उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. ऊन, धूळ, प्रदूषण, घाम यामुळे त्वचा खराब होते. उन्हानं त्वचा काळवंडते. उन्हाचा त्वचेवर परिणाम होवून त्वचेवर सुरकुत्याही पडतात. त्वचेच्या अनेक समस्यांवर वेगवेगळे उपचार शोधण्यापेक्षा कोरफडीचा एकच उपाय करणं फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यात सतत घराबाहेर पडून फिरावं लागतं, काम करावं लागतं तेव्हा तर त्वचा जपण्यासाठी कोरफडीचा इलाज आवश्यक ठरतो. घरातल्या बागेत कोरफड लावणं, वाढवणं सहज शक्य आहे. घरघ्याघरी वाढवलेल्या कोरफडीचा गर त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो.
Image: Google
त्वचेसाठी कोरफड महत्वाची का?
कोरफड जेलमुळे त्वचेत कोलॅजन निर्मितीला चालना मिळते. तसेच त्वचेला झालेली इजा, त्वचेवरचे घाव कोरफडच्या गरामुळे पटकन भरतात, बरे होतात. चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. कोरफडच्या गरामध्ये दाह विरोधी, सूज विरोधी गुणधर्म असल्यानं त्वचेची आग, खाज कोरफडच्या गराच्या उपयोगानं दूर होते. कोरफडीच्या गरातले गुणधर्म त्वचेवर जिवाणू आणि बुरशी संक्रमणाला विरोध करतात. त्वचा सुरक्षित ठेवतात.
कोरफडच्या गरात 98 टक्के पाणी असल्यानं कोरफड गराच्या वापरानं चेहरा ओलसर राहातो. उन्हानं रापणारी त्वचा, त्वचेवर येणाऱ्या घामोळ्या यावर कोरफडचा गर म्हणजे कूल सोल्यूशन म्हणून ओळखला जातो. त्वचेसाठी कोरफड नियमित वापरल्यास त्वचा मऊ आणि घट्ट होते. कोरफडमुळे एजिंगचा धोका कमी होतो.
Image: Google
कोरफडचा गर कसा वापरावा?
1. त्वचेसाठी कोरफडचा गर वापरण्याच्या विविध पध्दती आहेत. कोरफड गर थेट चेहऱ्याला लावला तरी चालतो. यासाठी आधी चेहरा फेसवाॅशनं स्वच्छ धुवावा. चेहरा रुमालानं टिपून घ्यावा. थोडा कोरफडीचा गर हातावर घेऊन तो चेहऱ्यास हलका मसाज करत लावावा. 10-15 मिनिटानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
2. कोरफडच्या पातीतून कोरफड गर काढावा. हा गर आइस ट्रे मध्ये ठेवून त्याचा बर्फ करावा. उन्हातून आल्यानंतर चेहऱ्यास थंडावा देऊन रिफ्रेश करण्यासाठी कोरफडच्या गराचा बर्फाचा तुकडा चेहऱ्यावरुन फिरवावा. यामुळे उन्हानं त्वचेची होणारी आग थांबते . त्वचा मऊ आणि आकर्षक होते.
Image: Google
3. कोरफडीचा गर त्वचेसाठी टोनरचं काम करतो. कोरफडच्या गराचा टोनर सहज तयार करता येतो. यासाठी दोन भाग पाणी घेऊन त्यात एक भाग कोरफडीचा गर घालावा. हे मिश्रण एका हवाबंद बाटलीत घालून मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. ही बाटली फ्रिजमध्ये ठेवावी. चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर टोनर म्हणून या कोरफड गराच्या पाण्याचा उपयोग करता येतो. यासाठी एका कापसाच्या बोळ्यावर कोरफड गराचं पाणी घेऊन ते चेहेऱ्यास लावावं. त्वचेकडून ते शोषलं गेलं की मग चेहऱ्यास माॅश्चरायझर आणि इतर क्रीम लावावं.
4. किडा चावल्यास त्वचेचा दाह होतो, सूज येते. या दाह आणि सूज घालवण्यासाठी कोरफडच्या गराचा उपयोग होतो. यासाठी किडा चावलेला भाग साबणाच्या पाण्यानं स्वच्छ धुवावा. त्यावर कोरफडचा गर लावून 20 मिनिटं ठेवल्यास त्वचेस आराम मिळतो.