त्वचा रूक्ष आणि निस्तेज झाली असेल, अकाली सुरकुत्या येत असतील किंवा मग चेहऱ्यावरचे मुरूम आणि व्रण अशा कोणत्याही समस्येने जर तुम्ही हैराण असाल, तर हा अफलातून उपाय करूनच पहा. या उपायाने तुमच्या या सगळ्या समस्या दूर तर होतीलच पण तुमची त्वचा नॅचरली ग्लो करू लागेल. त्वचेला चमकदार बनविणारा आणि आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे. तुमच्या त्वचेला दिवसेंदिवस अधिक तजेलदार आणि चमकदार बनविण्याची जादू शेंगदाण्यांमध्ये आहे. पण म्हणून घेतले शेंगदाणे आणि टाकले तोंडात असं करू नका. त्वचेला सुंदर बनविण्यासाठी शेंगदाणे खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती फॉलो करा.
शेंगदाणे कसे खावेत ?
बहुतेक घरांमध्ये रात्री बदाम आणि काळे मनुके भिजत घातले जातात. त्याचप्रमाणे रात्री झोपताना शेंगदाणे भिजत घालावेत. साधारणपणे आपल्या मुठीत जेवढे शेंगदाणे येतात, तेवढे शेंगदाणे दाेन जणांसाठी पुरेसे असतात. त्या हिशोबाने शेंगदाणे रात्री भिजत घाला आणि सकाळी अनायसेपोटी खा. अशा पद्धतीने शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले तर असतेच पण सौंदर्योपचार म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते.
भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे
शेंगदाणे पाण्यात भिजवल्यामुळे त्याच्यात तयार होणारे विशिष्ट फॅटी ॲसिड त्वचेसाठी अत्यंत पोषक असते. अशा शेंगदाण्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाणही खूप अधिक असते. याशिवाय मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, फायबर, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि झिंक हे घटकही भिजवलेल्या शेंगदाण्यातून मोठ्या प्रमाणावर मिळातात. या सगळ्या घटकांमुळे त्वचेवर चमक येते, वारंवार फोड येण्याचे प्रमाण कमी होते, अकाली सुरकुत्या येणे कमी होते आणि त्वचेचे नैसर्गिक पद्धतीने तसेच आतमधून पोषण होण्यास सुरूवात होते.
भिजवलेले शेंगदाणे आणि सौंदर्य
भिजवलेल्या शेंगदाण्यांमधून मिळणारे पोषण आपल्या त्वचेला ओलावा देते. त्वचेचे हाईड्रेशन संतूलित ठेवते. शेंगदाणे व्हिटॅमिन ई पुरविणारे असतात. त्यामुळे त्वचा कोरडी आणि रूक्ष होत नाही. त्वचेतील आर्द्रता टिकून राहिल्यामुळे ती टवटवीत तर दिसतेच पण अकाली सुरकुत्या येणेही बंद होते. तसेच शेंगदाणे त्वचेतून येणारे अतिरिक्त तेलही नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे ज्यांची स्किन ऑईली आहे, त्यांनाही या उपायामुळे लाभ होतो. स्किन टाईटनिंगसाठी भिजवलेले शेंगदाणे खाणे अतिशय उपयुक्त ठरते.