Join us  

तुम्ही हमखास ५ चुका करता, म्हणून तर तुमचे केस गळतात! महागडी प्रॉडक्ट्स वापरुन मग काय उपयोग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 6:42 PM

Hair Care Mistakes That Can Lead To Hair fall : केस सुंदर काळेभोर मुलायम दिसावेत, गळू नयेत असं वाटत असेल तर आजपासूनच ५ चुका करणं बंद करा..

आजकाल बऱ्याच लोकांना केसगळतीच्या समस्येने हैराण केले आहे. केसांमधून नुसता हात फिरवला, कंगवा फिरवला तरीही केस हातात गळून येतात. काहीवेळा तर केस विंचरताना केसांचा अक्षरशः गुच्छच हातात येतो. यांसारख्या समस्यांमुळेच काहीजणांना अकाली टक्कल पडणे, केस विरळ होणे, केसांची वाढ खुंटणे यांसारख्या असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. खरंतर अशा केस गळतीला आपणच कुठेतरी जबाबदार असतो. काहीवेळा न कळत आपल्याच हातून अशा काही चुका होतात की ज्यामुळे केस गळायला सुरुवात होते. आपले केस हे दररोज एका ठराविक मर्यादेपर्यंतच गळतात, परंतु त्यापेक्षा जास्त केस गळत असतील तर आपल्या हातून काही चुका होत असतील. 

काहीवेळा मर्यादेपेक्षा जास्त केसगळती होण्याला आपणच जबाबदार असतो. बऱ्याचदा आपणच आपल्या केसांचे शत्रू बनतो. केसांची काळजी आणि स्टाईल करताना अशा काही चुका केल्या जातात, ज्यामुळे केस गळण्याची समस्या अधिकच वाढू शकते. जर आपण या चुका वेळीच लक्षात घेऊन त्या करायच्या  टाळल्या नाहीत तर केसगळतीच्या गंभीर समस्येला आपल्याला सामोरे जावे लागते. आपल्याला जर केस गळती थांबवून केस लांबसडक आणि घनदाट करायचे  असतील तर केसांना नुकसान पोहोचवणाऱ्या काही गोष्टी करणे कटाक्षाने टाळलेच पाहिजे(Are you making these 5 mistakes that cause hairfall?). 

केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हमखास होणाऱ्या चुका टाळा :- 

१. केस अस्वच्छ ठेवणे :- काही लोक आठवड्यातून एकदाच केसांना शॅम्पू करतात, ज्यामुळे केसांना नुकसान सहन करावे लागते. स्कॅल्पमधील धुळीमुळे केस गळण्याचे प्रमाण अधिकच वाढू लागते. यासाठी वेळोवेळी केसांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. चुकूनही केसांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका.  उन्हाळ्यात केस आठवड्यातून किमान तीन वेळा तरी शॅम्पूने धुवून स्वच्छ करावेत. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ते स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचे आहे. आपण आपले केस कितीवेळा धुवावेत हे आपल्या केसांच्या टेक्श्चरवर अवलंबून असते. काहीजणांचे केस तेल न लावताही तेलकट होतात, तर काहींचे केस जास्तच कोरडे असतात. केसची योग्य स्वच्छता ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा तरी केस धुतलेच पाहिजेत. 

केमिकल शाम्पू लावून लावून केसांचा झाडू झाला? रिठ्याचा ' असा ' करा वापर, केस होतील मऊ चमकदार...

२. ओले केस टॉवेलमध्ये बांधू नये :- अनेकांना केस ओले असताना ते टॉवेलमध्ये बांधण्याची सवय असते. पण असे करू नये. कारण ओले केस टॉवेलमध्ये बांधल्याने ते खराब होतात व तुटतात. म्हणूनच केस ओले असतील तर टॉवेलने पुसून पूर्णपणे कोरडे करावेत. 

मेहेंदी लावूनही पिकलेल्या केसांना हवा तसा रंग येत नाही ? जावेद हबीब सांगतात मेहेंदी लावण्याचे १ खास सिक्रेट...

३. केसांना जोर लावून हाताळणे :- काहीजणांना केस धुवून झाल्यानंतर ओले केस टॉवेलने खसा- खसा घासून पुसायची सवय असते. डोक्यावर तेल लावतानाही टाळूवर तेल घासून लावायची सवय असते. परंतु असे केल्याने केसांच्या मुळांना इजा होऊन ते मोठ्या प्रमाणात तुटू शकतात. यासाठीच केसांना अतिशय हळुवारपणे हाताळले पाहिजे. केस धुतल्यानंतर केसांमधील गुंता काढण्यासाठी मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करावा. गुंता काढण्यासाठी मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर केल्याने केस अलगदपणे मोकळे होतात. छोट्या दातांचा कंगवा वापरल्याने केसांचा अधिकच गुंता होऊन केस तुटतील. यामुळे केसांना जोर लावून हाताळण्यापेक्षा हलक्या हाताने हाताळणे कधीही उत्तम. 

४. केसांना डाय करणे वेगवेगळ्या स्टाईल करणे :- केस पांढरे पडू लागल्यावर काहीजण केसांना डाय किंवा कलर करतात. केसांवर वारंवार डाय किंवा कलर केल्यास त्यातील केमिकल्समुळे केसांच्या मुळांना इजा होऊन केस तुटू शकतात. केसांवर केमिकल्सयुक्त डाय किंवा कलरचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक रंग किंवा मेहेंदीचा वापर करावा. यासोबतच आपण केसांच्या वेगवेगळ्या हेअर स्टाईल करताना हिट असणाऱ्या उपकरणांचा वापर करतो. त्यातील उष्णतेमुळे देखील केसांचे फार नुकसान होते. यामुळे केसांना अशा उपकरणांपासून दूरच ठेवणे योग्य राहील. केसांना अधिक उष्णता दिल्यामुळे ते गळतात किंवा तुटू लागतात. 

मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

५. योग्य आहार न घेणे :- शरीराचं कुठलंही सौंदर्य खुलून येण्यासाठी आतून त्याला पोषण मिळणे खूपच गरजेचे असते. जर शरीराच्या आतूनच बिघाड असेल तर आपण कितीही महागडी प्रॉडक्ट्स वापरून त्याचा काहीच फायदा होत नाही. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य त्या आहाराची गरज असते. ड्रायफ्रूट्स, फळे, पालेभाज्या, धान्ये यांसारख्या इतर गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे.

केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही लाकडी कंगवा वापरा, केसांच्या समस्या चुकीचा कंगवा वापरल्याने वाढतात कारण...

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स