बाजारात छान हिरवेगार आवळे मिळू लागले आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच शरीराचं पोषण करण्याचे गुण आवळ्यात असतात. आवळा हा पोटापासून त्वचेच्या समस्या घालवण्यापर्यंत अनेक समस्यांवर उपयुक्त आहे. ताजा आवळा, साखरेत किंवा गुळात पाकवलेला मुरांबा स्वरुपातला आवळा, आवळा कॅण्डी, आवळा सरबत, आवळा रस, आवळा पावडर अशा अनेक रुपात आवळा आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरतो . बहुगुणी आवळा हा केसांच्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून वापरला जातो तसेच हा आवळा त्याच्या वेगवेगळ्या स्वरुपात चेहऱ्यासाठी वापरल्यास त्वचेच्या अनेक समस्या सहज सूटतात. त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि निरोगी करण्यास आवळा खूप फायदेशीर असल्यचं सौंदर्यतज्ज्ञ सांगतात.
Image: Google
आवळ्यात क जीवनसत्त्वं आणि अॅण्टिऑक्सिडण्टस मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा उपयोग उत्तम क्लीन्जर म्हणून करता येतो. आवळ्याचा उपयोग त्वचेसाठी केल्यास चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात. चेहऱ्यावर चमक तर येतेच शिवाय मुरुम, पुटकुळ्या, त्याचे डाग घालवून चेहरा स्वच्छ करण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे.
ॠतू बदलाचे आपल्या त्वचेवरही परिणाम होतात. त्वचा निस्तेज दिसत असेल तर सकाळ संध्याकाळ चेहऱ्यावर आवळा उत्पादनांचा उपयोग केल्यास त्वचा चमकदार होते. सौंदर्य वाढवण्यासाठी, त्वचा निरोगी करण्यासाठी आवळ्याच उपयोग चेहऱ्यावर वेगवेगळ्या पध्दतीने केला जातो.
चेहऱ्यासाठी आवळा का आणि कसा वापरावा?
१. बाहेरील प्रदूषणाचा मोठा परिणाम त्वचा खराब होण्यावर होतो. त्वचा ही अतिशय संवेदनशील असल्यानं प्रदुषणाचे परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसतात. तसेच विविध रसायनयुक्त सौंदर्य उत्पादनं वापरल्यानं त्याचे परिणाम चेहर खराब होण्यावर होतो. प्रदूषण आणि रासायनिक घटक यांचा त्वचेवरील परिणाम घालवण्यासठी आवळा पावडर, मध, आणि दही घ्यावं. ते चांगलं एकत्र करुन चेहऱ्यावर लावावं. हा लेप २० मिनिटं ठेवून नंतर चेहरा थंड पाण्यानं धुवावा. जर त्वचा तेलकट असेल तर या लेपात थोडं गूलाबपाणी देखील घालावं.
२. चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी आवळ्याची पेस्ट लावणं आवश्यक आहे. आवळ्याची पावडर पाण्यात भिजवून किंवा ताज्या आवळ्याचे बारीक तुकडे करुन ते मिक्सरमधे वाटून ती पेस्ट चेहऱ्याला लावली तरी फायदेशीर ठरते. यामुळे मुरुम-पुटकुळ्या, चेहऱ्यावर त्यामुळे होणाऱ्या जखमा यावर ताज्या आवळ्याचा लेप मदत करतो. यामुळे चेहरा अधिक सूंदर आणि आकर्षक दिसतो.
Image: Google
३ ऊन, प्रदूषण, कॉस्मेटिक्सचा अति वापर याचा परिणाम म्हणजे चेहऱ्याचा रंग काळवंडतो. यासाठी ताज्या आवळ्याचा रस खूप उपयोगी आहे. रसरशीत आवळा किसून सूती कापडात बांधून तो पिळून काढल्यास आवळा रस निघतो. किंवा आयुर्वेदिक दुकानात तयार आवळा रस ( प्यायचा आवळा ज्यूस नव्हे) मिळतो. तो वापरला तरी चालतो. एका छोट्या वाटीत आवळ्याचा रस घेऊन कापसाच्या मदतीनं चेहऱ्याला लावावा. हा रस ;पूर्ण सुकल्यानंतर साधारणत: पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा. यामुळे त्वचेचा रंग उजळतो. चेहरा धुतांंना डोळे उघडे ठेवू नये.
४. चेहऱ्यावरचे मुरुम पुटकुळ्यांचे डाग काढून चेहऱ्याची त्वचा नितळ करण्यासाठी ताज्या आवळ्याची पेस्ट करुन ती चेहऱ्याला लावावी. दहा मिनिटांनी चेहरा कोमट पाण्यानं धूवावा. त्वचा जर संवेदनशील असेल तर ही पेस्ट जास्त घट्ट स्वरुपात न लावता त्यात पाणी घालून ती पातळ करुन मग चेहऱ्यास लावावी.
Image: Google
५. आवळ्यातील क जीवनसत्त्व आणि अॅण्टिऑक्सिडण्टसमुळे त्वचेचा पोत सूधारतो. तसेच त्वचा घट्ट होते. ती सैल पडत नाही. त्वचा स्वच्छ करण्यासाठी म्हणजेच एक्सफोलिएट करण्यासाठी आवळ्याचा चांगला फायदा होतो. यासाठी एक चमचा आवळा पावडर घ्यावी. ती गरम पाण्यात मिसळावी. या मिश्रणानं चेहरा हलका हातानं मसाज करत स्क्रब करावा. एक पाच ते सात मिनिटं स्क्रब केल्यानंतर पंधरा मिनिटं थांबावं आणि मग चेहरा पाण्यानं धुवावा. या मिश्रणात हळद घातल्यास आणखी फायदा होतो.
६. आवळ्याचा ताजा रस थोडं मध टाकून घेतल्यास त्वचा चमकदार होतेच शिवाय मुरुम पुटकुळ्याही राहात नाही.