आपण कायम तरुण दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. पण जसं वय वाढत जातं तशी त्याची लक्षणं चेहऱ्यावर दिसायला लागतात. काही वेळा तर आपण अकाली वृद्ध दिसायला लागतो. यामागे काही शास्त्रीय कारणे असली तरी अनुवंशिकता, सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर, ताणतणाव यांसारख्या गोष्टीही यामागे असू शकतात. पण चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमुळे आपण अकाली वयस्कर दिसायला लागतो. अशावेळी आपल्या स्कीन केअर रुटीनमध्ये काही ठराविक गोष्टींचा समावेश करणे आवश्यक असते. या गोष्टी कोणत्या आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी त्यांचा कसा फायदा होतो याविषयी...
१. रेटीनॉल (Retinol)
रेटीनॉल हा व्हिटॅमिन ए शी निगडीत असणारा एक घटक असतो. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जाण्यास मदत होते तसेच चेहऱ्यावरचे वयाचे मार्क असतील तर तेही यामुळे कमी दिसण्यास मदत होते. या घटकामुळे त्वचेतील पेशींची वाढ होते आणि कोलेजन प्रॉडक्शन वाढण्यास मदत होते. मात्र काहींना या घटकाचा त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी कमी कॉन्सन्ट्रेशनचे वापरणे केव्हाही सोयीस्कर.
२. व्हिटॅमिन सी (Vitamin C)
व्हिटॅमिन सी हा अतिशय पॉवरफूल अँटीऑक्सिडंट असतो. ज्यामुळे फ्रि रॅडीकल डॅमेजपासून त्वचा सुरक्षित राहण्यास मदत होते. कोलेजन वाढण्यास मदत होते त्यामुळे त्वचा उजळ दिसण्यास मदत होते.
३. ह्यालूरोनिक अॅसिड (Hyaluronic Acid)
हा त्वचेतील एक महत्त्वाचा घटक असून त्वचा मोकळी ठेवण्यास आणि त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास याची चांगली मदत होते. वय वाढते तसे या घटकाचे प्रमाण कमी होत जाते आणि त्वचा निस्तेज, कोरडी दिसते. पण या घटकाचा स्कीन केअर रुटीनमध्ये समावेश केल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.
४. पेप्टाइड्स (Peptides)
हे एकप्रकारचे अमिनो अॅसिड असून कोलेजनचे उत्पादन उत्तेजित करण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्वचेचा पोत चांगला राखण्यासाठी हा घटक अतिशय आवश्यक असून त्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.