-निर्मला शेट्टी
सध्या बाजारात गाजर-टमाटय़ांचे ढीगच्या ढीग दिसतात. लालचुटूक ढिगारे पाहूनच आपण फ्रेश होतो. या काळात आपल्या स्वयंपाकातही त्यांचा वापर वाढतो. या दोन भाज्यांमध्ये जीवनसत्त्वं, खनिजं आणि शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे भाजीच काय कोशिंबिरीही आपण भरपूर करतो.गाजर-टमाटे शरीराप्रमाणे त्वचा आणि केसांचेही भरणपोषण करू शकतात, त्यांच्या तक्रारीवर औषध ठरू शकतात हे मात्र आपल्या गावीही नसतं. एक टमाटा आपल्या चेह-यावरचे काळे डाग चटचट गायब करू शकतो हे सांगितलं तर खरं वाटेल तुम्हाला?गाजर आणि टमाटय़ाशी मैत्री करा, महागडी क्रीम्स विसरुन जाल तुम्ही.
गाजर
गाजराचा रस शरीरात गेला की थकलंभागलं शरीर ताजतवानं होतं. खनिजं, जीवनसत्त्वं, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, सल्फर, क्लोरीन हे महत्त्वाचे घटक गाजरामध्ये असतात. पण हे घटक गाजराच्या सालीच्या अगदी जवळ असतात आणि म्हणूनच गाजर स्वयंपाकात वापरताना त्याचं साल काढू नये. फक्त ते चांगलं धुवून घ्यावं. गाजरामधल्या अ आणि क जीवनसत्त्वामुळे गाजराचा उपयोग सौंदर्यप्रसाधन म्हणूनही होतो. चेहरा उजळ करण्यासाठी गाजराचा पॅक खूपच फायदेशीर ठरतो. गाजरातले ‘अ’ जीवनसत्त्व कोरडय़ा त्वचेसाठी, चेहऱ्यावरील मुरुमांसाठी फार गुणकारी. चेहऱ्यावरचे डाग घालवून चेहरा उजळ करण्याचं कामही गाजर करतं. गाजर चावून खाल्लं तर दात स्वच्छ व्हायला मदत होते. गाजराच्या रसात थोडं मीठ टाकून हा रस हिरडय़ांवर चोळला तर हिरडय़ाही मजबूत होतात.
टमाटा
टमाटय़ामध्ये अ, बी 1, बी 2, बी 3, बी 5, बी 6, के जीवनसत्त्वासोबतच मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस असतं. टमाटा हे त्वचेसाठीचं उत्तम खाद्य आहे. त्यातला तुरटपणा मुरुमांना रोखतं. त्वचेची बंद रंध्रे मोकळी करतो आणि त्वचेखालील ग्रंथींना प्रवाही करतो. टमाटय़ातले गुणधर्म त्वचेच्या काळसरपणावरही इलाज करतात. टमाटय़ाच्या रसामध्ये अँण्टिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीरातील टाकाऊ रसायनं बाहेर पडायला मदत होते. त्वचेसोबतच केसांसाठीही टमाटा वापरला जातो. त्याच्या नित्यवापरानं केस चमकदार होतात. केसात कोंडा असेल, डोक्याला कंड सुटला असेल तर ताज्या टमाटय़ाचा रस चोळावा. हा रस सुकायला किमान दहा मिनिटे लागतात. तो सुकल्यावर डोक्यावरून पाणी घ्यावं. केसांमध्ये त्वरित फरक जाणवतो. चेह-यावरचे काळे डाग आणि काळे-पांढरे चट्टे यावर टमाटय़ाचा उपयोग करून बनवलेला पॅक अतिशय उपयुक्त ठरतो.
चेहऱ्यावरच्या काळ्या डागांसाठी टमाटय़ाचा पॅक
या पॅकसाठी चांगल्या प्रतीचा तांदूळ घ्यावा. त्याचं पीठ करुन घ्यावं.कृती- एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा बदामाची पावडर आणि एक चमचा टमाटय़ाचा रस घ्यावा. हे सर्व साहित्य नीट एकत्र करून ही पेस्ट चेह-यावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत तिथे नियमित लावावी.
चेहऱ्यावर चट्टे आहेत?
दोन चमचे टमाटय़ाची पेस्ट, दोन चमचे काकडीची पेस्ट, दोन चमचे बदामाची पावडर, दोन चमचे गाजराची पेस्ट, एक चमचा बदामाचं तेल घ्यावं. सर्व साहित्य एकत्र करून तयार झालेली पेस्ट दिवसातून दोन तीन वेळा चेहऱ्यावरील चट्टय़ांवर लावावी. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा गार पाण्यानं धुवावा.
कोरडय़ा त्वचेसाठी गाजराचा पॅक
गाजराचा कीस, एक चमचा बदामाचं तेल, दोन चमचे बदामाची पावडर आणि दोन चमचे दही. सर्व साहित्य एकत्र करून त्याची मऊसर पेस्ट बनवावी. ही पेस्ट चेह-याला आणि मानेला मसाज करत लावावी. पॅक सुकल्यानंतर थोडं दूध घेऊन तो धुऊन काढावा. पॅक धुतल्यानंतर चेहऱ्यावर थंड पाण्याचे शिपकारे मारावे.
चेहऱ्यावर मुरूम?
एका मोठय़ा गाजराचा कीस, एक किसलेला टमाटा आणि लिंबाचा रस.
गाजराचा आणि टमाटय़ाचा ज्यूस घ्यावा. त्यात लिंबाच्या रसाचे दोन थेंब टाकावे. तयार झालेला हा रस संपूर्ण चेहऱ्याला लावावा. हा ज्यूस त्वचेसाठी टॉनिक म्हणून काम करतो. पॅक एकदा लावून सुकला की परत दोनदा तीनदा लावावा. पॅक तिस-यांदा सुकला की थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. या पॅकमुळे चेहरा चटकन उजळतो.
(लेखिका सौंदर्यतज्ज्ञ आहेत.)
nirmala.shetty@gmail.com