Join us  

Beauty Tips : चेहरा उजळ पण मान काळीकुट्ट? मानही दिसेल उजळ करा फ़क्त 4 उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2022 11:35 AM

Beauty Tips : चेहऱ्याची त्वचा ग्लोईंग दिसावी यासाठी आपण नेहमी काही ना काही करत असतो. पण मानेकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. मान एकदा काळी व्हायला लागली की कितीही घासली तरी तिचा काळेपणा कमी होत नाही, अशावेळी घरच्या घरी काही उपाय केल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो.

ठळक मुद्दे मानेचा नेहमीचा रंग पुन्हा आणण्यासाठी काय करावे आपल्याला कळत नाही. घरगुती उपायांनी ही समस्या दूर होऊ शकते.घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांनी मिळवा सौंदर्य...

सुंदर दिसण्यासाठी आपण चेहऱ्यावर नेहमी काही ना काही उपाय करत असतो. कधी चेहऱ्यावर डाग पडले म्हणून तर कधी चेहऱ्यावर पिंपल्स आणि फोड जास्त येतात म्हणून आपण घरगुती उपाय (Homr remide) करतो. त्यानेही फरक पडला नाही तर आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंटसही घेतो. केसांच्या बाबतीतही आपण तितकेच जागरुक असतो. पण हे सगळे करताना मानेकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे चेहरा कितीही सुंदर असला, केस चमकदार, लांबसडक असले आणि मान काळी असेल तर आपले सौंदर्य म्हणावे (Beauty Tips) कसे खुलत नाही. मान काळी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी त्वचेच्या तक्रारी, कधी सतत येणारा घाम किंवा अनावश्यक चरबीचे एकमेकांवर होणारे घर्षण यांमुळे मान काळी (Dark neck) होऊ शकते. आपली मान काळी झाल्याचे कळले की आपण आंघोळीच्या वेळी तिला घासतो. मात्र काहीही करुन ती पहिल्यासारखे व्हायचे नाव घेत नाही. अशावेळी मानेचा नेहमीचा रंग पुन्हा आणण्यासाठी काय करावे आपल्याला कळत नाही. घरगुती उपायांनी ही समस्या दूर होऊ शकते. पाहूया हे उपाय कोणते...

(Image : Google)

१. पपई, दही आणि गुलाब पाणी 

कच्च्या पपईची पेस्ट तयार करा. त्यामध्ये चमचाभर दही आणि चमचाभर गुलाब पाणी घाला. ही पेस्ट व्यवस्थित एकजीव करुन ती बोटाने मानेच्या काळ्या भागावर एकसारखी लावा. १५ मिनीटे तसेच ठेवून नंतर हाताने चोळून मान स्वच्छ धुवा. या पेस्टमुळे मानेचा काळेपणा दूर होण्यास मदत होईल.

२. हळद, दूध आणि बेसन

त्वचेचा रंग उजळण्यासाठी आपण हा पारंपरिक फेसपॅक नेहमी वापरतो. बेसन पीठ दोन चमचे, अर्धा चमचा हळद आणि कच्चे दूध एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करावी. हे मिश्रण मानेला लावून ते पूर्ण वाळू द्यावे. त्यानंतर स्क्रबसारखे चोळून मानेला घासून हे मिश्रण काढून टाकावे. मानेची त्वचा कोरडी झाली असल्यास या पेस्टमध्ये साय घालावी. यामुळे त्वचा मॉईश्चराईज होण्यास मदत होईल. 

३. बटाटा, तांदळाचे पीठ आणि गुलाब पाणी

घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून आपण सौंदर्य खुलवू शकतो. दोन चमचे तांदळाच्या पीठात बटाट्याचा रस एकत्र करा. याची पेस्ट होण्यासाठी त्यात एक चमचा गुलाब पाणी घाला. ही पेस्ट मानेच्या काळ्या भागावर १५ ते २० मिनीटे लावून ठेवा. त्यानंतर मान धुवून टाका. यामुळे मानेचा काळेपणा दूर होण्यास मदत होईल. 

(Image : Google)

४. मध आणि लिंबू

एक चमचा लिंबाचा रस आणि तितकाच मध एकत्र करा. हलक्या हाताने ही पेस्ट मानेवर लावा. यामुळे काळेपणा दूर व्हायला तर मदत होईलच पण मानेवरील सुरकुत्या कमी होण्यासही मदत होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी