जेवणात तोंडी लावायला काकडीची कोशिंबीर असली की बहुतांश मंडळी खूश होऊन जातात. काकडीच्या गोल गोल कापलेल्या चकत्या किंवा उभ्या कापलेल्या लांबलचक फोडी आणि त्यावर टाकलेले मीठ किंवा चाट मसाला, असा बेत तर उन्हाळ्यात अगदी कधीही चालू शकतो. शरीराला थंडावा देण्याचे काम तर काकडी करतेच पण त्यासोबतच ती खूपच आरोग्यदायी असून त्वचेचीही पुरेपूर काळजी घेणारी आहे.
काकडीची सालं का काढू नयेत ?- काकडीच्या सालांमध्ये खूप पौष्टिक घटक असतात. त्यामुळे काकडी ही सालासकटच खाल्ली पाहिजे. काकडी जर सालासकट खाल्ली तर बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते. सालासकट काकडी खाल्ल्यावर चयापचय क्रिया देखील चांगली होते. त्यामुळे नेहमी सालासकट काकडी खाण्यास प्राधान्य द्यावे.
- काकडीच्या सालाखाली क्षार, खनिजे आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. जेव्हा आपण काकडी सोलतो तेव्हा क्षार आणि जीवनसत्त्वे सालीसकट निघून जातात.
काकडीबाबत हे देखील जाणून घ्या...काकडी थंड असते. त्यामुळे हिवाळ्यात, पावसाळ्यात खूप काकडी खाल्ली तर अनेक जणांना बाधू शकते. काकडीमुळे सर्दीही होऊ शकते. त्यामुळे या दोन ऋतूंमध्ये काकडी अगदी बेतानेच खावी. काकडी थंड असल्याने ती कधीच फ्रिजमध्ये ठेवून खाऊ नये. ताजी काकडी घ्यावी आणि ती लगेचच खावी. काकडी नेहमी सामान्य तापमानातच असायला हवी.
काकडीच्या सालांमधले ब्यूटी सिक्रेट
- काकडीमध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेवर अकाली येणाऱ्या सुरकुत्या काकडीमुळे रोखल्या जाऊ शकतात.
- काकडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिडदेखील मोठ्या प्रमाणात असते. त्वचेचे पोषण करण्यासाठी आणि त्वचेवर चमक आणण्यासाठी या दोन्ही गोष्टी खूप आवश्यक आहेत.
- काकडीची सालं थंड करून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांचा ताण कमी होतो. तसेच डोळ्यांच्या आसपासची त्वचाही तजेलदार होते. हा उपाय नियमित केल्यास डार्क सर्कल्स दिसणेही कमी होते.
- काकडीच्या सालांची पेस्ट करून ती चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळते. यासाठी १५ ते २० मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहू द्यावी. थोडी सुकत आली की थंड पाण्याने चेहरा धुवून टाकावा.
- त्वचा खूप कोरडी असेल तरीही काकडी फायदेशीर ठरते. यासाठी सालासकट काकडी किसा. काकडीच्या रसामध्ये तेवढेच दही टाका आणि हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटानंतर चेहरा धुवून टाका. चेहरा तजेलदार दिसू लागेल.
- काकडीच्या सालांची पेस्ट जर लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावली, तर उन्हामुळे रापलेली त्वचा उजळण्यास मदत होते.