सौंदर्यातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेले केस घनदाट, काळेभोर असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटते. मात्र केस गळणे, कोंडा होणे, केस पातळ होणे, फाटे फुटणे यांसारख्या समस्या उद्भवतात आणि आपली इच्छा इच्छाच राहते. यासाठी केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे असते. आता काळजी घ्यायची म्हणजे काय तर केसांना नियमित तेलाने मसाज करायचा, केस व्यवस्थित शाम्पू आणि कंडीशनर लावून धुवायचे, सिरम लावायचे इ. इ. पण केसांना दर काही दिवसांनी तेलाने मसाज केल्यावर केस गळण्याची समस्या कमी होते किंवा केस घनदाट होतात असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण तेल लावल्यामुळे या समस्या दूर होण्याचे काहीच कारण नसते.
केसांच्या समस्यांसाठी आपण काही ना काही उपाय करुन त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचाही म्हणावा तसा उपयोग होत नाही आणि मग आपण वेगवेगळ्या प्रकारची तेलं लावून केस वाढतात का, गळण्याचे कमी होतात का असे प्रयोग करतो. महागड्या शाम्पूप्रमाणे महागडे तेल वापरले की आपल्या केसांच्या समस्या दूर होतील असे अनेकींना वाटते. पण अशाप्रकारे कोणत्याही तेलाचा केस वाढण्यसाठी उपयोग होत नसतो हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. केसांना रोजच्या रोज तेल लावल्याने त्यांचा पोत सुधारेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तेही साफ चुकीचे आहे. याच विषयावर डॉ. जयश्री शरद यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी केसांनी तेल लावण्याबाबतच्या गैरसमजांबद्दल विस्ताराने सांगितले आहे. पाहूया त्या आपल्या पोस्टमध्ये काय म्हणतात...
तेल केसांसाठी नेमके काय काम करते?
जास्तीत जास्त तेल लावले, तेलाने नियमित मसाज केला की आपले केस गळण्याचे प्रमाण कमी होईल, केसांतील कोंडा कमी होईल असा विचार अनेक जण करतात. पण बदाम तेल, नारळाचे तेल, एरंडेल तेल किंवा अगदी कांद्याचे तेल यांसारखी वेगवेगळी तेलं केसांना लावल्याने केसांचे कंडीशनिंग होते. केस मुलायम होण्यासाठी आणि त्यांना पोषण मिळण्यासाठी तेल लावण्याचा फायदा होतो. केसांसाठी सुरक्षाकवच म्हणून काम करणाऱ्या तेलाने विखुरलेले, कोरडे झालेले केस चापून चोपून बसण्यास मदत होते. मात्र केसांचे गळणे कमी होण्यासाठी किंवा केसांची चांगली वाढ होण्यासाठी तेल लावणे उपयुक्त आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे.
कोंड्याच्या समस्येसाठी काय करावे?
थंडीच्या दिवसांत कोंड्याची समस्या वाढते. इतकेच नाही तर बाराही महिने केसांत कोंडा होण्याची समस्या असणारेही अनेक जण असतात. कोरडेपणामुळे कोंडा होतो हे जरी खरे असले तरी तेल लावल्याने कोरडेपणा आणि पर्यायाने कोंडा कमी होतो असे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात त्याचा काहीही संबंध नाही. केसांतील कोंडा कमी करण्यासाठी केटोकोनाजोल किंवा झिंक पायरीथियोन हे दोन शाम्पू वापरणे उपयुक्त ठरते. या शाम्पूचा वापर करुनही कोंडा कमी होत नसेल तर मात्र त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
केसांचे पोषण होण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा
केस चांगले राहण्यासाठी बाह्य उपाय ज्याप्रमाणे गरजेचे असतात, त्याचप्रमाणे आहारातून मिळणारे पोषणही गरजेचे असते. यामुळे आपल्या आहारात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, क्रोमियम, लोह व खनिजे यांचा समावेश असणे आवश्यक असते. सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये, भाज्या, फळे, दुग्धजन्य पदार्थ यांतून हे घटक शरीराला आणि केसांना मिळतात. याबरोबरच प्रथिनांची एकूण आरोग्य उत्तम राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका असल्याने प्रथिने असलेला आहार घ्यायला हवा.