वयाचा आकडा भलेही वाढू देत पण चेहरा मात्र तरुणच दिसायला हवा, चेहऱ्यावर एक सुरकुतीही दिसू नये अशी सगळ्यांचीच इच्छा. तरुण दिसण्यासाठी मग पार्लरच्या वाऱ्या कराव्या लागतात. महागड्या क्रीम लोशन्सचे पर्याय शोधावे लागतात. हे टाळून तरुण दिसण्याचा प्रभावी उपाय आहे. त्वचेसाठी केळीचा आणि विविध प्रकारे वापर केल्यास एजिंगचा धोका टाळता येतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. त्वचेसाठी फायदेशीर असलेल्या केळीचे चार प्रकारचे लेप तयार करुन चेहऱ्यास लावता येतात.
Image: Google
1. केळी आणि मध
केळी आणि मध दोन्हीही त्वचेसाठी फायदेशीर असतात. केळी आणि मधाच्या फेसपॅकमधून त्वचेस आवश्यक अ आणि ई जीवनसत्वं मिळतात. मधामुळे त्वचा आर्द्र राहाते. त्वचा माॅश्चराइज होते. केळी आणि मधाचा फेसपॅक तयार करण्यासाठी पिकलेलं केळ कुस्करुन घ्यावं. त्यात 1 चमचा मध घालावं. दोन्ही चांगलं एकत्र करुन हा लेप चेहऱ्यास लावावा. लेप लावल्यानंतर 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. या लेपामुळे त्वचेचा रंगही उजळतो आणि त्वचेतला ओलसरपणा राखला जातो.
Image: Google
2. केळी आणि पपई
एजिंगचा धोका टाळण्यासाठी केळी आणि पपईच्या फेसपॅकचा चांगला परिणाम होतो. हा लेप तयार करण्यासाठी पिकलेल्या केळ आणि पिकलेल्या पपईचा तुकडा एकत्र कुस्करुन घ्यावा. यात थोडा काकडीचा रस घालावा. हे सर्व चांगलं एकत्र करुन हा लेप चेहऱ्यास लावावा. लेप लावल्यानंतर 15 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावा. या लेपामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्वचा मऊ मुलायम होते. त्वचेतला ओलसरपणा राखला जातो.
Image: Google
3. केळी आणि दही
केळी आणि दह्याच्या फेसपॅकमुळे चेहरा तरूण दिसतो. केळातील ॲण्टिऑक्सिडण्ट आणि दह्यातील लॅक्टिक ॲसिडमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. केळी आणि दह्याच्या लेपामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि रंगही उजळतो. हा लेप तयार करण्यासाठी अर्धं पिकलेलं केळ घ्यावं. त्यात 2 चमचे दही घालावं. या दोन्ही गोष्टी एकत्र कराव्यात. ही पेस्ट चेहऱ्यास लावावी. 15 मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवावा. हा लेप आठवड्यातून 2-3 वेळा लावल्यास एजिंगचा धोका टळतो.
Image: Google
4. केळी आणि बेसन पीठ
केळीमध्ये बेसन पीठ मिसळून सौंदर्य लेप करण्याचा उपाय फार जुना आहे. हा लेप तयार करण्यासाठी अर्धं पिकलेलं केळ घ्यावं. त्यात 1 चमचा बेसन पीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालावा. हे सर्व नीट मिसळून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट चेहरा आणि मानेस लावावी. 15 मिनिटानंतर चेहरा साध्या पाण्यानं स्वच्छ धुवावा. केळी आणि बेसनाच्या लेपानं त्वचेचा पोत चांगला होतो. त्वचेचा रंग उजळतो. एजिंगचा धोका टाळण्यासाठी केळी बेसनाचा लेप उत्तम मानला जातो.