दिवाळीसाठी आवरलेलं घर बघताना, उजळलेल्या भिंती न्याहाळताना किती प्रसन्न वाटतं. पण आरशात चेहेरा बघितला की मन खंतावतं. दिवाळीसाठी झालेली धावपळ चेहेर्यावर थकवा म्हणून विराजमान झालेली असते. या थकव्यानं चेहेर्याचा रंग, नूर आणि तेज गिळलेलं बघून आता काय करावं असा प्रश्न पडतो. अनेकींना घर , ऑफिस यातून फुरसत काढून चेहेर्यासाठी पार्लरमधे जाऊन काही करावं इतका वेळ नसतो. रंग उडालेल्या चेहेर्यावर मेकअपच्या थरानं काहीच होणार नाही याचीही जाणीव असल्यानं चिडचिडायला होतं. थकव्यामुळे चेहेर्याचं गेलेलं तेज पार्लरमधे न जाताही परत आणता येतं. घरच्याघरी त्वचेचे लाड पुरवून, तिचं पोषण करुन दिवाळीच्या दिवशी प्रसन्न चेहेर्यानं वावरता येणं अवघड नाही. त्यासाठी घरच्याघरी फक्त 5 उपाय करावे लागतील.
Image: Google
चेहेर्याचं तेज वाढवणारे सोपे उपाय
1. चेहेर्याच्या त्वचेवर जमा झालेली धूळ, माती साफ करण्यासाठी फ्रिजमधल्या टमाट्याची मदत होते. यासाठी कच्च्या टमाट्याचा रस काढावा. चेहेरा आधी धुवून रुमालानं टिपून घ्यावा. टमाट्याचा रस चेहेर्याला लावावा. 20 मिनिटांनी थोडा टमाट्याचा रस किंवा थोडं पाणी घेऊन चेहेर्याला हलक्या हातानं पाच दहा मिनिटं मसाज करावा. मसाज केल्यानंतर चेहेरा पाण्यानं धुवून रुमालानं टिपून घ्यावा. नंतर चेहेर्याला मॉश्चरायझर लावावं.
2. खोबर्याच्या तेलानं चेहेर्याला मसाज केल्यानंही चेहेर्याचा रंग खुलतो. आंघोळीच्या एक तास आधी थोडंसं खोबर्याचं तेल घ्यावं. ते कोमट करावं. त्या तेलानं किंवा तेलात थोडं गुलाब पाणी घालून या मिश्रणानं चेहेर्याला हलक्या हातानं मसाज करावा. पाच दहा मिनिटं हलका मसाज केल्यानंतर तासाभरानं आंघोळ करुन चेहेरा धुवावा. यामुळे चेहेरा उजळतो आणि त्वचेचं पोषणही होतं.
Image: Google
3. चेहेर्याची त्वचा चमकदार करण्यासाठी दह्याचा उपयोग करता येतो. यासाठी थोडं दही घ्यावं. चेहेर्यावर हलका मसाज करत ते लावावं. मसाज केल्यानंतर अर्धा पाऊण तासानं चेहेरा कोमट पाण्यानं स्वच्छ करावा. दह्यानं मसाज केल्यानं त्वचा स्वच्छ होते. चेहेर्याच्या त्वचेतला ओलसरपणा वाढतो आणि चेहेरा चमकायला लागतो.
4. घरात कोरफड असली तर कोरफडच्या पातीतला गर घ्यावा किंवा बाजारात मिळणारं कोरफड जेल घ्यावं. ते चेहेर्याला लावावं. पंधरा मिनिटं ते चेहेर्यावर तसंच राहू द्यावं. पंधरा मिनिटांनी पुन्हा हातात थोडं कोरफड जेल घेऊन बोटं चेहेर्यावर गोल फिरवत पाच मिनिटं मसाज करावा. मसाज केला की, चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
5. लिंबाच्या रसानंही चेहेर्यावरचा उडालेला रंग परत आणता येतो. यासाठी दोन चमचे लिंबाचा रस घ्यावा. हा रस चेहेर्याला लावावा. अर्ध्या तासानं चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. लिंबाच्या रसामुळे त्वचेवर जमा झालेली घाण स्वच्छ होते आणि चेहेरा चमकतो.
चेहेर्यावरचा हरवलेला नूर परत आणणं बघितलं किती सोपं आहे. लगेच कामाला लागा.