थंडीच्या दिवसांत केसांत कोंडा होणे म्हणावे तर सामान्यच. थंडीमुळे त्वचा कोरडी झाल्याने त्वचेचा वरचा थर निघायला लागतो किंवा केसांत कोंड्याचे फोड तयार होतात. एकदा केसात कोंडा झाला की तो कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. कधी हेअर स्पा करुन तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क लावून केसांतील कोंडा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. बाजारात असणारी विविध प्रकारचे तेल, शाम्पू वापरुनही हा कोंडा काही केल्या कमी होत नाही. अशावेळी नेमके काय करायचे हेच आपल्याला कळत नाही. आयुर्वेदात केसांच्या समस्यांसाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. त्यामुळे तुम्हीही कोंड्याच्या समस्येने वैतागले असाल तर कोंडा कमी करण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करुन पाहा....
१. मेथ्यांचा हेअरमास्क
१ चमचा मेथ्यांची पावडर आणि १ चमचा त्रिफला चूर्ण एकत्र करा. त्यामध्ये २ चमचे दही घालून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. एकत्र केलेले मिश्रण रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हेअरमास्कसारखे हे मिश्रण लावा. १ तास तसेच ठेवून नंतर हलक्या शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून हा प्रयोग दोन वेळा केल्यास केसातील कोंडा कमी होण्यास मदत होईल.
२. केस धुण्याआधी हे काम नक्की करा
लिंबू कोंड्याच्या समस्येसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. एका वाटीत खोबरेल तेल घ्या, ते कोमट करा. त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाने केसांच्या मूळांशी व्यवस्थित मसाज करा. रात्रभर केस तसेच ठेवून द्या आणि सकाळी हलक्या शाम्पूने कोमट पाण्याने केस धुवून टाका. आदल्या दिवशी तुम्हाला हे करायचे लक्षात राहीले नाही तर दुसऱ्यादिवशी सकाळी आंघोळीच्या २ तास आधीही तेल आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण लावल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आठवड्यातून एकदा तुम्ही हा प्रयोग करु शकता.
३. कोरफडीचा गर करेल उत्तम काम
कोंडा कमी होण्यासाठी कोरफडीचा गर हा आणखी एक उत्तम उपाय आहे. १ वाटी कोरफडीच्या गरात २ चमचे कॅस्टर ऑईल एकत्र करुन हे मिश्रण रात्री झोपताना केसांच्या मूळांशी लावा. रात्रभर केस तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून टाका. याबरोबरच मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याची मिक्सरमधून पेस्ट करावी आणि त्यात कोरफडीचा गर एकत्र करुन ती पेस्ट १ तास केसांच्या मूळांशी लावल्यासही कोंडा कमी होण्यास मदत होते. कोरफडीचा गर थोडा चिकट असल्याने तो निघण्यास वेळ लागतो. त्यामुळे केस दोन ते तीन वेळा पाण्याने आणि शाम्पूने स्वच्छ धुवा.
४. कडूलिंबाच्या पानांचा उपयोग
कडूलिंबाच्या पानांमध्ये अतिशय चांगले आयुर्वेदिक गुणधर्म असतात. कडूलिंबाची भरपूर पाने पाण्यात घालून ते पाणी चांगले उकळा. कडूलिंबाचा अर्क त्यामध्ये उतरेल, त्या पाण्याने केस धुवा. कडूलिंबाच्या पानांचा हेअरमास्कही करु शकता. दोन चमचे कडूलिंबाच्या पानांची पावडर किंवा पेस्ट घेऊन त्यामध्ये दही एकत्र करा. केसांच्या मूळांशी आणि केसांना हे मिश्रण लावा. अर्धा तास हा मास्क ठेवून नंतर धुवून टाका.