हवामानातील बदलामुळे आणि पाणी कमी प्यायले जात असल्याने थंडीच्या दिवसांत त्वचा रुक्ष होते. त्यामुळे या काळात त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यातही आपला चेहरा टवटवीत दिसावा यासाठी आपण मग वेगवेगळे मॉइश्चरायझर नाहीतर क्रिम लावतो. पण त्याचाही थोडावेळच इफेक्ट राहतो. थोडा वेळाने पुन्हा त्वचेचा कोरडेपणा दिसायला लागतो आणि मग काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो. मग कोणी काही सांगितले की ते उपाय करुन पाहिले जातात. पण त्यापेक्षा आपल्याला माहित असणारा एकच परफेक्ट उपाय केल्यास आपला वेळ तर वाचतोच पण कोरडी झालेली त्वचा ग्लो करण्यास त्याचा चांगला उपयोग होतो.
कोरफड त्वचेच्या, केसांच्या आणि आरोग्याच्या इतरही तक्रारींसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे आपल्याला माहित आहे. त्वचेच्या वेगवगळ्या तक्रारींसाठी उपयुक्त असणारी कोरफड थंडीच्या दिवसांत तर वरदानच ठरते. आपण वापरत असलेल्या वेगवेगळ्या उत्पादनांमध्येही कोरफडीचा वापर केलेला असतो. कोरफडीमुळे त्वचेला हायड्रेशन तर मिळेलच पण उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर मिळण्यासही मदत होईल. सूर्यकिरणांतून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून बचाव करण्याचे कामही कोरफडीमुळे होते. त्यामुळे चेहऱ्यासाठी नियमितपणे कोरफडीचा वापर करणे फायदेशीर ठरते. घरच्या घरीही आपण कोरफडीच्या गराचा वापर करुन अतिशय उपयुक्त असा फेसपॅक तयार करु शकतो. या पॅकसाठी कोरफडीबरोबरच इतर कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि तो कसा तयार करायचा हे पाहूया.
कोरफडीमधील गुणधर्म
१. व्हिटॅमिन ए
२. बी २
३. बी ३
४. बी ६
५. बी १२
६. व्हिटॅमिन सी
७. व्हिटॅमिन इ
८. फोलिक अॅसिड
फेसपॅक कसा करायचा...
साहित्य
१. कोरफड गर
२. मध
३. हळद
कृती
१. एका बोलमध्ये १ चमचा कोरफडीचा गर घ्या
२. यामध्ये काही थेंब मध आणि चिमूटभर हळद घालून हे मिश्रण एकजीव करा
३. हा तयार झालेला फेसपॅक चेहऱ्याला एकसारखा लावा.
४. १० ते १५ मिनिटे पॅक चेहऱ्यावर सुकू द्या
५. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
६. हा पॅक तुम्ही काही दिवसांसाठी रोज लावलात तरी चालेल, त्यामुळे काही आठवड्यांमध्ये तुम्हाला चेहऱ्याची चमक वाढल्याचे जाणवेल.
फेसपॅकचे फायदे
१. त्वचा उजळण्यास मदत होते
२. चेहऱ्यावर वेगवेगळ्या कारणांनी झालेले टॅनिंग निघून जाते
३. पिंपल्स येत असतील तर ते कमी होतात.
४. त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते त्यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होतो.
५. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते