केसांना तेल लावणे ही केसांच्या आरोग्यासाठी अतिशय नियमित केली जाणारी गोष्ट. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपण केसांची तेलाने चंपी करतोच करतो. कधी रात्री झोपताना तर कधी केस धुण्याच्या काही तास आधी आपण केसांना तेल लावतो. यामध्ये प्रत्येकाच्या आवडीचे तेल वेगळे असते. कधी हे तेल थोडे कोमट करुन तर कधी त्यामध्ये काहीतरी घालून आपण केसांना लावतो. पण तेल लावताना योग्य ती काळजी घेतल्यास केस दिर्घकाळ चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच तेल लावताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत माहिती घ्यायला हवी. किरण कुकरेजा यांनी याबाबतची माहिती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे (Avoid 5 Mistakes While Doing Hair Massage).
१. जास्त तेल लावणे
खूप जास्त तेल लावल्याने केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांना आवश्यक तेवढे तेल लावणे गरेजेचे आहे, मात्र प्रमाणापेक्षा जास्त लावू नये.
२. मुळांना मसाज न करणे
केसांच्या मुळाशी तेल लावताना डोक्याला तेलाने मसाज करणे आवश्यक असते. मात्र अनेकदा आपण घाईत मुळांना मसाज करत नाही. पण केसांच्या मुळांशी मसाज केल्यास डोक्यातील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. त्यामुळे तेलाचा पूर्ण फायदा मिळावा असे वाटत असेल तर किमान काही वेळ केसांना अवश्य मसाज करायला हवा.
३. केसांचे तेल नीट न धुणे
अनेकदा आपण तेल लावतो आणि पूर्ण दिवस-रात्र किंवा २ दिवस तसेच ठेवतो. तेल जास्त वेळ ठेवल्यास केस चांगले राहतील असा आपला समज असतो. मात्र असे करणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. तसेच घाईघाईत केस धुतल्यास तेल नीट निघत नाही. त्यामुळेही केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते.
४. चुकीचे तेल वापरणे
आपल्या केसांचा पोत, त्यांना असलेली तेलाची आणि इतर पोषक घटकांची आवश्यकता यांचा योग्य तो विचार करुन तेलाची निवड करायला हवी. विविध तेलांमध्ये वेगवेगळे घटक असतात, हे घटक आपल्याला सूट होणारे नसतील तर त्याचा उपाय होण्याऐवजी अपाय होऊ शकतो.
५. तेल गरम न करणे
तेल गरम केल्याने त्याच्या पोषणात काही प्रमाणात वाढ होते. त्यामुळे तेल नुसते लावण्यापेक्षा कधीही गरम करुन लावायला हवे. त्यामुळे केसांचे चांगले पोषण होण्यासाठी तेल गरम करुन मगच लावायला हवे.