Join us  

अनुष्का शर्मा म्हणते, ‘नीम इज बेस्ट’; कडूलिंबाचे 5 घरगुती उपाय, रुप खुलवतात सहज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 5:26 PM

अभिनेत्री अनुष्का शर्मा स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचा आपल्या सौदर्यसाधनेत उपयोग करत असते. त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य जपण्यासाठी ती कडुलिंबाचा उपयोग करते. त्वचा आणि केस जपण्यासाठी कडुलिंबाचे घरगुती उपाय ठरतात परिणामकारक.

ठळक मुद्दे कडुलिंबातील घटक हे त्वचेतील तेलनिर्मितीवर नियंत्रण ठेवतात. चेहर्‍यावरील पुरळ कमी करतात. कडुलिंबाच्या तेलानं केस गळती थांबते आणि केस वाढतात. तसेच हे तेल केसातील कोंड्यावरही उत्तम औषध आहे.त्वचा आणि केसांचा पोत कडुलिंबाच्या उपयोगानं नैसर्गिकरित्या उत्तम होतो.

स्वयंपाकघरातील, बागेतील अनेक गोष्टी इतक्या गुणी असतात की त्यांना सुपरफूड म्हणून ओळखलं जातं. या गोष्टींचा औषधंनिर्मितीसाठी देखील उपयोग केला जातो. अशा गोष्टी आपल्या सौंदर्यविषयक समस्यांवर उपाय ठरु शकतात, आपल्या सौंदर्याची काळजी घेऊ शकतात. ही बाब अनुष्कासारख्या गुणी आणि हुशार अभिनेत्रीला माहिती आहे. म्हणूनच सौंर्यविषयक समस्या गुंतागुंतीच्या होवू नये, किंबहुना त्या निर्माणच होवू नये म्हणून अनुष्का स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचा आपल्या सौदर्यसाधनेत उपयोग करत असते. ‘व्होग ’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं, की ‘ मी औषधी वनस्पतींचा उपयोग त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी करते. तसेच त्वचा डिटॉक्सिफाय होण्यासाठी मी कायम कडुलिंबाच्या पानांचा लेप त्वचेला लावते.’

Image: Google

कडुलिंबातील औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदिक औषधांमधे तिचा उपयोग केला जातो. कडुलिंबात त्वचा आणि केसांसंबंधीच्या अनेक समस्या दूर करण्याची क्षमता असते. कडुलिंबात अँण्टिसेप्टिक, दाहविरोधी, जिवाणूविरोधी आणि अँण्टिएजिंग घटक असतात. त्यामुळे कोणी अँण्टि नीम अर्थात कडुलिंबाविरुध्द राहूच शकणार नाही. याला अनुष्का सारखी नैसर्गिक घटकांना आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचं मानणारी अभिनेत्री अपवाद कशी असेल? कडुलिंबातील घटक हे त्वचेतील तेलनिर्मितीवर नियंत्रण ठेवतात. चेहर्‍यावरील पुरळ कमी करतात, त्वचेवर पडलेले काळेडाग घालवतात. तसेच त्वचेवरील जखमा बर्‍या करण्याची ताकदही कडुलिंबात असते. कडुलिंबात क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेखालील कोलॅजन निर्मितीला ते चालना देऊन त्वचेला मऊ मुलायम ठेवतं तसेच त्वचेचं सुरकुत्यांपासून संरक्षण करतं. कडुलिंब हे केवळ तेलकट त्वचेसाठीच फायदेशीर असतं असं नाही तर कडुलिंबाच्या पानात असलेल्या फॅटी अँसिडमुळे त्वचा आद्र आणि ओलसर ठेवण्यास कडुलिंबाचा फायदा होतो. म्हणूनच त्वचा कोणत्याही प्रकारची असो कडुलिंब सर्व प्रकारच्या त्वचेच्या समस्यांसाठी उपयुक्त ठरतं.

Image: Google

कडुलिंबात केवळ त्वचेचं संरक्षण करणारे घटक असतात असे नाही तर कडुलिंबात बुरशीविरोधक गुणधर्म आणि अँण्टिऑक्सिडण्टस असतात. त्यामुळेच कडुलिंबाच्या पानातून अर्क स्वरुपात काढलेलं कडुलिंबाचं तेल केसांच्या बीजकोषांना ताकद देतं आणि केसांच्या मुळाशी असलेल्या रक्तप्रवाहास चालना देतं. यामुळे केस गळती थांबते आणि केस वाढतात. कडुलिंबाचं तेल हे कोंड्यावरही उत्तम औषध आहे. कारण कडुलिंबाच्या तेलात मॅलॅस्सेझिया ही बुरशी घालवणारे घटक असतात. ही बुरशीच टाळूचा कोरडेपणा वाढून खपल्या पडण्यास कारणीभूत असते. कडुलिंबं त्याच्यातील गुणधर्मामुळे केसांच्या अनेक समस्यांवर प्रभावी ठरतं. कडुलिंबाच्या सहाय्याने त्वचा आणि केसांची काळजी घेणारे घरगुती उपचार सहज करता येतात.

कडुलिंबाचं टोनर

कडुलिंबात असलेल्या नैसर्गिक घटकांचा पुरेपुर वापर करुन घ्यायचा असेल तर एका भांड्यात दोन ग्लास पाणी घ्यावं. त्यात मूठभर कडुलिंबाची पानं आधी पाण्यानं स्वच्छ धुवून उकळण्यास ठेवावीत. पाणी चांगलं खळखळ उकळलं की पानं काढून घ्यावी. हे पाणी एका बाटलीत भरावं. कडुलिंबाचं हे पाणी टोनर म्हणून वापरता येतं. यासाठी दिवसातून तीन चार वेळा चेहरा धुतल्यानंतर कापसाच्या बोळ्यानं कडुलिंबाचं टोनर चेहर्‍यास लावावं. झोपताना तर हे टोनर अवश्य लावावं. यामुळे चेहर्‍यावरील ब्लॅकहेडस, व्हाइट हेडस निघून जातात. तसेच त्वचेची बंदं झालेली रंध्रं उघडून ती श्वास घ्यायला लागतात.

Image: Google

कडुलिंबाचा मुरुमांसाठीचा लेप

तेलकट त्वचा शुध्द होण्यासाठी तसेच चेहर्‍यावर पुरुळ उठू नये आणि असलेली पुरळ कमी व्हावी यसाठी कडुलिंबाचा लेप हा अमृतासारखा काम करतो. यासाठी कडुलिंबाच्या पानांची पावडर घ्यावी. त्यात थोडं बेसन घालावं. दोन्ही चांगलं एकत्र करुन त्यात गुलाब पाणी घालून लेप तयार करावा. हा लेप चेहर्‍यावर बोटांनी हलका मसाज करत लावावा. किमान पाच मिनिटं हा मसाज व्हायला हवा. मसाज झाल्यानंतर हा लेप पुढची 20 मिनिटं चेहर्‍यावर सुकू द्यावा. कडुलिंबातील अँण्टिस्पेटिक गुणधर्म या लेपात असतात त्यामुळे त्वचेचं मुरुम पुटकुळ्यांपासून संरक्षण होतं. चेहर्‍यावरचे डाग, मुरुमांनी पडलेले व्रण हे निघून जातात. कडुलिंबाच्या पावडर ऐवजी कडुलिंबाची ताजी पानं वाटून त्याची पेस्ट करुन त्यात चिमूटभर हळद घालावी. यामुळे त्वचेच्या पेशींची झीज भरुन निघते. तसेच मुरुम पुटकुळ्यांचे डाग निघून जातात.

कडुलिंबाचा मॉश्चरायझिंग लेप

थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. अशा निस्तेज त्वचेला तेज आणण्याचं काम कडुलिंबाची पानं आणि एक चमचा मध करतं. त्वचेचं मॉश्चरायझिंग होण्यासाठी कडुलिंबाची मूठभर पानं धुवून वाटून घ्यावीत. कडुलिंबाच्या पानांच्या या पेस्टमधे मध घालावं. ते चांगलं एकजीव करुन हा लेप चेहर्‍यास लावावा. यामुळे त्वचेतला ओलसरपणा टिकून राहातो.कोंडा घालवणारा हेअर मास्क

कोरफडचा ताजा गर घ्यावा. त्यात कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब टाकावेत. हे मिश्रण चांगलं मिसळून घ्यावं. हा लेप केसांवर अर्धा तास लावून ठेवावा. नंतर केस सौम्य शाम्पूनं धुवावेत. कडुलिंबाच्या तेलात बुरशीनाशक घटक असतात. बुरशीच टाळूला कोरडेपणा आणून खपल्या निघण्यास कारणीभूत ठरते. यामुळेच केसातील कोंडाही वाढतो. पण कडुलिंबाच्या तेलानं डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होते. आणि या लेपात कोरफडीचा गरही असतो. या गरात प्रथिनांचं विघटन करणारे विकर असतात त्यामुळे डोक्यातील खाज बरी होते, खपल्या कमी होतात. तसेच या लेपामुळे टाळूच्या पेशींचं नुकसान भरुन निघतं. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट आणि दही यांचं मिश्रणही यासाठी उपयुक्त मानलं जातं.

Image: Google

केस वाढण्यासाठी लेप

 केस गळत असतील तर कडुलिंबाचा लेप अवश्य आणि नियमित लावायला हवा. कडुलिंबाच्या लेपामुळे केसांचा पोत सुधारतो. तसेच केस पातळ असणं, केस तुटणं, केसांना दोन तोंड फुटणं यासारख्या समस्याही दूर होतात. यासाठी कडुलिंबाची पावडर आणि खोबर्‍याचं तेल एकत्र करुन लेप तयार करावा. हा लेप आठवड्यातून एकदा केसांच्या मुळाशी मसाज करत लावावा. एक तासानं केस सौम्य शाम्पूनं धुवावेत. 

टॅग्स :ब्यूटी टिप्स