आहार हा आपले आरोग्य, सौंदर्य या सगळ्याशी निगडीत असतो. आपण कसा आहार घेतो त्यावर आपली तब्येत आणि त्वचा केस यांचा पोत ठरतो. आहारातून चांगले पोषण होणे आवश्यक असल्याने जीभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी नाही तर शरीराला पोषक घटक मिळण्यासाठी आहार घ्यायला हवा. आपल्याला आहारातून शरीराला आवश्यक ते घटक मिळत नसतील तर व्हिटॅमिन, प्रोटीनची कमतरता, हात-पाय दुखणे किंवा इतर काही ना काही तक्रारी उद्भवतात. त्याचप्रमाणे सौंदर्यासाठीही चांगला आहार घेणे आवश्यक असते. त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर फोड येणे, डाग येणे यांसारख्या समस्यांसाठी काही वेळा आपला आहार कारणीभूत असतो. त्याचप्रमाणे आहारात पोषक घटक नसतील तर केसगळती, केस रुक्ष होणे, पांढरे होणे अशा समस्याही उद्भवतात. त्यामुळे अनुवंशिकता, रासायनिक उत्पादनांचा अतिवापर किंवा इतर अन्य कारणांबरोबरच केस पांढरे होण्यासाठी आहार हेही एक महत्त्वाचे कारण असते. पाहूयात आहारात कोणत्या गोष्टींची कमतरता असेल तर केस पांढरे होतात.
१. प्रथिने
आपले केस हे पूर्णपणे प्रथिनांपासूनच बनलेले असतात. इतकेच नाही तर प्रथिने हा आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हाडांची बळकटी आणि इतर अनेक गोष्टींसाठी शरीरात योग्य प्रमाणात प्रथिने असणे आवश्यक असते. शाकाहार घेणाऱ्या लोकांनी आहारात प्रथिनांचे प्रमाण चांगले ठेवणे आवश्यक आहे. आपल्या वजनाच्या प्रमाणात प्रोटीन मिळणे आवश्यक असून ते आहारातून किंवा सप्लिमेंटच्या माध्यमातून घ्यायला हवेत. एकूण काय तर केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने अतिशय आवश्यक असून केस पांढरे होण्यापासून वाचायचे असेल तर वेळीच आहाराकडे लक्ष द्यायला हवे.
२. ओमेगा ३ फॅटी अॅसिड
ओमेगा ३ फॅटी अॅसिडस हा शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा घटक शरीरात तयार होत नाही. तर तो घटक अन्नातून आपल्याला घ्यावा लागतो. ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे केस मुलायम राहण्यास मदत तर होतेच पण केस गळणेही कमी होते. तसेच केसांची वाढ होण्यासाठी आणि केस पांढरे होऊ नयेत यासाठीही ओमेगा ३ फॅटी अॅसिड उपयुक्त असतात. जवस, चिया सीडस, आक्रोड आणि सोयाबिन हे याचा उत्तम स्त्रोत आहेत.
३. व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी शरीरासाठी आवश्यक असणारे जीवनसत्त्व आहे. आपण घेत असलेला कॅल्शियम योग्य पद्धतीने शरीरात शोषून घ्यायचा असेल तर त्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचा रोल बजावते. हाडे मजबूत आणि बळकट हवी असतील तर व्हिटॅमिन डी शरीरात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर आपले केस लवकर पांढरे होतात. पण व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात घेतले किंवा कमतरता झाली तर केस गळतात त्यामुळे त्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे.
४. लोह आणि तांबे
केस गळणे आणि केस पांढरे होणे यासाठी शरीरात लोह आणि तांबे कमी प्रमाणात असणे हे महत्त्वाचे कारण आहे. लोह कमी असले तर केसांच्या मूळांपर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. रक्तप्रवाह योग्य पद्धतीने न झाल्यास केस खराब होण्यास सुरुवात होते. दिवसाला आपल्याला ८ ते १० मिलीग्रॅम लोह आणि १००० ते १२०० मायक्रोग्रॅम तांबे गरजेचे असते.