महिनाभर चेहेरा चांगला ठेवायचा तर पार्लरमधे जाऊन फेशियल करणं बायकांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. त्यात जर काही लग्न समारंभ असतील, वाढदिवसासारखे काही विशेष प्रसंग असतील तर मग साधंसुधं फेशियल कसं चालेल? गोल्डन फेशिअल करावसं वाटतं. त्याचा इफेक्ट चेहेर्यावर वेगळाच ग्लो आणतो. पण हा इफेक्ट टिकतो महिनाभर. पुन्हा फेशियल करणं आलंच. पण सारखं महा गडं गोल्ड फेशियल करणं परवडणार आहे का? पार्लरमधलं गोल्ड फेशियल भलेही नेहेमी करणं परवडणार नाही. पण घरच्याघरी गोल्ड फेशियल करता येतं असं म्हटलं तर आणि तेही अगदी कमी खर्चात.
छायाचित्र : गुगल
कसं शक्य आहे?
चंदन पावडर-हळद-मध -गुलाबपाणी हे तर प्रत्येकीच्याच घरात सहज उपलब्ध असेल. बसं मग घरच्याघरी गोल्ड फेशियल करणं काय अवघड आहे?चंदन आणि हळद यामधे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. हळद ही गुणानं गरम असते आणि चंदन पावडर ही थंड असते. हे दोन्ही घटक त्वचेसाठी उत्तम काम करतात. त्वचा उजळवण्याचं आणि त्वचेवर तेज आणण्याचं काम चंदन पावडर आणि हळद करते. घरच्या घरी गोल्ड फेशियल करताना हे दोन घटक अत्यंत गरजेचे असतात. हे दोन एकत्र करुन जर त्वचेवर लावले तर त्वचेच्या अनेक समस्या काही दिवसात पूर्णपणे निघून जातात. चेहेर्यावर तेज येतं. त्वचेवर हळद आणि चंदनाचा इफेक्ट जाणवण्यासाठी एक आठवडा पुरेसा आहे. आणि एका आठवड्यातही फक्त चार दिवस हे गोल्ड फेशियल करावं लागतं.
छायाचित्र : गुगल
कसं करतात हे गोल्ड फेशियल?
घरच्याघरी गोल्ड फेशियल करण्यासाठी 2 चमचे चंदन पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा मध आणि गुलाबपाणी या चारच गोष्टी लागतात.या चारही गोष्टी एकत्र करुन त्याचा दाटसर लेप तयार करावा. लेप पातळ असू नये. लेप तयार झाला की तो चेहेर्यावर लावण्याधी चेहेरा फेसवॉशनं स्वच्छ करावा. चेहेरा रुमालानं टिपून घ्यावा. मग चेहेर्यावर गुलाब पाणी लावावं.
आता तयार करुन ठेवलेला लेप गुलाबपाण्यानं ओल्या चेहेर्यावर लावावा. लेप लावताना बोटं गोल गोल फिरवत मसाज करत लावावा. दहा मिनिटं हा मसाज करावा. गरज वाटल्यास मधून मधून गुलाबपाणी चेहेर्यावर स्प्रे करावं.
चेहेर्यावर मसाज केल्यानंतर हा लेप चेहेर्यावर दहा ते पंधरा मिनिट तसाच ठेवावा. चेहेर्यावरचा लेप सुकायला लागला की पाण्यानं चेहेरा स्वच्छ धुवावा. चेहेरा धुतल्यानंतर चेहेर्यावर पुन्हा गुलाबपाणी स्प्रे करावं किंवा हातानं किंवा कापसानं लावावं. चेहेर्यावर हळुवार हात फिरवत चेहेर्यावराचं गुलाब पाणी सुकलं की आधी मॉश्चरायझर लावावं. आणि मग आपण नेहेमी वापरतो ते क्रीम लावावं.
छायाचित्र : गुगल
वर सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा हा लेप चेहेर्याला लावल्यास चेहेर्यात लगेच फरक दिसून येईल. तसेच चेहेर्यावर जर मुरुम पुटकुळ्या, काळे डाग असतील तर ते निघून जाण्यासही हा लेप मदत करतो.त्वचेच्या समस्या जलद गतीनं सोडवण्यास हळद चंदनाचा हा लेप खूप उपयोगी आहे. तसेच त्वचा तरुण राखण्यासाठी नियमितपणे काही महिने हे घरच्याघरी गोल्ड फेशियल करावं.