आपणही बॉलीवूडच्या अभिनेत्रींप्रमाणे कायम तरुण दिसावे असे प्रत्येकीलाच वाटते. माधुरी दिक्षीत, करीना कपूर, शिल्पा शेट्टी आणि मलायका अरोरा यांना आपण यासाठी फॉलोही करतो. पण अनेक प्रयत्न करुनही आपण त्यांच्यासारखे वयाच्या पन्नाशीत तरुण दिसू शकत नाही. इतकेच नाही तर अगदी वयाच्या तिशीतही आपले वय वाढल्यासारखे दिसते. याला अनुवंशिकता, ताण, आहार, जीवनशैली अशी अनेक कारणे असतात. कधी केस लवकर पांढरे झाल्याने तर कधी चेहऱ्यावर सुरकुत्या आल्याने आपल्यातील अनेक जण कमी वयातच म्हातारे दिसायला लागतात. एकदा चेहऱ्यावर वाढलेलं वय दिसायला लागलं की ते कसं लपवायचं हा आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा यक्षप्रश्न असतो (How to Avoid Aging). हे वय लपवण्यासाठी काही जणी पार्लरच्या ट्रिटमेंटचा आधार घेतात. तर काही जणी महागडे ब्यूटी प्रॉडक्ट वापरुन आपले वय लपवण्याचा प्रयत्न करतात. तर काही जणी वेगवेगळे घरगुती उपाय करुन आपण कायम चिरतरुण दिसावे यासाठी प्रयत्न करतात, पण वाढलेले वय काही लपत नाही (Anti aging Tips).
आता चेहऱ्यावर वाढलेलं वय दिसू नये किंवा आपण लवकर म्हातारे होऊ नये म्हणून नेमकं काय करायचं याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी आपल्याला मार्गदर्शन करतात. आरोग्य आणि सौंदर्य या बाबतीत अंजली मुखर्जी आपल्या चाहत्यांना कायम काही ना काही टिप्स देत असतात. त्यांच्या या टिप्सचा आपण रोजच्या जीवनात अवलंब केला तर आपल्या आरोग्याच्या आणि सौंदर्याच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. इन्स्टाग्राम हे सध्या अतिशय प्रसिद्ध आणि सहज उपलब्ध असणारे माध्यम असून अंजली मुखर्जी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात. नुकतीच त्यांनी वाढलेले वय दिसू नये यासाठी १ अतिशय महत्त्वाची गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे.
त्या सांगतात, कोणती एक गोष्ट आहे ज्यामुळे आपण लवकर वयस्कर होतो? तर ही गोष्ट म्हणजे डेझर्ट - साखर, रिफाईंड फ्लोअर म्हणजेच मैदा, फॅटस यांपासून तयार होणारे डेझर्ट म्हणजेच गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात. यामुळे आपण लवकर म्हातारे व्हायला लागतो. यामध्ये केक, पेस्ट्री, आईस्क्रीम, चॉकलेट, कुकीज यांसारख्या सगळ्या पदार्थांचा समावेश होतो. प्रोटीन किंवा लिपीड म्हणून ओळखली जाणारी ही उत्पादने साखरेशी संपर्कात आल्यानंतर ग्लायकेटेड होतात. त्यामुळे त्यांना आपण अॅडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट म्हणतो. हे डेझर्ट आपले वय वाढण्याच्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. इतकेच नाही तर वय वाढल्याने उद्भवणाऱ्या आजारांमध्येही या डेझर्टचा मोठा वाटा असतो. त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहित असायला हवी असं अंजली मुखर्जी सांगतात.