हिवाळा हा खाण्यापिण्यासाठी आणि व्यायामासाठी अतिशय उत्तम कालावधी मानला जातो. पण या काळात त्वचा आणि केस मात्र खूप रुक्ष होतात. रुक्षतेमुळे या काळात केस गळण्याचे प्रमाणही वाढते. थंडीच्या दिवसांत हवेतील कोरडेपणामुळे केसांतील आणि त्वचेतील आर्द्रता कमी होते. यामुळे केस भुरकट तर दिसतातच पण गळतातही. आपले केस दाट, लांब आणि काळेभोर असावेत असे प्रत्येकीलाच वाटते. मात्र काही ना काही कारणांनी केसांच्या समस्या उद्भवतातच. कधी ते पांढरे होतात, तर कधी गळतात. कधी खूप कोंडा होतो तर कधी वाढच होत नाही. मग आपण पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंटस घेतो किंवा महागडी उत्पादने वापरतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. अशावेळी केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सांगितले आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याशी शेअर करतात. या टिप्स काय आहेत पाहूया (Ayurvedic Hair Care Tips for Hair fall and Dryness in Winter)...
१. तेल मसाज
आठवड्यातून किमान २ वेळा केसांना तीळाचे तेल किंवा खोबरेल तेलाने मसाज करायला हवा. मात्र ज्यांच्या केसांची मुळे तेलकट आहेत त्यांनी आंघोळीच्या आधी केवळ अर्धा ते एक तासच केसांना तेल लावून ठेवावे.
२. मेथ्यांचा वापर
केसांना नियमितपणे हर्बल मास्क लावणेही केसांच्या आरोग्यासाठी अतिशय गरजेचे असते. मेथ्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. मेथ्या रात्रभर पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमधून काढाव्यात. त्यामध्ये दही घालून हे मिश्रण १० ते १५ मिनीटे केसांना लावून ठेवावे. त्यानंतर सल्फेट फ्री शाम्पूने केस धुवावेत. यामुळे कोंडा कमी होऊन केसांची वाढ होण्यास मदत होते.
३. आवळ्याचा हेअर पॅक
आवळा, शिकेकाई आणि रिठा पावडर 3:2:1 या प्रमाणात घ्यावी. यामध्ये दही घालून हे मिश्रण केसांना १० ते २० मिनीटे लावून ठेवावे. त्यानंतर केस साध्या पाण्याने धुवावेत. यामुळे केस नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होते.
४. नस्य
ही आयुर्वेदिक क्रिया असून यामध्ये दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन-दोन थेंब बदाम तेल किंवा खोबरेल तेल घातले जाते. यामुळे केसांच्या मूळांना चांगले पोषण मिळण्यास मदत होते आणि केसांची चांगली वाढ होते. मात्र प्रत्येकाचे आरोग्य वेगळे असल्याने त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला.