Join us  

मुरुम पुटकुळ्यांनी खराब झालेल्या  चेहेऱ्यावर करा 'ऑरेंज पील ऑफ मास्क'चा उपाय... काही मिनिटात त्वचा रिफ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2022 2:44 PM

संत्र्याच्या वाया जाणाऱ्या सालांचा उपयोग करुन मुरुम पुटकुळ्यांवर प्रभावी उपाय करता येतो. चेहेरा ताजा तवाना करण्यासाठी घरच्याघरी ऑरेंज पील ऑफ मास्कचा उपाय!

ठळक मुद्देमुरुम पुटकुळ्यांचे डाग घालवण्यासाठी संत्र्याच्या सालांचा लेप हा प्रभावी उपाय ठरतो.ऑरेंज पील ऑफ मास्कमुळे चेहेऱ्यावर हेल्दी ग्लो येतो.संत्र्याच्या सालात क जीवनसत्व, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही खनिजं असतात. ऑरेंज पील ऑफ मास्कमुळे संत्र्याच्या सालातील या गुणधर्माचा लाभ त्वचेस होतो.  

वेगवेगळ्या कारणांनी चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात. त्या असताना चेहेरा खराब दिसतोच, पण त्या गेल्यानंतरही डाग, खड्डे, काळपटपणा यामुळे त्यांचा प्रभाव चेहेऱ्यावर राहातोच. मुरुम पुटकुळ्यांची समस्या सारखी येत जात असेल तर या डागांवर उपाय करणं महत्त्वाचं ठरतं. बाजारातील काॅस्मेटिक्स प्रोडक्टस किंवा  पार्लरच्या ट्रीटमेण्टपेक्षा प्रभावी उपाय आपण घरच्या घरी करु शकता. हा उपाय समजून घेण्याच्या आधी एक छोटा प्रश्न.. संत्रं सोलल्यानंतर त्याच्या सालांचं आपण काय करतो? संत्र्याचे  साल फेकून देण्याची सवय असल्यास ही सवय आपल्याला बदलावी लागेल  हे लक्षात आणून देण्यासाठी हा प्रश्न होता. संत्र्याच्या वाया जाणाऱ्या सालांचा उपयोग करुन मुरुम पुटकुळ्यांवर प्रभावी उपाय करता येतो. उन्हाळ्यात  कोमेजून जाणाऱ्या चेहेऱ्याला संत्र्याच्या सालांचा उपयोग करुन तयार करण्यात येणारा लेप लावल्यास काही मिनिटात चेहेरा रिफ्रेश होतो. ताजातवाना दिसतो. चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांचे डाग घालवण्यासाठी ऑरेंज पील ऑफ मास्क हा बाहेर विकतही मिळतो. पण हा लेप घरी तयार करुन लावल्यास त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो. 

Image: Google

ऑरेंज पील ऑफ मास्क कसा करणार?

सर्वात आधी संत्र्याची  सालं कडक उन्हात कडकडीत वाळवून घ्यावीत, संत्र्याची सालं सुकली की ती मिस्करमधून वाटून त्याची बारीक पावडर तयार करावी. ऑरेंज पेल ऑफ मास्क तयार करण्यासाठी एका वाटीत 1 चमचा संत्र्याच्या सालांची पावडर घ्यावी.  त्यात दोन चिमूट हळद घालावी. त्यात थोडं गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करावी. ही चांगली एकत्र करावी. ही पेस्ट संपूर्ण चेहेऱ्याला लावावी. 15 मिनिटं चेहेऱ्यावर हा लेप राहू द्यावा. नंतर  चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

ऑरेंज पील ऑफ मास्क लावताना..

1. घरी तयार केलेलं ऑरेंज पील ऑफ मास्क चेहेऱ्यास लावताना आधी चेहेरा फेस वाॅशनं स्वच्छ धुवावा. चेहेरा रुमालानं अलगद टिपून घ्यावा, त्यानंतर संत्र्याच्या सालांचा हळद आणि गुलाबपाण्यानं तयार केलेला लेप चेहेऱ्यास लावावा. पण जर त्वचा तेलकट असेल तर चेहेरा फेस वाॅशनं स्वच्छ धुतल्यानंतर चेहेऱ्याला थोडं कच्च दूध लावावं. 8-10 मिनिटांनी चेहेरा पाण्यानं धुवावा. नंतर संत्र्याच्या सालांचा लेप चेहेऱ्यास लावावा. लेप लावल्यानंतर तो 15-20 मिनिटं चेहेऱ्यावर राहू द्यावा. लेप काढताना तो कोरडा घासून काढू नये. हात आधी पाण्यानं ओले करुन हातांनी चेहेऱ्यास हलका मसाज करत हळुवार रितीने हे मास्क काढायला हवं. संत्र्याच्या सालांच्या लेपात वापरल्या जाणाऱ्या हळदीतील ॲण्टिबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. घरच्याघरी तयार होणाऱ्या या ऑरेंज पील ऑफ मास्कमुळे चेहेऱ्यावर हेल्दी ग्लो येतो. संत्र्याच्या सालात क जीवनसत्व, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही खनिजं असतात. ऑरेंज पील ऑफ मास्कमुळे संत्र्याच्या सालातील या गुणधर्माचा लाभ त्वचेस होतो.  चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्यांचं प्रमाण जास्त असल्यास आठवड्यातून दोनदा हा लेप लावल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. 

Image: Google

2. त्वची कोरडी असल्यास संत्र्याची सालांची पावडर, गुलाबपाणी, हळद यासोबत थोडं मध घालावं. संत्र्याच्या सालांमध्ये पोटॅशियम आणि मधातील माॅश्चरायझर गुणधर्मामुळे या लेपानं त्वचा ओलसर आणि मऊ राहाते.

3. त्वचेवरचे डाग घालवून त्वचा उजळ होण्यासाठी संत्र्यांच्या सालांच्या पावडरमध्ये थोडं दूध घालून मग हा लेप चेहेऱ्यास लावावा. संत्र्यांची सालं आणि दूध यात असलेल्या खनिजांमुळे त्वचेतील नवीन पेशींची निर्मिती होण्यास , चेहेरा ताजातवाना होण्यास मदत मिळते. 

Image: Google

4. त्वचा स्वच्छ करण्यासाठी, मृत त्वचा काढण्यासाठी, डाग कमी करुन चेहेरा उजळ करण्यासाठी , एजिंगचा धोका कमी करण्यासाठी 2 लहान चमचे संत्र्यांच्या सालांची पावडर, 1 चमचा मध, 1चमचा दही घ्यावं. ते चांगलं एकत्र करुन हा लेप चेहेऱ्यास लावावा. लेप 15 मिनिटं ठेवून चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. चेहेरा रुमालानं टिपल्यानंतर लगेचच चेहऱ्यावर माॅश्चरायझर लावावं.

5. चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी , त्वचेच्या रंध्रातील घाण , जास्तीचं तेल काढून टाकण्यासाठी, ब्लॅकहेडस घालवण्यासाठी 2 चमचे संत्र्याच्या सालांची पाव्डर, 1 चमचा ओटमील, 1 चमचा बेकिंग सोडा घ्यावा. त्यात थोडं पाणी घालून हे मिश्रण चेहेऱ्यावर बोटांनी हलका मसाज करत लावावं.

Image : Google

6. संत्र्याच्या सालांच्या पावडरनं त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी एका वाटीत साखर, संत्र्याचं साल किसून/ मिक्सरमधून वाटून घ्यावं. त्यात थोडं मध आणि खोबऱ्याचं तेल घालावं. हे सर्व नीट एकत्र करुन चेहेऱ्यास हलका मसाज करत लावावं. 10-12 मिनिटं चेहेऱ्यावर गोलाकार मसाज केल्यानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवून चेहेऱ्यास नंतर् माॅश्चरायझर लावावं.

7. त्वचा स्वच्छ होवून त्वचेचं पोषण करण्यासाठी 2 चमचे संत्र्याच्या सालांची पावडर, 1 चमचा दूध, 1 चमचा खोबरेल तेल घ्यावं. ते एकत्र करुन चेहेऱ्यास मसाज करत लावावं.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी