त्वचा ही आपल्याला तरुण ठेवणारी एक महत्त्वाची गोष्ट असते. त्वचेवर सुरकुत्या पडल्या की आपण म्हातारे दिसायला लागतो. पण अभिनेते आणि अभिनेत्रींना असे वयस्कर दिसून चालत नाही. त्यांची त्वचा ही केवळ सौंदर्य म्हणूनच नाही तर त्यांच्या कामासाठी एक महत्त्वाची गोष्ट असते. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन ही बॉलिवूडमधील अतिशय नावाजलेली जोडी. अमिताभ हे तर जवळपास ४ पिढ्यांचे आवडते अभिनेते आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षीही ते चांगलेच अॅक्टीव्ह असलेले पाहायला मिळते. तर जया बच्चन याही ७६ वर्षांच्या अजिबात वाटत नाहीत (Shweta Bachchan revels secret of great skin of her parents Jaya and Amitabh Bachchan).
या दोघांची त्वचा इतकी नितळ आणि मुलायम असण्यामागे एक खास सिक्रेट आहे. जे त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिने नुकतेच सांगितले. ते सिक्रेट म्हणजे हे दोघंही न चुकता मोहरीचं तेल वापरतात. आपण स्वयंपाकात जी मोहरी वापरतो त्या मोहरीपासून काढलं जाणारं तेल हे दोघंही वापरतात. प्रसिद्ध मॉडेल आणि युट्यूबर असलेली मीरा राजपूत ही ने नुकतीच श्वेता बच्चन हिची मुलाखत घेतली. त्यावेळी श्वेताने आपले पालक दोघेही स्कीन केअरमध्ये कशाप्रकारे मोहरीचे तेल वापरतात याविषयी सांगितले. जया बच्चन या बंगाली असल्याने त्या स्वयंपाकासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करतात तर अमिताभ हे स्कीनवर हे तेल लावतात.
मुलाखतीमध्ये श्वेता म्हणते, तुमची त्वचा ही ८० टक्के तुमच्या अनुवंशिकतेवर आणि तुम्ही घेत असलेल्या आहारावर अवलंबून असते. पुढे श्वेता म्हणते, त्या दोघांमध्ये कॉमन असलेली एकच गोष्ट आहे ती म्हणजे मोहरीचं तेल. माझी आई बंगाली असल्याने ती स्वयंपाकात भरपूर मोहरीचं तेल वापरते आणि मासे खाते. तर वडील म्हणजेच अमिताभ बच्चन चेहरा आणि अंगाला हे तेल लावतात. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी चेहऱ्यावर कोणतेही उपचार आणि प्रक्रिया केलेल्या नाहीत.
मोहरीच्या तेलाचे फायदे
१. यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस असतात.
२. तसेच ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हेही असतात.
३. यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात.
४. या तेलात अँटीऑक्सिडंटस, खनिजे आणि फॅटी अॅसिडस असतात.
५. सर्दी-कफ बरा होण्यासाठी हे तेल फायदेशीर असते.
६. तसेच त्वचा आणि केसांसाठीही या तेलाचा चांगला उपयोग होतो.
७. अथ्रायटीस सारख्या समस्येवर हे तेल उपयुक्त ठरते, सूज आणि दाह कमी होण्यास याचा फायदा होतो.