Join us  

विसरा ब्यूटी प्रॉडक्टस, करा ब्यूटी डाएट.. आहारात फक्त 4 गोष्टी खा- दिसाल सुंदरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 12:26 PM

सुंदर दिसण्यासाठी ब्यूटी प्रोडक्टस नाही ब्यूटी डाएट महत्वाचं; आहारातल्या 4 गोष्टी वाढवतात नैसर्गिक सौंदर्य

ठळक मुद्देसौंदर्य जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करणं महत्वाचं. आहार आणि सौंदर्य यांचा थेट संबंध असतो.   

सौंदर्य जपलं की ते वाढतं. सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी इंस्टंट परिणाम मिळवून देणारे ब्यूटी प्रोडक्टस आहेत. पण त्यांच्या वापरामुळे फायदे कमी आणि त्वचेवर वाईट परिणाम जास्त होतात. सौंदर्य जपण्यासाठी आपण कोणते ब्यूटी प्रोडक्टस लावतो हे महत्वाचं नसतं. सौंदर्य जपण्यासाठी ( Natural beauty)  आपण नैसर्गिक घटकांचा किती वापर करतो हे महत्वाचं असतं. नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी आहार आणि पोषणमुल्यं तज्ज्ञ  अनुपमा गिरोत्रा यांनी आहारातून पोषण मिळणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. सौंदर्यासाठीचं आवश्यक पोषण आहारातून मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा (food for natural beauty)  समावेश करावा याबद्दल अनुपमा गिरोत्रा यांनी मार्गदर्शन केलं आहे.

Image: Google

त्रिफळा

त्रिफळा  म्हणजे आवळा, हरितकी आणि बिभितकी या तीन घटकांचं मिश्र्रण असतं. उत्तम आरोग्यासाठी त्रिफळा सेवन करण्याचा सल्ला डाॅक्टरही देतात. चमकदार त्वचेसाठी ( glowing skin) त्रिफळा नियमित सेवन करावा. त्रिफळातील घटक त्वचेवरील हानिकारक जिवाणू नष्ट करतात. यामुळे चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येत नाही. त्रिफळाच्या सेवनानं त्वचा ही सुंदर आणि तरुण राहाते. त्रिफळा चूर्ण आणि द्रावणाच्या रुपात मिळतं. रोज रात्री त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत घेतल्यास त्याचा सौंदर्यवृध्दीसाठी फायदा होतो. 

Image: Google

केळं

चेहऱ्यावरचं नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी आहारात केळाचा समावेश करायला हवा. केळामध्ये ट्रिप्टोफॅन आणि ब जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं. रोज एक केळं खाल्ल्यास चेहेऱ्यावरील मरगळ दूर  होते आणि चेहेरा ताजा तवाना दिसतो. 

Image: Google

बटाटा

आपलं नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी बटाट्याचा खूप उपयोग होतो. बटाट्यात ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. त्याचा उपयोग चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी होतो. बटाटा कोणत्याही प्रकारे सेवन केल्यास डोळ्यखालील काळी वर्तुळं, सूज या समस्या कमी होण्यास मदत होते. बटाटा चेहेऱ्याला लावल्याने जसा फायदा होतो तसाच फायदा बटाटा खाल्ल्यानेही होतो. 

Image: Google

व्हीटग्रास पावडर

गव्हाच्या तृणांचा रसा हा आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. गव्हाच्या तृणांमध्ये अ, क आणि ई जीवनसत्वं मोठ्या प्रमाणात असतात. गव्हाच्या तृणांपासून तयार केलेल्या पावडरीमध्ये त्वचेवरील विषारी घटक काढून टाकण्याचे, चेहेरा स्वच्छ करण्याचे आणि चेहेऱ्यावरील घाव बरे करण्याचे गुणधर्म असतात. ही व्हीटग्रास पावडर आयुर्वेदिक उत्पादनांच्या दुकानात मिळते.  रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात 1 चमचा व्हीटग्रास पावडर  टाकून सेवन केल्यास चेहेऱ्याची त्वचा स्वच्छ होते आणि चेहेऱ्यावर तेज येतं.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआहार योजना