लहानपणी आपल्यापैकी अनेक जणींची आजी किंवा आई काय सांगायची ते आठवतं का.... त्या म्हणायच्या की बेसन पीठात (besan)थोडी हळद घाल आणि चेहऱ्याला लाव, यामुळे चेहरा टवटवीत होईल... मैत्रिणींनो आठवतो हा तुम्ही केलेला प्रयोग. भारतातल्या ९० टक्के महिलांनी हा सौंदर्योपचार (beauty treatments) केला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जुनं ते साेनं म्हणतात ना, ते या बाबतीत अगदी १०० टक्के लागू होतं. कारण हरबरा डाळीचं पीठ किंवा बेसन डाळीचं पीठ हा आपल्या त्वचेसाठी अतिशय उत्तम असा फेसपॅक (facepack)आहे.
डाळीचं पीठ तुम्ही कशासोबत आणि किती प्रमाणात वापरता आहात, हे या बाबतीत महत्त्वाचं ठरतं. तुमचा चेहरा निस्तेज झाला असेल, चेहरा काळवंडला असेल किंवा अगदी पिंपल्सची समस्या निर्माण झाली असेल, तर अशावेळी तुम्ही निश्चितच बेसन पीठाचे वेगवेगळे फेसपॅक करून चेहऱ्याला लावू शकता. हा एक घरगुती उपाय असल्याने तो त्वचेसाठी अतिशय सुरक्षित आहे. हिवाळ्यात देखील कोरड्या, रूक्ष त्वचेची समस्या सोडविण्यासाठी तुम्ही बेसन पीठाचा वापर करू शकतां. बेसन पीठ हे आपल्या त्वचेसाठी सर्वोत्तम नैसर्गिक स्क्रबर (natural scrub)आहे. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक्सफोलिएटिंग गुणधर्म आहेत. बेसन पीठाचा त्वचेसाठी वापर करताना फक्त त्याच्यासोबत काय वापरायचं, हे लक्षात आलं पाहिजे. तेवढं जमलं आणि त्याचं प्रमाण परफेक्ट झालं, तर बेसन पीठाइतकी बेस्ट घरगुती beauty treatment नाही.
असे तयार करा बेसन पीठाचे वेगवेगळे फेसपॅक...
१. बेसन पीठ, हळद आणि दूध (besan and milk)
उन्हात खूप फिरणं झाल्यामुळे त्वचा काळवंडली असेल म्हणजेच टॅनिंग झालं असेल तर हा उपाय अतिशय चांगला आहे. हिवाळ्यातही थंडीमुळे त्वचा अनेकदा काळी पडते. त्यामुळे हा उपाय अशा काळवंडलेल्या त्वचेसाठी खूप चांगला ठरतो. यासाठी दोन टेबलस्पून बेसन पीठ एका बाऊलमध्ये घ्या. त्यात एक टी स्पून हळद आणि तीन टेबलस्पून दूध टाका. हे पीठ आपल्याला चेहऱ्याला लावायचे आहे, त्यामुळे ते थोडे सैलसर असावे. घट्ट वाटले तर त्यात थोडे दूध टाका. चेहरा थोडा ओलसर करा. त्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्वचा उजळेल.
२. बेसन आणि गुलाबजल (besan and rose water)
त्वचा खरखरीत आणि निस्तेज दिसत असेल, तर त्वचेचं स्क्रबिंग होणं गरजेचं असते. बेसनपीठ हे खूप चांगलं नैसर्गिक स्क्रबर आहे. त्यामुळे हा फेसपॅक चेहऱ्याला निश्चितच लावून पहा. यामुळे त्वचा मऊ, मुलायम होईल आणि अवघ्या काही मिनिटांतच तुम्ही त्वचेतला फरक जाणवू शकाल. हा उपाय करण्यासाठी दोन टेबल स्पून बेसनपीठ घ्या. यामध्ये दोन टेबलस्पून गुलाबजल टाका. आधी चेहरा थोडा ओला करा आणि त्यानंतर या फेसपॅकने चेहऱ्याला हळूवार हाताने मसाज करा. १० ते १५ मिनिटे फेसपॅक चेहऱ्यावर राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
३. बेसन, दही आणि लिंबू (besan, curd and lemon)
त्वचा निस्तेज झाली असेल, चेहरा डल वाटत असेल, तर हा उपाय करून बघा. हा उपाय करण्यासाठी दोन टेबलस्पून बेसन एका वाटीत घ्या. त्यामध्ये दोन टेबलस्पून दही आणि चिमुटभर हळद टाका. तसेच मध्यम आकाराचे एक लिंबू यामध्ये पिळा. हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. चेहऱ्यावरचा थकवा, डलनेस घालविण्यासाठी हा उपाय अतिशय उत्तम आहे. लिंबू आणि दही या दोन्हींमध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हा उपाय केल्यास त्वचा टवटवीत होते. तसेच skin tightning साठी देखील हा उपाय उत्तम मानला जातो.