ऋतु कोणताही असला तरी आहारात फळं हवीच. हा नियम आता बरेचजण पाळायला लागले आहेत. आरोग्यासाठी लाभदायक असलेली हीच फळं सौंदर्य वाढवण्या कामीही खूप फायदेशीर असतात. फक्त त्यासाठी फळं खातांना ती फळं चेहेर्यासाठी कशी उपयोगी ठरतील याचा विचारही व्हायला हवा. फळांचा रस, गर त्यांची साल हे सौंदर्यवृध्दीसाठी घरगुती उपाय म्हणून वापरली जातात. पावसाळ्यात आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी कॉस्मेटिक्सच्या वाट्याला न जाता फळांचा उपाय करा , फरक नक्की दिसेल.
पावसाळ्यातले फ्रुटस फेस पॅक
छायाचित्र- गुगल
1 आलुबुखार- पिकलेलं आलुबुखार घेऊन त्याच्यातला गर काढावा. हा गर चांगला कुस्करुन घ्यावा.आता या गरात थोडं दही घालावं. ते मिसळून झालं की त्यात थोडी मुलतानी माती घालावी. जर स्क्रबर सारखं ते वापरायचं असेल तर या मिश्रणात थोडे ओटस बारीक करुन घालावेत. त्वचा सामान्य असो की तेलकट या दोन्ही प्रकारच्या त्वचेसाठी हा आलुबुखर फेसपॅक फायदेशीर ठरतो.
छायाचित्र- गुगल
2 . जांभुळ- जांभळातला गर कुस्करावा.या गरात जवाचं थोडं पीठ घालावं. त्यात थोडं गुलाब पाणी घालावं. आणि हे मिश्रण लेपासारखं चेहेर्यास लावावं. कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी हा लेप उत्तम काम करतो. चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्या असतील तर हा लेप लावल्यास या समस्या कमी होतात.
छायाचित्र- गुगल
3. डाळिंब:- चेहेर्यावर सुरकुत्या असतील तर त्या घालवण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचा फेस पॅक फायदेशीर आहे. यासाठी डाळिंबाचे दाणे वाटून त्याची पेस्ट करुन घ्यावी. त्यात कोकोआ पावडर घालावी. हा लेप 20 ते 25 मिनिटं चेहेर्यावर लावून ठेवावा. डाळिंबातील गुणधर्मामुळे चेहेर्यावरच्या सुरकुत्या कमी होतात आणि कोकोआ पावडरमुळे चेहेरा तजेलदार होतो.
छायाचित्र- गुगल
4. पेरु- चेहेर्यावरची त्वचा घट्ट करण्यासाठी पेरु हे उत्तम फळ आहे. पेरुचा लेप तयार करताना त्यात थोडं केळ आणि मध घालावं. या तिन्ही गोष्टी एकत्र करुन हा लेप चेहेर्यास लावावा. अर्ध्या तासानं चेहेरा धुवावा. या लेपामुळे चेहेरा एकदम फ्रेश दिसतो.
छायाचित्र- गुगल
5. पपई- त्वचा कोरडी असली की अनेक समस्या निर्माण होतात. कोरड्या त्वचेसाठी पपई प्रभावी ठरते. पिकलेल्या पपईचा गर घेऊन तो कुस्करावा. त्यात थोडं केळ कुस्करावं. आणि काकडीचा रस घालावा. यात थोडं मध टाकलं तर उत्तम. हे सर्व घटक नैसर्गिक मॉश्चरायझर म्हणून काम करतात. तसेच पपईमुळे त्वचा घट्ट होते. हा लेप चेहेर्यास लावून अर्धा तास ठेवावा. नंतर तो पाण्यानं धुवावा. या लेपामुळे त्वचा चांगली ओलसर होते.