नियमितपणे केळी खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. केळीमुळे चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. केळीचा सौंदर्यासाठीही उपयोग केला जातो. त्वचेप्रमाणेच केसांची काळजी घेण्यासाठीही केळी अतिशय उपयुक्त ठरते. पावसाळ्यात त्वचा जरा तेलकट होते. यामुळे पावसाळ्यात अनेक जणी चेहऱ्यावर फोडं येण्याच्या समस्येने हैराण असतात. केळीचा फेसपॅक हा या सगळ्या समस्यांवरचा उत्तम उपाय आहे. त्यामुळे घरच्या घरीच केळीच्या मदतीने या काही ब्यूटी ट्रिटमेंट्स नक्कीच करून बघा.
१. केळी आणि मध
एक मध्यम आकाराचे केळ कुस्करुन त्यामध्ये दोन टेबलस्पून मध घाला. हा फेसपॅक १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे त्वचा टवटवीत आणि तजेलदार होते. चेहऱ्यावरचे व्रण, मुरूमाचे डागही या उपायाने कमी होतात.
२. केळी, मध आणि लिंबू
हे त्वचेसाठी अत्यंत उत्तम मिश्रण आहे. लिंबू, मध आणि केळी एकत्र आल्याने त्वचेला ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. त्वचेतला ओलावा टिकून राहतो आणि मुरूमांची समस्या कमी होत जाते. १५ ते २० मिनिटे हा पॅक चेहऱ्यावर ठेवावा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाकावा.
केसांसाठीही केळ उपयुक्त
१. कोरड्या आणि निस्तेज केसांसाठीही केळीचा फेसपॅक अतिशय उपयुक्त ठरते. केसांसाठी केळीचा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन केळी स्मॅश करून घ्या. त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि दोन चमचे दही टाका. हे मिश्रण केसांवर अर्धातास ठेवावे. त्यानंतर केस धुवून टाकावेत. केस चमकदार होतील.
केळीचा असाही होतो उपयोग
- दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळीची सालं गुणकारी ठरतात. केळीची सालं दररोज एखादा मिनिट दातांवर घासल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.
- चटका बसला असल्यास त्या जागेवर केळी लावा. त्यामुळे आग थांबते आणि थंडावा मिळतो.