सध्या लग्न सराई सुरु आहे. लग्नाला जायला कसाबसा वेळ मिळतो किंवा काढता येतो. पण लग्न समारंभासाठी म्हणून चेहर्यावर जे तेज हवं असतं , चमक हवी असते ती पार्लर गेल्याशिवाय कशी मिळेल? धावपळीत पार्लरला जायला तर वेळच नाही.
लग्नसमरंभासाठी तयार होताना आधी ब्यूटी पार्लरमधे जाऊन फेशियल करणं ही महिलांसाठी आवश्यक बाब असते. पण वेळेअभावी फेशियल करायला जमलं नाही म्हणून हिरमुसून जाण्याचं किंवा लग्नाला जाण्याचा प्लॅन रद्द करण्याची अजिबात गरज नाही. भलेही आपण ब्यूटी पार्लरमधे जाऊन फेशिअल करु शकत नसलो तरी घरच्या घरी मिनी फेशिअल मात्र करता येतंच. मिनी फेशिअल करुनही चेहरा छान ताजा टवटवीत आणि चमकदार दिसू शकतो. कोणी चेहरा पाहून घरीच मिनी फेशिअल केलं हे ओळखणार तर नाहीच पण यावेळेस तू कोणतं फेशिअल केलं? असा प्रश्न मात्र नक्कीच विचारतील.
फेशिअल करणं म्हणजे त्वचेला आंजारणं, गोंजारणं. त्वचेचे लाड पुरवणे. थोडं शांत बसून त्वचेची काळजी घेणं होय. 4 स्टेप्सचं मिनी फेशिअल करतानाही त्वचेचे हेच लाड आपल्याला सहज पुरवता येतात. अर्थात लाड पुरवले की कोणीही आनंदी होणारच. मग मिनी फेशिअलद्वारे त्वचेचे लाड पुरवले की चेहरा प्रसन्न दिसणारच.
4 स्टेप्सचं मिनी फेशिअल कसं करणार?
Image: Google
1. क्लीन्जिंग:- फेशिअल करण्याची पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे क्लीन्जिंग करुन त्वचेवरची घाण काढून टाकून त्वचा स्वच्छ करणे. घरच्याघरी क्लीन्जिंग करताना चेहरा ऑइल क्लींजरने स्वच्छ करावा. ऑइल क्लींजर म्हणून खोबर्याचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल वापरता येतं. यामुळे चेहर्यावर आधी लावलेले क्रीम्स लोशन्सचा अंश निघून जातो. ऑइल क्लीन्जिंगनंतर रेग्युलर क्लींजर वापरुन चेहरा स्वच्छ करावा. या प्रकारच्या क्लीन्जिंगनं त्वचा खोलवर स्वच्छ होते.
Image: Google
2. टोनिंग:- मिनी फेशिअलची दुसरी स्टेप म्हणजे टोनिंग. यासाठी आपण नेहमी वापरतो ते टोनर वापरलं तरी चालतं. जर घरात टोनर नसेल तर टोनर म्हणून गुलाब पाण्याचाही उपयोग करता येतो. टोनिंग करताना चेहर्यावर गुलाब पाणी स्प्रे करावं किंवा कापसाच्या बोळ्यानं लावावं. गुलाब पाणी लावून झाल्यानंतर थोडा वेळ थांबावं. टोनर/ गुलाब पाणी त्वचेत झिरपू द्यावं.
Image: Google
3. स्टीमिंग:- त्वचेवरची रंध्रं मोकळी झाली तरच त्वचेची काळजी घेण्यासाठी जेही आपण चेहर्याला लावू ते त्वचेत खोलवर जाईल. यासाठीच वाफ घेणे म्हणजेच स्टीमिंग ही स्टेप महत्वाची आहे. वाफ घेतल्याने त्वचेला आराम मिळतो, त्वचेत ओलावा निर्माण होतो. वाफ घेतल्यानं तेलकट त्वचा असल्यास किंवा चेहर्यावर मुरुम पुटकुळ्या असल्यास फायदा होतो.
वाफ घेण्यासाठी एका खोलगट पातेल्यात पाणी उकळावं. पाणी उकळलं की पातेलं गॅसवरुन खाली उतरवावं. पातेल्याच्या मधोमध आपला चेहरा ठेवावा. गरम पाणी आणि चेहरा यात सुरक्षित अंतर असावं. डोक्यावरुन रुमाल घेत चेहरा झाकून चेहर्यावर वाफ घ्यावी.
Image: Google
4. एक्सफोलिएशन:- फेशिअलमधे एक्सफोलिएशन ही स्टेप गरजेची असते. त्वचा स्वस्च्छ करण्यासाठी, चेहर्यावरील मृत पेशी, मृत त्वचा निघून जाण्यासाठी, त्वचा मऊ मुलायम होण्यासाठी एक्सफोलिएशन करणं गरजेचं आहे. मिनी फेशिअलमधे घरच्याघरी एक्सफोलिएशन करताना ओट्सच्या स्क्रबचा उपयोग करावा. ओट्समधे त्वचेला आराम देणारे आणि दाहविरोधी गुणधर्म असतात.
ओट्सद्वारे स्क्रब करण्यासाठी एका वाडग्यात 2 मोठे चमचे ओट्स वाटून केलेलं पीठ आणि त्यात एक मोठा चमचा मध घालावं. यात एक मोठा चमचा कोमट पाणी घालून हे सर्व नीट एकत्र करुन घ्यावं. पेस्टसारखं घट्ट मिश्रण हवं. हे मिश्रण बोटांच्या सहाय्यानं पूर्ण चेहर्यावर गोलाकार मसाज करत लावावं. एक दोन मिनिटं मसाज करावा. नंतर चार पाच मिनिटं ते चेहर्यावर तसंच राहू द्यावं. शेवटी चेहरा सोसवेल इतक्याच गरम पाण्यानं धुवावा.
अशा प्रकारे घरच्याघरी 10 मिनिटात 4 स्टेप्सचं मिनी फेशिअल सहज करता येतं.