Join us  

हिवाळ्यात तुमचेही डोळे कोरडे झालेत, चुरचुरतात? ८ टिप्स, डोळे होतील सुंदर-पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2022 2:57 PM

Winter Care Eyes थंडीत त्वचा कोरडी पडते, पण डोळ्यांनाही ड्रायनेस जाणवतो, त्यावर हा उपाय.

आपल्या शरीरातील डोळा हा अतिनाजूक व सर्वात महत्वाचा अवयव आहे. जशी आपण प्रत्येक ऋतूंमध्ये अवयवांची काळजी घेतो तशी हिवाळ्यात देखील अवयवांची काळजी घेतली पाहिजे. थंडीच्या दिवसात एकूणच त्वचा, केस, ओठ सतत कोरडे पडण्याची जास्त शक्यता असते. हिवाळ्यात डोळ्यांसंबंधी छोट्या - मोठ्या तक्रारी उद्भवतात. वातावरणातील तापमानात घट झाल्याने डोळे कोरडे पडणे, सतत डोळे लाल होणे, डोळे वारंवार चुरचुरणे, यांसारख्या समस्यांचा सामना हिवाळ्यात करावा लागतो. हिवाळ्यात डोळ्यांच्या संसर्गापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 

काय काय करता येईल?

१. बाहेर जाताना गॉगल्सचा वापर करणे - हिवाळ्यात जर तुम्ही कामानिमित्त घराच्या बाहेर पडत असाल तर प्रवासादरम्यान गॉगल्सचा वापर जरूर करा. जेणेकरून अधिक थंडीपासून तुमचे डोळे सुरक्षित राहू शकतील.     

२. ओमेगा -३ चे सेवन - हिवाळ्यात डोळे कोरडे पडण्याची समस्या टाळण्यासाठी दररोज ओमेगा -३ फॅटी ऍसिडचे सेवन करणे जरुरीचे आहे. यात ओमेगा - ३ ने युक्त अक्रोड, जवस, पालक, ब्रोकोली यांचा समावेश करू शकता. 

३. द्रव्य पदार्थांचे सेवन अधिक करा - हिवाळ्यात द्रव्य पदार्थांचे सेवन अधिक करून आपण हि समस्या दूर करू शकतो. द्रव्य पदार्थांमध्ये सगळ्यांत महत्वाचे म्हणजे पाणी. हिवाळ्याच्या दिवसांत अधिकाधिक पाणी पिऊन तुम्ही स्वतःला हायड्रेटेट ठेवू शकता. पाण्यासोबतच विविध फळ आणि भाज्या यांचे सूप याचा दररोजच्या आहारात समावेश करावा. 

४. माफक प्रमाणात हिटरचा वापर करावा - थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण शेकोटी, हिटर यांचा वापर करून शरीराला उष्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्यातून निघणाऱ्या उष्णतेमुळेसुद्धा त्वचा, डोळे, केस अधिक कोरडे पडू शकतात. त्यामुळे गरज असेल तेव्हाच हिटर किंवा शेकोटीचा वापर करावा. 

५. आय मेकअप रिमूव्ह करा - थंडीच्या दिवसात जर तुम्ही मेकअप केला असेल तर, स्किनच्या मेकअपबरोबरच आय मेकअप रिमूव्ह करायला विसरू नका. 

६. ग्लिसरीन किंवा आय ड्रॉप्सचा वापर - डोळ्यातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी योग्य प्रमाणांत ग्लिसरीन किंवा आय ड्रॉप्सचा वापर करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ग्लिसरीन किंवा आय ड्रॉप्स वापरा. 

७. डोळ्यांची स्वच्छता राखा - दिवसभरात किमान २ ते ३ वेळा कोमट पाण्याचा वापर करून डोळे स्वच्छ धुवून, कोरड्या टॉवेलच्या साहाय्याने स्वच्छ पुसून घ्या. 

८. पापण्यांची हालचाल - जर डोळ्यांत जास्तच ड्रायनेस जाणवला तर पापण्यांची उघडझाप करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी