आपली त्वचा एकदम नितळ सुंदर असावी असं आपल्याला कायम वाटतं. पण कधी ना कधी चेहऱ्यावर फोड, पुरळ, काळे डाग येतातच. मग हे घालवण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे आपल्याला माहित नसतं. अशावेळी बाजारात उपलब्ध असणारी वेगवेगळी उत्पादनं आपण वापरतो. पण यातील रासायनिक घटकांमुळे एक तर समस्या आणखी वाढते किंवा त्वचेच्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या कारणांनी आलेले फोड, पुरळ या समस्या कालांतराने कमी होतात, पण चेहऱ्यावरचे काळे डाग मात्र तसेच राहतात. हे डाग आले की तरुणी अस्वस्थ होऊन जातात. चेहऱ्यावरचे फोड किंवा पुरळ फोडणे, त्यांना नख लावणे यांमुळे आलेले हे डाग सौंदर्यात बाधा आणतात. उन्हात जास्त फिरणे किंवा नाजूक त्वचा असलेल्यांना चेहऱ्यावर काळे डाग येण्याची समस्या उद्भवते. कधी हे डाग त्वचेच्या वरच्या भागात असतात तर कधी ते आतपर्यंत गेलेले असल्याने ते जायला बराच वेळ लागू शकतो. अशा काळ्या डागांसाठी नेमके कोणते उपाय करायचे ते पाहूया...
१. चेहऱ्यावरचे फोड अजिबात फोडू नका
चेहऱ्यावर फोड किंवा पुरळ, पिंपल्स आले असतील तर बसल्या बसल्या चाळा म्हणून हे फोड फोडायची अनेकांना सवय असते. त्यामुळे हे फोड फुटतात आणि त्याठिकाणी काळा डाग तयार होतो, तो जायला बराच वेळ लागतो. या काळ्या डागामुळे आजुबाजूला आणखी फोड येतात आणि हे डाग वाढत जातात. हा फुटलेला फोड घेऊन तुम्ही उन्हात गेलात तर याठिकाणी आणखी इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे चेहऱ्यावरचे फोड अजिबात मुद्दाम फोडू नका.
२. नियमित सनस्क्रीन लोशन लावा
घरातून बाहेर पडताना त्वचेला सूर्याच्या अतिनिल किरणांचा त्रास होऊ नये म्हणून सनस्क्रीन लोशन लावणे आवश्यक आहे. अनेकदा आपल्या मनात सनस्क्रीन लोशनबाबत गैरसमज असतात. या लोशनमुळे आपल्याला फोड येतात किंवा त्वचा खराब होते असे आपल्याला वाटते. पण सनस्क्रीन हे त्वचेसाठी प्रोटेक्शनप्रमाणे काम करते. त्यामुळे चेहऱ्याचे वेगवेगळ्या समस्यांपासून संरक्षण होण्यास मदत होते. तेव्हा न विसरता सनस्क्रीन लोशन लावा.
३. फेस क्लिनिंग रुटीन फॉलो करा
सकाळी आणि संध्याकाळी न चुकता तुमच्या त्वचेला सूट होईल, तुम्हाला आवडेल अशा फेस व़ॉशने चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर त्यावर व्हिटॅमिन सीचे एखादे सिरम लावा. सध्या बाजारात बरेच चांगले सिरम सहज उपलब्ध असतात. त्याविषयी योग्य ती माहिती घ्या आणि तुमच्या त्वचेला सूट होईल असे एखादे सिरम लावा. त्यावर मॉइश्चरायझर लावायला विसरु नका. या गोष्टींमुळे तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील फोड, डाग कमी होण्यास मदत होईल.
४. घरगुती फेस पॅक लावा
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होईल असा फेस पॅक लावा. बेसन पीठ, हळद, लिंबाचे थेंब आणि कच्चे दूध हे एकत्र करुन चेहऱ्याला लावून ठेवा. २० मिनिटांनी चेहरा अर्धवट ओला असेल तेव्हा हे मास्क नीट चोळून चोळून पाण्याने धुवा. यामुळे त्वचेच्या रंध्रांमध्ये काही घाण असेल तर ती निघण्यास मदत होते. तसेच चेहरा उजळण्यास याचा चांगला उपयोग होतो. हे मास्क तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नक्की लावू शकता. ते करायला अगदी सोपे असल्याने हा उपाय नक्की वापरुन बघा.
५. बटाट्याचा रस लावा
चेहऱ्याचे टॅनिंग जाण्यासाठी किंवा काळे डाग जाण्यासाठी बटाटा अतिशय उपयुक्त असतो. त्यामुळे बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या आणि ते पाणी चेहऱ्याला लावा. १५ मिनिटे हे पाणी चेहऱ्याला लावून ठेवायचे त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवायचा. यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला विसरु नका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून २ वेळाही करु शकता, त्यामुळे चेहऱ्यावरचे डाग कमी होण्यास मदत होईल.
६. त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या
त्वचेवरील डाग जास्त गडद असतील तसेच हे डाग जात नाहीत असे वाटत असेल तर वेळीच त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेतलेला चांगला. ते आपल्या त्वचेच्या पोतनुसार योग्य ते उपचार करतात. काहीवेळा आपल्याला लावण्यासाठी काही क्रिम दिली जातात. तसेच पोटातून घेण्याची काही औषधेही दिली जातात. यामुळे त्वचा नितळ होण्यास मदत होते. मात्र हे थोडे खर्चिक काम असते, मात्र तुम्हाला लवकरात लवकर उपाय व्हावा असे वाटत असेल तर मात्र याशिवाय काहीही पर्याय नसतो.