आपलं वय आपल्या चेहऱ्यावर दिसू नये असं प्रत्येकाला वाटतं. आपण कायम चिरतरुण दिसावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते. पण वय वाढतं तशी आपली त्वचा सैल पडायला लागते आणि त्वचेला सुरकुत्या पडायला लागतात. नैसर्गिक नियमानुसार हे होणे स्वाभाविक असते. पण चेहऱ्यावरील आणि एकूणच त्वचा सैल पडू नयेत, चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नयेत म्हणून काय करावे असा प्रश्न मध्यम वयातील महिला कायम विचारतात. यासाठी योगासनांचा निश्चितच उपयोग होतो. पाहूयात कोणती आसने नियमित केल्यास आपण ताजेतवाने आणि बरीच वर्ष टवटवीत राहू शकतो. (Anti Aging Tips) योगसनांमुळे शरीराबरोबरच मनालाही स्थिरता मिळत असल्याने चेहऱ्यावरील ताण आणि पर्यायाने वाढलेले वय कमी दिसते. पाहूयात यासाठी नियमीतपणे कोणती आसनं करायला हवीत.
नौकासन
जमिनीवर बसा. पाय कंबरेतून वर उचला आणि हात आणि पाय जमिनीच्या वर राहतील असे बॅलन्स करा. यामध्ये तुमचा पृष्ठभाग जमिनीला टेकलेला असेल त्यामुळे तुमचे शरीर एखाद्या नौकेप्रमाणे दिसेल. बॅलन्स करणे हे यातील महत्त्वाचे असून त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल.
ताडासन
ताडासनामध्ये शरीराचे सर्व स्नायूंना ताण मिळतो. त्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह चांगला राहण्यास मदत होते. त्यामुळे तुमची त्वचा दिर्घकाळ ताजीतवानी आणि तरुण राहण्यास मदत होते. म्हणून चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नयेत यासाठी हे आसन नियमित करायला हवे.
वृक्षासन
एका पायावर उभे राहून एक पाय जांघेत दुमडा. दोन्ही हातांनी नमस्कार करुन बॅलन्सिंग करा. हे आसन करताना तुम्ही स्थिर राहण्याकडे लक्ष द्यायला हवे. दोन्ही पायाने या आसनाचा सराव करा. तुम्हाला बॅलन्सिंग जमत नसेल तर तुम्ही खुर्ची, भिंत यांचा आधार घेऊ शकता.
वीरभद्रासन
यामध्ये दोन्ही पायांत पुरेसे अंतर घेऊन उभे राहावे. त्यानंतर एका बाजूला वळून त्या पायाचे पाऊल सरळ करावे. हा पाय गुडघ्यात वाकवावा. दोन्ही हात जमिनीला समांतर राहतील असे पाहावे. ५ ते १० सेकंद या स्थितीत उभे राहावे. यामुळे शरीराच्या बहुतांश स्नायूंना ताण पडतो.