Join us  

 खूप घाम येतो म्हणून वैतागताय? वाचा घाम येण्याचे 3 फायदे, आरोग्य आणि सौंदर्यासाठी उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 1:24 PM

घाम येणं ही समस्या नाही आणि त्यामुळे त्वचा आणि केसांचं नुकसानही होत नाही. उलट फायदाच होतो. तो कसा?

ठळक मुद्देटाळूशी घाम आल्यानं केसांचे बीजकोश मोकळे होतात. त्याचा फायदा केस वाढण्यास होतो.केसात खूप घाम आल्यानं टाळूच्या त्वचेच्या रंध्रात साचलेली घाण बाहेर पडते.घाम येतो तेव्हा घामावाटे क्षार आणि युरिक अँसिड बाहेर पडतं. या दोन घटकांमुळे त्वचा नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट होते. स्वच्छ होते.

गरम झाल्यावर घाम येणं ही स्वाभाविक बाब आहे. आणि घाम आला की चिडचिड होणं हेही स्वाभाविक आहे. पण अनेकजणींना चेहर्‍यावर आणि केसांमधे खूप घाम येतो. घामामुळे आपली त्वचा आणि केस खराब होतील अशी भीतीही वाटत असते. पण सौंदर्याच्या दृष्टिकोनातून घामाचा विचार केला तर घाम हा त्वचा आणि केसांसाठी हानिकारक नसून लाभदायकच ठरतो. घाम येणं ही समस्या नाही आणि त्यामुळे त्वचा आणि केसांचं नुकसानही होत नाही. नुकसान तेव्हा होतं जेव्हा घाम येऊनही आपण तो पुसत नाही. केस आणि त्वचा स्वच्छ करत नाही. घामाकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांसाठी आपण घामालाच दोष देत राहतो. केस आणि त्वचेसाठी घामाचे अनेक फायदे आहेत.

 

घामाचे फायदे

  1. केसांसाठी घाम हा उपयुक्त ठरतो. केसांच्या मुळाशी आपल्याला खूप घाम येत असेल तर ती गोष्ट केसांसाठी चांगली आहे. टाळूशी घाम आल्यानं केसांचे बीजकोश मोकळे होतात. त्याचा फायदा केस वाढण्यास होतो. केसांचे बीजकोश मोकळे झाल्यानं नवीन केस येण्याचं तसेच ते वाढण्याचं प्रमाण वाढतं. केसांच्या मुळाशी जेव्हा घाम येतो तेव्हा तेथील रंध्रं ही मोकळी होतात, उघडतात. या मोकळ्या रंध्रात घाण अडकून बसण्याची शक्यता असते. त्यामुळे आठवड्यातून किमान तीन वेळा शाम्पूनं केस धुणं आवश्यक आहे. खूप घाम येत असतांनाही केसांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तर मात्र केस खराब होतात.
  2.  टाळूला जेव्हा घाम येतो तेव्हा टाळूची रंध्र उघडतात. त्यातून घाण बाहेर पडते. कधी कधी या रंध्रात अडकून पडलेल्य घाणीमुळे केसांच्या मुळाशी संसर्ग होतो. पण घाम येण्यानं रंध्र उघडतात, त्यातून घाण बाहेर पडते म्हणून केसांच्या आरोग्याचा विचार करता घाम येणं चांगली बाब आहे. पण खूप घाम येत असतांनाही केसांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास रंध्रांमधून बाहेर पडलेली घाण तिथेच अडकून पडते. त्यामुळे केस गळतात. पण आपल्याला वाटतं की घाम खूप आल्यानंच केस गळतात की काय!

 

 

3.  घाम येतो तेव्हा घामावाटे क्षार आणि युरिक अँसिड बाहेर पडतं. या दोन घटकांमुळे त्वचा नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट होते. स्वच्छ होते. कारण घाम आल्यानं चेहेर्‍याच्या त्वचेची रंध्रं उघडतात. त्यातून आतली घाण बाहेर पडते. कोरड्या त्वचेसाठी तर घाम येणं हे फायदेशीर ठरतं. कारण त्यामुळे त्वचेवर ओलावा राहातो. पण चेहेर्‍यावर आलेला घाम सारखा पुसणं, चेहेरा अधून मधून पाण्यानं स्वच्छ करणं ही आवश्यक गोष्ट आहे. घामामुळे वातावरणातली धूळ, दूषित घटक त्वचेवर चिटकून राहातात. त्यामुळे चेहेर्‍यावर फोड. मुरुम, पुटकुळ्या येण्याची शक्यता असते.

वरील फायदे बघता घामाला यापुढे शत्रू मानण्याची गरज नाही. फक्त घाम स्वच्छ करत राहाण्याची काळजी तेवढी घ्यायला हवी.