Join us  

तजेलदार चेहेर्‍यासाठी करा घरच्या घरी फ्रूट फेशियल.फक्त 5 स्टेप्स आणि फेशियल  फर्स्टक्लास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 5:59 PM

घरच्याघ री फ्रूट फेशियल करणं अवघड नाही. आवडीची, एकाच प्रकृतीची एकापेक्षा जास्त फळं घ्यावीत आणि फेशियल करुन पार्लरसारखा इफेक्ट मिळवा.

ठळक मुद्देफ्रूट फेशियल करताना सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात की एकापेक्षा अधिक फळांचा कमीत कमी तीन फळांचा वापर करावा.एकाच प्रकृतीची आणि पोताची फळं एकत्र केल्यास त्याचा त्वचेला फायदा होतो.फ्रूट फेस पॅक तयार करताना एक काळजी घ्यावी की आपण ज्या फळांचा उपयोग करुन फेशियल क्रीम केली आहे तीच फळं वापरावीत.छायाचित्रं- गुगल

चेहेरा तजेलदार दिसण्यासाठी ब्यूटी पार्लरमधे जाऊन फेशियल करणं गरजेचंच असतं असं बहुतेकजणींना वाटतं. पण फेशियल हे घरच्याघरीही करता येतं हे माहिती आहे का? पार्लरमधे बर्‍याच महिलांना, तरुण मुलींना फ्रूट फेशियल करायला आवडतं. हे फ्रूट फेशियल आपण घरच्यघरी करु शकतो. फक्त हे फ्रूट फेशियल करताना कोणती फळं वापरायची, फ्रूट फेशियलच्या स्टेप्स काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे.

तीन फळांचं फ्रूट फेशियल

घरात जे फळ उपलब्ध आहे त्या फळाच्य सहाय्यानं फ्रूट फेशियल करता येतं. पण फ्रूट फेशियल करताना सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात की एकापेक्षा अधिक फळांचा कमीत कमी तीन फळांचा वापर करावा. एकाच प्रकृतीची आणि पोताची फळं एकत्र केल्यास त्याचा त्वचेला फायदा होतो. जसं सफरचंद, केळं, आंबा, पपईसारखे क्रीमी अर्थात गरयुक्त फळं एकत्र करुन फ्रूट फेशियल करता येतं. तसेच संत्री, द्राक्षं, लिंबू, आलूबुखार, पीच यासारखी सायट्रिक म्हणजेच आंबट फळांना एकत्र करुन फेशियल करता येतं. फ्रूट फेशियलसाठी तीन फळं एकत्र करणं यासाठी महत्त्वाचं असतं कारण प्रत्येक फळात वेगवेगळे घटक आणि गुणधर्म असतात. हे घटक आपल्या चेहेर्‍यावर वेगवेगळ्या पध्दतीनं काम करतात आणि त्याचा चांगला परिणाम होतो.

छायाचित्र- गुगल

फ्रूट फेशियलसाठी कोणती फळं घ्यावीत?

* पपई- पपईमधे अँण्टिऑक्सिडण्टस असतात आणि पपईत अ आणि ई ही दोन जीवनसत्तं मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक त्वचेस तरुण आणि तजेलदार ठेवतात.* द्राक्षं- द्राक्षात क जीवनसत्त्वं असतं . तसेच त्वचेस तरुण राखणारे घटक द्राक्षात मोठ्या प्रमाणात असतात. द्राक्षातील गुणधर्म त्वचेस खराब होण्यापासून सुरक्षित ठेवतात.* स्ट्रॉबेरी- चेहेर्‍यावर जर सुरकुत्या असतील तर फ्रूट फेशियलमधे स्ट्रॉबेरीचा समावेश अवश्य करावा.* सफरचंद- कोरड्या आणि खराब झालेल्या त्वचेसाठी सफरचंदमधील घटक प्रभावी ठरतात.* अंजीर- त्वचेतील सीबम या घटकाचं नियंत्रण करणं गरजेचं असतं आणि त्वचेतला ओलसरपणा जपणंही महत्त्वाचं असतं. या दोन्ही गोष्टींसाठी अंजीर फारच फायदेशीर असतं. * काकडी- काकडीतील गुणधर्म उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेला खाज सुटणे या त्रासापांसून त्वचेचं रक्षण करतात.* केळ- केळामधे सुरकुत्या दूर करणारं नैसर्गिक रसायन असतं. केळाला नैसर्गिक बोटॉक्स असं म्हटलं जातं.* याशिवाय फ्रूट फेशियलमधे मध, दूध, दही, ओटमील, गुलाबपाणी, बदामाचं तेल, विटामिन ई कॅप्सूल, साय, कॉफी पावडर यासारखे घटक मिसळू शकता.* आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे ओळखून त्याप्रमाणे फळं आणि इतर घटक फ्रूट फेशिअयलमधे वापरु शकता.

छायाचित्र- गुगल

कसं करायचं फ्रूट फेशियल?

1. फेशियल करताना सर्वात आधी चेहेरा स्वच्छ करावा. आधी चेहेरा पाण्यानं धुवावा आणि नंतर नैसर्गिक क्लीन्जरचा उपयोग करुन चेहेरा स्वच्छ करावा. यासाठी क्लीन्जींग मिल्क आणि गुलाबपाणी किंवा कोरफड जेल वापरु शकता. नैसर्गिक क्लीन्जरच्या सहाय्याने चेहेरा स्वच्छ करताना चेहेर्‍यावर बोटांनी गोल गोल मसाज करावा. त्यानंतर चेहेरा कोमट पाण्यानं धुवावा. यामुळे चेहेर्‍यावरील रंध्र मोकळी होतात आणि त्यातील घाण निघून जाते.

2. क्लीन्जींग झाल्यावर त्वचा एक्सफोलिएट होणं गरजेचं असतं. त्वचेच्या एक्सफोलिएशनसाठी कॉफी पावडर, ओटमील पावडर, ब्राऊन शुगर, टमाट्याचा गर आणि थोडी हळद यांचा वापर करता येतो. टमाटा आणि हळद सोडून बाकी सर्व घटक फळांच्या फळांच्या गरामधे मिक्स करुन चेहेरा एक्सफोलिएट करता येतो. यासाठी संत्री, काकडीची पेस्ट, द्राक्षं या फळातील गरासोबत वरील कोणताही घटक मिसळून चेहेरा एक्सफोलिएट करता येतो.चेहेरा एक्सफोलिएट करताना चेहेर्‍यावर मध्यम दाब द्यायला हवा. जर जास्तच रगडलं तर त्वचा फाटते. आपण एक्सफोलिएटसाठी जी पेस्ट वापरणार आहोत ती जास्त पातळ ठेवू नये. पातळ पेस्ट असेल तर एक्सफोलिएशन नीट होत नाही.तसेच ही पेस्ट खूप घट्टही असता कामा नये. कारण पेस्ट घट्ट असली तर त्वचा फाटून रक्त येऊ शकतं.

3. नंतर आपल्या आवडत्या फळांच्या गराच्या सहाय्याने चेहेर्‍याला मसाज करावा. कोणतीही एका गटातली, एका प्रकृतीची तीन फळं एकत्र करुन हा मसाज करता येतो. आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे फळं निवडावीत. जर आपण फेशियल मसाजसाठी गरयुक्त फळं घेणार असू तर त्यात थोडं मध आणि विटामिन ई ऑईलचे काही थेंब घालावेत. जर फेशियल मसाजसाठी आंबट चवीची फळं घेतली तर त्यात दही आणि बदाम तेल घालावं. क्रीमसारखी पेस्ट करुन त्याने चेहेर्‍यास दहा मिनिटं मसाज करावा. मसाज करताना मध्यम दाब देऊन करावा. मसाज हा बोटं गोल फिरवत करावा. फेशियल मसाजसाठी पेस्ट करताना त्यात मॉश्चराइजिंग घटक आहेत ना याची काळजी घ्यावी. नाहीतर त्वचा कोरडी पडते.

4. फेशियल मसाज झाला की पाच मिनिटं चेहेर्‍यास वाफ घ्यावी. वाफ घेतल्यानं चेहेरा स्वच्छ होतो आणि त्वचा चमकदार होते. अनेकांना चेहेर्‍यास वाफ घेतल्यानं पुटकुळ्या येतात. असा अनुभव असेल तर वाफ घेणं टाळावं. वाफ घेतल्यानंतर चेहेरा सुती कपड्यानं किंवा मऊ टिश्यू पेपरनं पुसणं आवश्यक असतं.

5. या सर्व क्रिया करुन झाल्या की आता फ्रूट फेस पॅकचा उपयोग करावा. फ्रूट फेस पॅक तयार करताना एक काळजी घ्यावी की आपण ज्या फळांचा उपयोग करुन फेशियल क्रीम केली आहे तीच फळं वापरावीत. फ्रूट फेस पॅक तयार करताना फळांचा गर, मध, दूध, साय हे घटक टाकावेत आणि ते चांगले मिसळून एकजीव करावेत. हा पॅक चेहेर्‍यावर 10 मिनिटं लावावा. नंतर थंड पाण्यान किंवा कोमट पाण्यानं चेहेरा धुवावा. यामुळे त्वचेवरील रंध्र बंद होतात. त्यानंतर चेहेरा रुमालानं न पुसता हवेत कोरडा होवू द्यावा. चेहेरा सुकला की चेहेर्‍याला मॉश्चरायझर लावावं.