Join us  

Beaury Tips : नॅचरल ग्लोसाठी करा 4 स्टेप्स मिल्क फेशियल,घरच्याघरी दुधाची जादू- विसराल महागडे फेशियल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2022 1:44 PM

पार्लरमधील महागड्या फेशियलपेक्षा इफेक्टिव्ह फेशियल करता येतं घरच्याघरी! नॅचरल ग्लोसाठी करा 4 स्टेप्स मिल्क फेशियल

ठळक मुद्देमिल्क फेशियल करण्यासाठी कच्चं दूध वापरावं.मिल्क फेशियलमुळे त्वचेस मिळणारे फायदे आणि परिणाम दीर्घकाळ टिकून राहातात.Feature and Thumb Image Courtesy: That Glam Couple

चेहरा सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल केले जातात. पण या फेशियलमुळे येणारी चमक काही काळच टिकते. सारखं सारखं पार्लरमध्ये जाऊन फेशियल करायला न वेळ असतो ना तेवढे पैसे. अशा वेळेस निराश न होता त्यातून मार्ग काढायला हवा. आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी प्रभावी मार्ग घरच्याघरी उपलब्ध आहे. मिल्क फेशियलमुळे चेहऱ्यावरील डाग, मुरुम पुटकुळ्या तर निघून जातातच सोबतच एजिंगच्या प्रक्रियेचा वेगही घटतो.  4 सोप्या स्टेप्समुळे घरच्याघरी मिल्क फेशियल करता येतं. 

Image: Google

स्टेप 1

फेशियल घरी करा किंवा पार्लरमध्ये  सर्वात आधी क्लीन्जिंग करावंच लागतं. चेहरा स्वच्छ करण्यासाठी कच्चं दूध हा उत्तम पर्याय आहे. दुधाचं फेशियल करताना तापवलेलं नाही तर कच्चं दूध वापरावं. एका वाटीत कच्चं दूध घ्यावं. हातानं दूध चेहऱ्याला लावावं. दूध चेहऱ्याला लावताना हलका मसाज करावा. 4-5 मिनिटं मसाज केल्यानंतर चेहरा सुकेपर्यंत थांबावं. चेहरा सुकला की पाण्यानं स्वच्छ धुवावा.

स्टेप 2

चेहरा दुधान स्वच्छ केल्यानंतर स्क्रब करावा. स्क्रबिंगमुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जाऊन त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.  दुधाचं फेशियल करताना स्क्रबिंगसाठी कच्च्या दुधात काॅफी पावडर घालून ती मिसळून घ्यावी. या मिश्रणानं चेहऱ्याचा 5 मिनिटं मसाज करावा. मसाज झाल्यानंतर थोडा वेळ थांबावं.  5 ते 7 मिनिटांनी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

स्टेप 3

चेहरा स्क्रब केल्यानंतर मसाज करणं महत्वाचं असतं. मसाजमुळे त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेवर चमक येते. मसाज करण्यासाठी एका वाटीत थोडं कच्चं दूध आणि मध घ्यावं. ते चांगलं मिसळून घ्यावं. या मिश्रणानं चेहऱ्याचा हलक्या हातानं मसाज करावा. मसाज झाल्यानंतर हे मिश्रण 10 मिनिटं चेहऱ्यावर राहू द्यावं. नंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

स्टेप 4 

फेशियल करताना सर्वात शेवटी फेस पॅक लावणं आवश्यक असतं. फेसपॅक करताना एका वाटीत एक मोठा चमचा क्च्चं दूध घ्यावं. त्यात थोडी कुस्करलेली पपई घालून ती दूधात एकजीव करावी. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावं. लेप लावल्यानंतर 10-15 मिनिटांनी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

मिल्क फेशियलचे फायदे

1. दुधातील लॅक्टिक ॲसिडमुळे एजिंगचा धोका टळतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. दुधामुळे त्वचेखालील कोलॅजनच्या निर्मितीला चालना मिळते. दुधातील ड जीवनसत्वामुळे त्वचेची लवचिकता वाढते. चेहरा नैसर्गिकरित्या तरुण दिसतो. उन्हामुळे रापलेली, खराब झालेली त्वचा मिल्क फेशियलमुळे बरी होण्यास मदत होते. 

2. दुधामध्ये बिटा हायड्राॅक्सी हे ॲसिड असतं. या घटकामुळे चेहऱ्यावरील डाग निघून जातात. चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. 

3. दुधात माॅश्चरायजिंग गुणधर्म असल्यानं दुधाच्या फेशियलमुळे त्वचा माॅश्चराइज होते. त्वचेचा खरबरीतपणा निघून जाऊन त्वचा मऊ मुलायम होते. 

4. दुधात असलेल्या जीवनसत्वांमुळे चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या निघून जातात. चेहऱ्यावरील जास्तीचं तेल निघून जातं. मुरुम पुटकुळ्यांना कारणीभूत असलेले सूक्ष्मजंतू दुधातील लॅक्टिक ॲसिडमुळे निघून जातात. दुधातील या घटकामुळे मुरुम पुटकुळ्यांमुळे चेहऱ्याचा होणारा दाह कमी होतो. तसेच चेहऱ्यावरील खराब त्वचेचा थर निघून जाऊन चेहरा नैसर्गिकरित्या उजळ होण्यास मदत होते. दुधाच्या फेशियलमुळे त्वचेस मिळणारे फायदे आणि परिणाम दीर्घकाळ टिकून राहातात.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीदूध