आपली त्वचा टीव्हीवरील आणि चित्रपटातील अत्रिनेत्रींप्रमाणे चमकदार हवी असे प्रत्येक महिलेला वाटत असते. पण काही ना काही कारणाने चेहऱ्यावर येणारे फोड, त्वचेचा कोरडेपणा, डाग, खड्डे यांमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते (Beauty Tips). त्वचा सतेज होण्यासाठी अनेक गोष्टी अवलंबून असतात. आपल्या त्वचेचा पोत, आपला आहार, व्यायाम, आपण त्वचेला लावत असलेली उत्पादने, आपल्याला असणारा मानसिक, शारीरिक ताण, प्रदूषण या गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. चेहरा उजळ करण्यासाठी (Skin care Tips) आपण कधी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतो तर कधी घरच्या घरी काही उपाय करुन चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करतो. पण डेली ब्यूटी रुटीनमध्ये (Beauty Routine) काही गोष्टींचा समावेश केल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. यामध्ये महागडी ब्यूटी प्रॉडक्टस (Beauty products) वापरण्यापेक्षा घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर केला तर ते फायद्याचे ठरते (Home remedy) . पाहूया रात्री झोपताना चेहऱ्याला कोणत्या गोष्टी लावल्यास सकाळी चेहरा ग्लो होण्यास मदत होते.
१. लिंबू आणि सायीचे फेसमास्क
क्रीम लावल्यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. लिंबात असणारे ब्लिच त्वचेतील तेल कमी करण्यास आणि त्वचेला चांगला टोन येण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी एका बाऊलमध्ये साय घेऊन त्यामध्ये लिंबू पिळावे. हे मिश्रण योग्य पद्धतीने एकत्र करुन ती पेस्ट रात्री झोपताना चेहऱ्याला सगळीकडे एकसारखी लावा. रात्रभर चेहरा तसाच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होऊन चेहरा उजळण्यास मदत होईल.
२. हळद आणि दूध
आहारात हळद आणि दुधाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्याला माहित आहे. त्याचप्रमाणे सौंदर्यासाठीही या दोन्ही गोष्टींचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्वचेचे टॅनिंग कमी करण्यासाठी कच्चे दूध अतिशय चांगले असते हे आपल्याला माहित आहे. तर हळदीमध्ये अँटीसेप्टीक गुण त्वचेसाठी उपयुक्त असतात. त्वचा उजळण्यासाठी दोन्ही घटक उपयुक्त असल्याने एक चमचा कच्च्या दुधात अर्धा चमचा हळद घालून हे मिश्रण मान आणि चेहऱ्याला लावावे. काही तास हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवून सकाळी चेहरा पाण्याने धुवावा.
३. ग्रीन टी आणि बटाट्याचा रस
ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चांगला असतो तसाच तो त्वचेसाठीही चांगला असतो. ग्रीन टी च्या बॅग अगदी सहज उपलब्ध होतात. ही एक बॅग एका पाण्यात उकळून त्या पाण्यात बटाट्याचा रस घालायचा. हे मिश्रण कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर एकसारखे लावायचे. सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा. बटाटा आणि ग्रीन टी मुळे चेहरा उजळण्यास मदत होते.