कधी चेहरा खराब झाला म्हणून किंवा कधी थकवा आला म्हणून आपण चेहऱ्याला मसाज करतो. रक्तप्रवाह सुरळीत होऊन थकवा कमी होण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. फेस मसाजनंतर आपल्याला फ्रेश वाटते आणि चेहऱ्यावर एकप्रकारचा ग्लो येण्यासही याची चांगली मदत होते. कधी आपण घरच्या घरीच मसाज करतो तर कधी पार्लरमध्ये जाऊन फेशियलसारख्या ट्रीटमेंट घेतो, ज्यामध्ये आपल्या चेहऱ्याला छान मसाज केला जातो. मसाज करणे ही एक कला असून त्याबाबात योग्य माहिती असणे आवश्यक आहे. (Skin Care Tips) चुकीच्या पद्धतीने मसाज केला गेल्यास चेहरा आहे त्याहून अधिक खराब होण्याची शक्यता असते. तेव्हा तुम्ही चेहऱ्याला मसाज करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात (Avoid 4 Mistakes While Massaging your Face) याविषयी समजून घेऊया...
१. चुकीच्या दिशेने मसाज करणे
चेहऱ्याला मसाज करताना आपल्या हाताची दिशा योग्य असणे अतिशय गरजेचे असते. पार्लरमध्ये जेव्हा आपण मसाज करायला जातो तेव्हा नेहमी खालच्या बाजुने वरच्या बाजूला मसाज केला जातो. त्यामुळे घरी मसाज करतानाही आपण याच पद्धतीने मसाज करायला हवा. पण आपण असे न करता वरुन खाली मसाज केला तर त्वचा लवकर ओघळायला सुरुवात होते. मग कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्याने आपण लवकर म्हातारे दिसायला लागतो. त्यामुळे मसाज करताना दिशेकडे लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे.
२. योग्य पद्धतीने प्रेशर देणे
चेहऱ्याचा मसाज करताना प्रत्येक ठिकाणी योग्य पद्धतीने प्रेशर देणे आवश्यक असते. काही महिला मसाज करतात पण चेहऱ्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी काहीच दाब देत नाहीत, त्यामुळे मसाज केल्यासारखेच वाटत नाही. त्यामुळे नेमके कोणत्या भागावर किती प्रेशर द्यायचे हे आपल्याला माहित असायला हवे. पण हे प्रेशर प्रमाणापेक्षा जास्त होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. चेहऱ्यावरचे ठराविक पॉईंटस दाबल्यास आपल्याला नकळत रिलॅक्स वाटते आणि त्याठिकाणचा ताण निघून जाण्यास मदत होते.
३. स्वच्छतेची काळजी घेणे
मसाज करताना चेहरा, हात स्वच्छ धुतलेले असायला हवेत. तसेच आपण जे क्रिम, नॅपकीन वापरणार आहोत तेही अतिशय स्वच्छ असायला हवे. चेहरा आणि हात न धुता मसाजला सुरुवात केली तर त्यावर चिकटलेले धुळीचे कण चेहऱ्याच्या रंध्रांमध्ये जातात आणि चेहरा खराब होण्याची शक्यता असते. तसेच हे कण चेहऱ्यात तसेच राहिल्यास फोड येणे, ब्लॅक हेडस किंवा व्हाईट हेडस येणे अशाही समस्या उद्भवतात. म्हणून मसाज करताना चेहरा स्वच्छ धुतलेला असायला हवा.
४. मसाजनंतर बाहेर न जाणे
मसाज केल्यामुळे त्वचेची रंध्रे ओपन होतात. काहीवेळा आपण मसाजनंतर वाफ घेतो, त्यामुळेही रंध्रे ओपन होतात. अशावेळी मसाज झाल्यावर आपण चेहरा उघडा ठेवून बाहेर गेलो तर हवेतील धूळ, प्रदुषणाचे कण चेहऱ्यावर बसतात आणि त्वचेत तसेच राहू शकतात. त्यामुळे चेहरा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मसाज झाल्यावर काही वेळ किमान बाहेर जाणे टाळावे. गेलात तरी चेहरा पूर्ण झाकला जाईल अशा पद्धतीने स्कार्फ बांधून बाहेर जावे.