‘पी हळद हो गोरी’ अशी म्हण आपल्याला माहितीच आहे. या म्हणीतला महत्त्वाचा भाग म्हणजे हळदीच्या उपयोग त्वचा सुंदर करण्याकामी होतो.हळद ही जशी आरोग्यास उपकारक असते तशीच ती सौंदर्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं काम करते. हळदीमधील गुणधर्मांमुळे हळदीचा उपयोग सौंदर्यविषयक अनेक समस्या घालवण्यासाठे होतो.
हळदीमधे सूज आणि दाह कमी करणारे, एजिंग रोखणारे आणि अँण्टि सेप्टिक गुणधर्म असतात. यामुळेच त्वचेसंबंधीच्या अनेक तक्रारीत हळदीचा उपयोग होतो. त्वचा स्वच्छ करण्यासाठी हळद ही उत्तम असते. क्लीन्जर म्हणून हळदीचा तीन प्रकारे उपयोग करता येतो.
छायाचित्र- गुगल
हळद आणि गुलाबपाणी
हळद आणि गुलाबपाणी यांचा एकत्रित उपयोग केल्याने त्वचेस अनेक फायदे होतात. यासाठी एका वाटीत अर्धा चमचा हळद घ्यावी. त्यात थोडं गुलाबपाणी घालावं. मिश्रण घट्ट आणि मऊ झालं की ती पेस्ट चेहेरा आणि मानेला लावावी. वीस मिनिटानंतर चेहेरा जेव्हा पूर्ण सुकेल तेव्हा लेप थंड पाण्यानं धुवावा. हळद आणि गुलाबपाण्याचं क्लीन्जर वापरल्यानं त्वचा मऊ होते . त्वचेवरील हानीकारक जीवाणूही नष्ट होतात.
छायाचित्र- गुगल
हळद आणि खोबरेल तेल
चेहेर्यावरील मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी हळदीचं हे क्लीन्जर खूप फायदेशीर ठरतं. या क्लीन्जरमुळे चेहेर्यावरील डाग, मुरुम पुटकुळ्या नाहिशा होतात. एका वाटीत एक चमचा हळद, 1 चमचा खोबरेल तेल आणि अंड्यातील पांढरा भाग घ्यावा. हे सर्व नीट एकजीव करावं. ही पेस्ट चेहेरा आणि मानेस लावावी. 20-25 मिनिटं ठेवली की चेहेरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा.
हळदीच्या या क्लीन्जरमुळे त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. हे क्लीन्जर हिवाळ्यात खूपच प्रभावी ठरतं. यामुळे चेहेर्यावरचे डाग जातात, त्वचेचा कोरडेपणा जातो आणि चेहेर्यावरील मुरुम -पुटकुळ्यांची समस्याही दूर होते.
छायाचित्र- गुगल
हळद आणि मध
डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी दही, हळद, आणि मध एकत्र करुन तयार केलेला लेप फायदेशीर असतो. या लेपामुळे डोळ्याच्या आजूबाजूला आलेली सूजही निघून जाते. हळद आणि मधाचा लेप आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या सुरक्षा पुरवतो. हा लेप तयार करण्यासाठी एका वाटीत 1 चमचा हळद, 1 चमचा मध आणि 1 चमचा दही घ्यावं.हे सर्व नीट एकजीव करुन तो लेप चेहेरा आणि मानेस लावावा. पंधरा वीस मिनिटानंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा.
हळदीमुळे त्वचा नैसर्गिकरित्या खुलते, उजळते. पण म्हणून रोज हळद चेहेर्यास लावणं, एकाच वेळी खूप हळद लावणं हे त्वचेसाठी घातक ठरु शकतं. हळद ही औषधासारखी वापरली पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात.