केसगळती ही इतकी सामान्य समस्या आहे की अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत अनेकांना केस गळण्याची समस्या सतावते. महिलांबरोबरच पुरुषांमध्येही केस गळण्याचे प्रमाण जास्त असते. एकदा केसांत कंगवा घातला की हातात मोठा गुंता येतो. इतकेच नाही तर जमिनीवर आणि कपड्यांवरही आपले खूप केस पडलेले दिसतात. इतके केस पाहून आपण आता टकले होणार की काय अशी भिती आपल्याला वाटायला लागते (Ayurvedic Remedies to Avoid Hair fall)..
अशावेळी ही केसगळती कमी करण्यासाठी काय करायचं असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. वेळच्या वेळी तेल लावणे, शाम्पू असे सगळे करुनही केस गळतातच. यामागे आहार, केसांचे पोषण होणे, प्रदूषण, ताणतणाव यांसारखी अनेक कारणे असतात. पण केसांचे गळणे आटोक्यात यावे यासाठी काय करावे याविषयी वैद्य मिहीर खत्री काही उपाय सांगतात..
१. अर्धा चमचा आवळा चूर्ण, अर्धा चमचा खडीसाखर आणि अर्धा चमचा तूप एकत्र करावे. देशी गाईचे तूप असलेले चांगले. डायबिटीस असेल तर खडीसाखर घेऊ नका. हे मिश्रण सकाळी अनोशापोटी खावे. त्यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नये.
२. रात्री झोपताना न चुकता १ कप गरम दुधात देशी गाईचे तूप घालून हे दूध प्यावे. याचे आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हीसाठी खूप फायदे होतात. कॅल्शियम आणि प्रोटीन यांचा उत्तम स्त्रोत असल्याने केसगळतीची समस्या दूर होण्यास याचा चांगला उपयोग होतो.
३. याशिवाय आहारात आवळ्याचा वापर वाढवावा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी बरोबरच इतरही अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे आवळा कँडी, सरबत, सुपारी, लोणचं असं काहीही खाल्ल्यास केसगळती कमी होते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
४. याशिवाय नस्य, शिरोधारा यांसारखे आयुर्वेदीक उपायही अतिशय फायदेशीर ठरतात. आपल्या आजुबाजूला असलेल्या आयुर्वेदीक वैद्यांकडून आपण हे उपाय करुन घेऊ शकतो. ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होते.