मेनिक्युअर करायचं म्हटलं की ४०० ते ५०० रुपये खर्च करण्याची तुमची तयारी ठेवावीच लागते. त्यातही जर तुम्हाला आणखी स्पेशल असणारं ब्रायडल मेनिक्युअर (how to do manicure at home?) करायचं असेल तर मग हा खर्च जवळपास दुप्पट होताे. त्यामुळे खरं तर मेनिक्युअर करण्यासाठी एवढे पैसे घालवणं अनेक जणींना जिवावर येतं.. म्हणूनच तर ही सोपी पद्धत वापरा आणि घरच्याघरी करा ब्रायडल स्पेशल मेनिक्युअर.. ते ही फक्त ५० रूपयांत.
हे मेनिक्युअर करण्यासाठी तुम्हाला फक्त २० ते २५ मिनिट लागतील. त्यामुळे मेनिक्युअरसाठीचं सगळं सामान जवळ घेऊन बसा.. मस्तपैकी टीव्ही सुरू करा किंवा गाणी लावा आणि ते एन्जॉय करत बसल्या बसल्या मेनिक्युअर करून टाका. हीच पद्धत तुम्हाला पेडिक्युअर करण्यासाठीही वापरता येईल. या ब्यूटी टिप्स इन्स्टाग्रामच्या beautifulyoutips या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आल्या आहेत.
ब्रायडल मेनिक्युअर कसं करायचं..
स्टेप १
एका पसरट टबमध्ये गरम पाणी घ्या. त्यात १ टी स्पून लिंबाचा रस, १ टी स्पून बेकींग सोडा, १ टी स्पून मीठ आणि १ टेबलस्पून शाम्पू टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यात १० मिनिटे हात भिजू द्या. गरम पाण्यात असतानाच हात एकमेकांवर थोडे घासा, नखे घासा आणि हातांवरचा मळ स्वच्छ करण्याच प्रयत्न करा.
स्टेप २
या स्टेपसाठी आता एका बाऊलमध्ये २ टीस्पून कॉफी, २ टीस्पून साखर, १ टेबलस्पून लिंबाचा रस आणि १ टेबलस्पून मध हे सगळं मिश्रण एकत्र करा. १० मिनिटे हात पाण्यात भिजवून झाल्यानंतर या मिश्रणाने हातांना मसाज करा. ७ ते ८ मिनिटे हळूवारपणे मसाज करा. मिश्रण कोरडं झालं आहे, असं जाणवलं तर त्यात थोडं पाणी टाका. मसाज झाल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्या.
स्टेप ३
ही आता सगळ्यात शेवटची स्टेप. यासाठी आपल्याला तुमचं नेहमीचं मॉईश्चरायझर २ टी स्पून, ॲलोव्हेरा जेल १ टीस्पून आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागणार आहे. हे सगळं मिश्रण एकत्र करा आणि हातांवर चोळा. या मॉईश्चरायझरने हातांना ५ ते ७ मिनिटे मसाज करा. मसाज झाल्यानंतर हात धुण्याची गरज नाही. आता अनुभवा तुमच्या हातांमध्ये झालेला बदल. आधीपेक्षा नक्कीच तुमचे हात अधिक स्वच्छ, सुंदर आणि मऊ झालेले दिसतील.