कच्चे दूध आपल्या त्वचेसाठी एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करत असते. त्यामुळे अगदी खूप जुन्या काळापासूनच दूधाचा उल्लेख सौंदर्य शास्त्रात झाल्याचे सांगितले जाते. कच्च्या दुधामध्ये व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. चेहऱ्यावरील डाग, फोड, मुरूम घालवून चेहरा उजळविण्यासाठी एक नैसर्गिक इलाज म्हणून कच्चे दूध वापरण्यात येते. नॅचरल मॉईश्चरायझर म्हणूनही दुधाचे महत्त्व आहे.
कच्च्या दुधाच्या मदतीने असे खुलवा सौंदर्य१. नॅचरल मॉईश्चरायझरकोरड्या त्वचेसाठी कच्चे दूध वरदान ठरते आणि मॉईश्चरायझरप्रमाणे काम करते. यासाठी कच्चे दुध एका कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने मालिश करा आणि त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय रोज केल्यास अवघ्या काही दिवसांतच त्वचेचा पोत सुधारल्यासारखा दिसेल. हा उपाय तुम्ही हात, पाय, मान, गळा, पाठ यांच्यावरही करू शकता.
२. नितळ त्वचेसाठी....दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड मोठ्या प्रमाणावर असते. कच्च्या दुधाने जर चेहऱ्याला १० ते १२ मिनिटे मालिश केली, तर त्वचेवरील डेड सेल्स निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्वचा नितळ दिसू लागते. दर दोन- तीन दिवसांतून एकदा हा उपाय नक्की करून पाहिला पाहिजे.
३. फोडांवर प्रभावी इलाजचेहऱ्यावर सतत येणाऱ्या फोडांमुळे परेशान असाल, तर कच्च्या दुधाचा उपाय नक्की करून पहा. त्वचा ऑईली असेल तर चेहऱ्यावर वारंवार फोड येतात. दूध ऑईल बॅलेन्सिंग एजंट म्हणून उत्तमप्रकारे काम करते. यासाठी कच्च्या दुधात चिमुटभर मीठ टाकून रात्री झोपण्याच्या आधी चेहऱ्याला मालिश करा आणि ५ ते १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. लवकर फरक दिसून येण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपचार करा.
४. ॲण्टीटॅनिंग एजंटदूध ॲण्टीटॅनिंग एजंट म्हणून काम करते. त्यामुळे जर खूप काळ उन्हात राहिल्याने त्वचा काळवंडली असेल, तर नक्कीच इतर कोणतेही महागडे ॲण्टी टॅनिंग क्रिम लावण्यापेक्षा दुधाचा वापर करून पहा. कच्चे दूध टॅनिंग झालेल्या भागावर चोळून लावा. काही मिनिटांसाठी मसाज करा आणि फरक अनुभवा. टॅनिंग दूर करण्यासाठी कच्च्या दुधात लिंबाचा रस आणि थोडा मध देखील टाकू शकता.
५. नॅचरल क्लिंजरत्वचेवर जमलेला मळ, धुळ काढून टाकण्यासाठी दूध नॅचरल क्लिंजर म्हणून काम करते. मेकअप उतरविण्यासाठीही दूधाचा वापर करण्यात येतो. यासाठी एका कापसाच्या बोळ्याने हळूवार हाताने चेहऱ्यावर दूध लावा आणि त्यानंतर ओल्या कापडाने किंवा ओल्या कापसाने चेहरा पुसून घ्या. चेहरा स्वच्छ तर होईलच पण चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलही निघून येईल.