केस दुभंगणे म्हणजेच Split ends hair ही समस्या दर १० जणींपैकी ६ जणींना असते. केस दुभंगण्याला काही भागांमध्ये केसांना उंदरी लागणे असेही म्हणतात. सामान्यपणे केसांना जर अशी समस्या जाणवू लागली तर सरळ ते केस कापून टाकण्याकडेच अनेकींचा ओढा असतो. जर केसांना खूपच जास्त फाटे फुटले असतील, तर केस कापण्याशिवाय दुसरा पर्याय पण नसतो. पण ही समस्या जर उद्भवूच द्यायची नसेल, तर सुरूवातीपासूनच आपण काही गोष्टी करणे आणि केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तर आपण केसांना फाटे फुटण्याची कारणे कोणती आहेत, ते पाहू.
या कारणांमुळे केसांना फाटे फुटतात
१. केसांना योग्य प्रमाणात तेल न मिळणे
तेल म्हणजे केसांचे पोषण. जर केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळाले नाही, तर ते रूक्ष, कोरडे होतात. केस कोरडे झाल्यावर त्यांना फाटे फुटू लागतात. त्यामुळे केस वारंवार दुभंगत असतील तर आठवड्यातून दोनदा केसांना गरम तेलाने मालिश करणे खूप गरजेचे आहे. केसांच्या मुळाशी तर मसाज कराच पण थोडे तेल केसांच्या खालच्या टोकांवर पण नक्की लावा.
२. हिटिंग टूल्सचा अतिवापर
केस वारंवार कर्ल करण्याची किंवा केसांना स्ट्रेटनिंग करण्याची सवय अनेकींना असते. कधीतरी केसांवर असे प्रयोग केल्यास हरकत नाही. पण काही जणी मात्र महिन्यातून २- ३ वेळेस किंवा बऱ्याचदा तर त्यापेक्षाही अधिक वेळेस केसांसाठी हिटिंग टूल्स वापरतात. यामुळे केस दुभंगतात.
३. वारंवार केस धुणे
आठवड्यातून दोन वेळा शाम्पू लावून केस धुणे योग्य आहे. पण अनेकजणी दर एक दिवसाआड केस धुतात आणि प्रत्येकवेळी शाम्पू वापरतात. यामुळे केसांमधले नॅचरल ऑईल नष्ट होत जाते आणि केस रूक्ष होऊन त्यांना फाटे फुटू लागतात.
४. जास्त कडक पाण्याने केस धुणे
केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे. पण बऱ्याचदा आंघोळीसाठी जसे गरम किंवा कडक पाणी वापरले जाते, तसेच पाणी केस धुण्यासाठी पण वापरले जाते. यामुळे केसांना कोरडेपणा येतो आणि अतिकडक पाण्याने केसांचे नुकसान होते.
केसांना फाटे फुटू नयेत म्हणून हे उपाय करा....
१. लिव्ह इन कंडिशनरचा वापर करा
केस धुतल्यानंतर जेव्हा आपण टॉवेलने पुसतो, त्यानंतर केसांवर लावण्याचे कंडिशनर म्हणजे लिव्ह इन कंडिशनर. यामुळे केसांना चांगले पोषण मिळते आणि ते चमकदार होतात. केस ज्या दिशेने वाढतात, त्या दिशेने हे कंडिशनर लावावे. केसांच्या टोकाला पण हे कंडीशनर अवश्य लावावे.
२. कोमट तेलाने मालिश
केसांचे पोषण करण्याचा हा एक सर्वोत्तम उपाय आहे. जर केसांच्या मुळांशी चांगली मसाज केली तर तिथली त्वचा निरोगी होते. डेड स्किन वाढत नाही. त्यामुळे मग केसांची वाढही निरोगी होते. केसांना कोमट तेलाने मालिश करा. तसेच आंघोळ झाल्यानंतर टॉवेल काही काळ केसांभोवती तसाच गुंडाळून ठेवा आणि ासाधारण १५ ते २० मिनिटांनी केसांचा टॉवेल काढून ते हळूवार पुसा.
३. केळीचा हेअरमास्क
सगळ्यात आधी तर केळ व्यवस्थित स्मॅश करून घ्या. त्याच्यात एक टेबलस्पून एरंडेल तेल, दोन टेबलस्पून दूध आणि एक टेबलस्पून मध घाला. हा हेअरमास्क आठवड्यातून एकदा केसांवर लावा. २० ते २५ मिनिटांनी कोमट पाण्याने केस धुवून टाका. केसांना फाटे फुटू नयेत, म्हणून हा एक सर्वोत्तम उपाय आहे.
४. मध आणि दही
केस दुभंगण्याची समस्या कमी व्हावी, म्हणून हा प्रयोग अवश्य करून पहा. यासाठी तीन टेबलस्पून दही आणि एक टेबलस्पून मध असे प्रमाण घ्यावे. हे मिश्रण व्यवस्थित कालवून केसांना लावावे. साधारण अर्धा तास हा पॅक केसांवर राहू द्यावा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून टाकावे.
५. पपई आणि दही हेअरमास्क
पपईमध्ये प्रोटिन्स आणि ॲमिनो ॲसिडचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे साधारण एक बाऊल पपईच्या फोडी घ्या. त्या मिक्सरमध्ये फिरवून वाटून घ्या. त्यामध्ये अर्धा कप दही टाका. हे मिश्रण अर्धा तास केसांवर ठेवा आणि त्यानंतर धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास केस दुभंगण्याची समस्या कमी होते.