Join us  

वजन तर कमी होईलच त्वचाही होईल चमकदार, पाहा ग्रीन टी नेमका कसा वापरायचा, ४ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2023 4:44 PM

Amazing Benefits of Green Tea Face Pack : केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो.

उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे किंवा त्वचेला खूप जास्त प्रमाणात ऊन लागल्याने चेहरा काळवंडतो. काही वेळा उन्हामुळे आणि प्रदुषणामुळे चेहऱ्यावर ब्लॅक हेडस, व्हाईट हेडस येतात. कधी पिंपल्स, फोड येतात आणि चेहरा खराब दिसतो. इतकेच नाही तर काही वेळा चेहऱ्यावर खूप जास्त सुरकुत्या पडतात आणि चेहरा वयस्कर दिसायला लागतो. आता या सगळ्यावर काय उपाय करायचा असा प्रश्न आपल्याला पडतो. पण अशावेळी केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो (Amazing Benefits of Green Tea Face Pack). 

ग्रीन टी हा वजन कमी करण्यासाठी किंवा बॉडी डीटॉक्स करण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. बरेच जण नेहमीच्या चहा-कॉफीपेक्षा हा ग्रीन टी घेणे पसंत करतात. त्याचप्रमाणे हा ग्रीन टी त्वचेसाठीही अतिशय फायदेशीर असतो. ग्रीन टीचा वापर करुन तयार केलेला फेस मास्क चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी फायदेशीर ठरतो. इतकेच नाही तर त्वचा चमकदार दिसावी यासाठीही हा फेसपॅक उपयुक्त असतो. आता हा पॅक नेमका कसा तयार करायचा ते पाहूया... 

कसा करायचा ग्रीन टी फेसपॅक 

१. एका बाऊलमध्ये १ चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं.

२. त्यात १ चमचा दही आणि २ चमचे मध घालायचा. 

३. यात १ टी बॅग ग्रीन टी घालून सगळे चांगले एकजीव करायचे.

४. हे मिश्रण चेहऱ्याला लावून २ ते ३ मिनीटे चांगला मसाज करायचा. 

५. १० ते १५ मिनीटे हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवायचे आणि नंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा. 

६. यामुळे ब्लॅकहेडस, सनबर्न, पुरळ निघून जाण्यास मदत होते. 

७. हा उपाय आठवड्यातून २ वेळा केल्यास त्याचा चांगला उपयोग झालेला दिसून येतो.  

ग्रीन टीचे फायदे 

१. त्वचेमधील ओलावा कायम राहण्यास मदत होते.

२. ग्रीन टी हा एकप्रकारे त्वचेसाठी मॉईश्चरायझर म्हणून काम करतो. ज्यामुळे तुमची त्वचा ही मुलायम राहते. 

३. ग्रीन टीमध्ये उपलब्ध असलेली पोषकतत्वे वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यास लाभदायी ठरतात. 

४. अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्याने शरारातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास ग्रीन टी चा चांगला उपयोग होतो.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी