता या टी शर्टच्या फॅशनमध्ये थोडा ट्विस्ट आला आहे आणि हेच नेमकं आलिया भट, क्रिती सेनन या अभिनेत्रींनी केलेल्या ड्रेसिंगमधून दिसून आलं.
सामान्यपणे तरूणी जेव्हा टी शर्ट घेतात, तेव्हा ते अधिकाधिक सोबर दिसावेत अशा पद्धतीने घेतात. त्यातही अनेक जणी टी शर्टचे भडक रंग घेणेदेखील टाळतात. डार्क रंग असलाच तरी तो खूप डोळ्यात खूपणारा नसेल, अशी काळजी तर बहुतांश जणी घेतात. टी- शर्ट घेण्याबाबत अनेक मुलींचा आणखी एक विचार असतो. तो म्हणजे टी शर्टवर खूप जास्त रंगांची उधळण नको. जास्तीत जास्त एक किंवा दोन रंगांचा वापर टी शर्ट डिझाईन करताना केलेला असावा, असं अनेकींना वाटतं. पण आता हा ट्रेण्ड मागे पडत चालला आहे आणि टी शर्टची एक नविनच फॅशन सध्या जोर धरू लागली आहे. अशाच प्रकारचे टी शर्ट आलिया भट आणि क्रिती सेनन या अभिनेत्रींनी घातले आहेत.
विशेष म्हणजे या दोघींचे टी शर्ट अगदी सारखेच असून दोघींनीही ते डेनिमसोबत घातले आहेत. क्रितीने या टीशर्टवर शॉर्ट्स घातली आहे तर आलियाने जीन्स घालणं पसंत केलंय. या टी शर्टवरचे कलर अतिशय डार्क आहेत. त्यामुळे अनेक जणी त्यांचे कलर पाहून असे टी शर्ट घेणं टाळतील. पण अंगात घातल्यावर टी शर्टचे रंग अतिशय खुलून आले असून अशा प्रकारचा टी शर्ट अतिशय ट्रेण्डी वाटत आहे. शॉर्ट टी शर्ट प्रकारचा हा शर्ट असून तो फुल स्लिव्हजचा आहे. लाल, पिवळा, पोपटी आणि गुलाबी असे चार रंग या टी शर्टमध्ये वापरण्यात आले असून त्यावर चौकड्यांचे डिझाईन आहे.
मल्टीकलर टी शर्ट घालणार असाल तर...
- मान्सून किंवा थंडीच्या दिवसात अशा प्रकारचे कपडे खुलून दिसतात. क्रिती आणि आलिया यांनी घातलेला टीशर्ट थोडाफार पुलओव्हर प्रकारात मोडणारा असून येणाऱ्या थंडीसाठी तुम्ही अशा प्रकारचा पुलओव्हर घेण्याचा विचार नक्की करू शकता.
- असे ब्राईट कलर आणि मल्टीकलर कपडे दिवसा घातले तर ते अधिक भडक वाटू शकतात. त्यामुळे असे कपडे घेणार असाल, तर ते शक्यतो रात्री घाला.
- मल्टीकलर कपड्यांवर रंगांची एवढी उधळण असते की त्यावर कोणतेही ब्राईट ॲक्सेसरीज घालणे टाळावे. ॲक्सेसरीजचे रंग हे शक्यतो शॅडो शेडमधले असावेत.
- सावळ्या मुलींनी मल्टीकलर कपड्यांचा टोन टाळावा. कारण त्यात त्यांचे कॉम्प्लेक्शन आणखीनच डार्क वाटू शकते.
- मल्टीकलर टी शर्टवर शक्यतो प्लेन रंगाचा स्कर्ट किंवा जीन्स घालावी.