वय वाढणं कोणालाच नको असतं. आपण कायम तरुण राहावं, तरुण दिसावं यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. केस पांढरे होऊ नयेत, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू नयेत किंवा आपल्याकडे पाहून आपलं वाढलेलं वय दिसू नये अशी आपली इच्छा असते. मात्र वय वाढतं तशा त्याच्या खुणा आपल्या चेहऱ्यावर काही प्रमाणात का होईना दिसायलाच लागतात. सुरकुत्या दिसू नयेत म्हणून आपण अनेकदा मेकअपची उत्पादने वापरुन त्या लपवण्याचा प्रयत्न करतो. मात्र सतत मेकअप करणे शक्य नसते किंवा त्वचेच्या आरोग्यासाठी ते चांगलेही नसते. अशावेळी काही घरगुती उपायांनी चेहरा चमकदार दिसण्यास मदत झाली तर? पाहूयात स्वयंपाकघरात असणाऱ्या मेथ्यांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करुन चेहऱ्याची चमक कशी वाढवता येईल (Anti Aging Home Remedies Skin Care Tips)...
१. मेथी आणि मध
मेथ्यांमध्ये अँटीऑक्सिडंटस असल्याने फेसपॅक तयार करण्यासाठी मेथीचे दाणे वापरणे उपयुक्त ठरते. त्यासाठी मेथ्यांची मिक्सरमध्ये पावडर करायची. ३ चमचे पावडरमध्ये साधारणपणे २ चमचे मध घालायचा. यामध्ये अंदाजे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची. ही पेस्ट चेहऱ्याला लावून ठेवायची आणि २० मिनीटांनी चेहरा धुवायचा.
२. मेथ्या आणि कोरफड
२ चमचे मेथ्यांची पावडर घेऊन त्यामध्ये ३ चमचे कोरफडीचा ताजा गर घालायचा. ताजा गर नसेल तर कोरफडीची जेलही चालेल. हा पॅक चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनीटांनी धुवून टाकायचा. यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होईल.
३. मेथ्या आणि लिंबू
हा पॅक तयार करण्यासाठी ३ चमचे मेथ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात. सकाळी या मेथ्या मिक्सरमधून काढून यामध्ये लिंबाचा रस आणि गुलाब पाणी घालावे. यामध्ये बेसन किंवा मुलतानी माती घालून त्याची चांगली पेस्ट तयार करावी. हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील फोड, सुरकुत्या, कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.