वर्षानुवर्षांपासून आपण केस धुतो. आठवड्याला २- ३ वेळेला केसांना शाम्पू करतो. मग केस कसे धुवावेत, यात काय सांगण्यासारखं आहे, असं काही जणींना वाटू शकतं. पण वारंवार चुकीच्या पद्धतीने केस धुतल्या गेले तर केसांचे प्रचंड नुकसान होते. "केस धुतले की खूप जास्त गळतात, त्यामुळे केस धुवावेच वाटत नाहीत..." असाही काही जणींचा अनुभव आहे. केस धुतले की बाथरूममध्येही मोठ्या प्रमाणात केस दिसतात आणि नंतर केस विंचरतानाही खूप केस जमिनीवर पडलेले, कंगव्यात अडकलेले दिसतात. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे केस धुण्याची चुकीची पद्धत.
ज्याप्रमाणे केसांना तेल कसं लावावं, डोक्याची मालिश कशी करावी, केस कसे विंचरावेत, याची एक विशिष्ट पद्धत असते, तसंच केस कसे धुवावेत, याचंही तंत्र असतं. ओले केस अतिशय नाजूक असतात. त्यामुळे केस धुताना ते तुटण्याची आणि कमकुवत होण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणूनच केस धुताना योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे.
केस धुताना या गोष्टी करा
१. ज्या दिवशी केस धुवायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी केसांना कोमट तेलाने मालिश करा. बोटांच्या अग्रभागाने केसांची मसाज करावी. मालिश करताना कधीही तळव्याच्या मदतीने डोक्याचा भाग रगडू नये. ज्यांना पिंपल्स येण्याचा त्रास असतो, अशांनी केस धुण्याच्या दोन तास आधी केसांना हळूवार हाताने मसाज करावी.
२. केसांचा गुंता काढावा.
केसांना मालिश केली की केस एकमेकांमध्ये गुंततात, अडकतात. बऱ्याच जणी असा विचार करतात की आता केस धुवायचेच आहेत, तर मग केस धुवूनच केसांचा गुंता काढावा. पण असे करण्याची सवय चुकीची आहे. मसाज केल्यानंतर लगेचच मोठ्या दाताच्या कंगव्याने केस विंचरा आणि त्यांच्यातला गुंता काढून टाका. आधीच गुंतलेले केस जर धुतले तर ते एकमेकांमध्ये जास्तच अडकून जातात आणि मग अशा केसांचा गुंता काढताना केसांचे खूपच नुकसान होते. त्यामुळे केसांना तेल लावले की नाहण्याच्या आधी गुंता काढावा.
३. केस धुण्यासाठी थंड पाणी वापरा
केस धुण्यासाठी गरम किंवा कोमट पाणी वापरणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे डोक्याची त्वचा कोरडी आणि शुष्क होते. कोरड्या त्वचेत कोंडा निर्माण होतो. कोंड्यामुळे केस गळती वाढते. थंड पाण्याने केस धुतल्यास डोक्याच्या त्वचेवरील रोमछिद्र बंद होतात. त्वचेतील नैसर्गिक ओलावा कायम राहून त्वचा निरोगी राहते. तसेच रक्तप्रवाह सुरळीत होते. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते.
४. असा करा शाम्पू
सगळ्यात आधी केस योग्य पद्धतीने ओले करा. हातावर शाम्पू घेऊन केसांवर थेट कधीही लावू नये. शाम्पू आधी पाण्यात मिक्स करा आणि मग त्या पाण्याने केस धुवा. असे केल्याने शाम्पू केसांच्या सगळ्या भागांवर योग्य प्रमाणात लावला जातो. शाम्पूचे पाणी डोक्यावर टाकल्यानंतर हाताच्या तळव्याने केस रगडू नका. बोटांच्या अग्रभागाने हळूवार गोलाकार दिशेने चोळा आणि नंतर थंड पाणी टाकून केस धुवा.
५. कंडिशनर करताना काळजी घ्या
केसांना जेव्हा कंडिशनर लावता, तेव्हा केस चोळण्याची मुळीच गरज नसते. केसांची वाढ ज्या दिशेने होत आहे, त्या दिशेने अलगद हात फिरवून केसांना कंडिशनर लावा. कंडिशनर लावल्यानंतर गरम पाणी ओतून केस धुवू नका. थंड पाण्याचा वापर करून केस धुवा.
६. हळूवार केस पुसा
ओल्या केसांवर गुंडाळलेला टॉवेल काही काळ तसाच राहू द्या. १० ते १५ मिनिटांनी टॉवेल काढा आणि त्यानंतर अतिशय अलगदपणे केस पुसून घ्या. केस पुसताना अजिबात चोळू नका.