एखाद्या कार्यक्रमाला किंवा सणसमारंभाला कोणते कपडे घालायचे, त्यावर दागिने काय घालायचे याबाबत आपण नेहमीच विचार करतो. इतकेच नाही त्या कपड्यांवर कशी हेअरस्टाईल चांगली दिसेल किंवा कोणत्या प्रसंगी कोणती लिपस्टीक लावल्यावर आपण उठून दिसू याचा आपण पूर्णपणे विचार करतो. पण कोणती टिकली लावायची याबाबत मात्र आपण म्हणावा तितका विचार करत नाही. पण टिकली हा आपले सौंदर्य खुलवण्यातील (Beauty Tips) एक महत्त्वाचा भाग असून ती कशी, कोणत्या रंगाची, कोणत्या आकाराची किंवा कशा डिझाईनची असावी याबाबत योग्य तो विचार व्हायला हवा. म्हणजे आपण आहोत त्यापेक्षा आणखी छान दिसू. पाहूयात टिकली निवडण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा (How to choose perfect Bindi) .
१. सर्वात महत्त्वाचे आपल्या चेहऱ्याचा आकार घेऊन त्यानुसार टिकलीची निवड करायला हवी. गोल चेहऱ्याला उभट टिकली, उभट चेहऱ्याला गोल टिकली, त्रिकोणी किंवा हार्ट शेप चेहऱ्याला कोणत्याही आकाराची टिकली छान दिसते. या गोष्टी लक्षात ठेऊन टिकलीची निवड करायला हवी.
२. टिकलीची निवड करताना आपला हेअरकट आणि हेअरस्टाईल यांचाही आवर्जून विचार करायला हवा. तुम्ही केस बांधणार असाल तर थोडी मोठ्या आकाराची टिकली लावू शकता पण मोकळे सोडणार असाल तर थोडी लहान आकाराची टिकली चांगली दिसेल. तुमचे केस कपाळावर येणार असतील तर नाजूक टिकलीमुळे तुमचे सौंदर्य खुलून यायला मदत होईल.
३. आपले डोळे आणि कपाळाचा भाग मोठा असेल तर आपल्याला थोडी मोठ्या आकाराची टिकली चांगली दिसेल. यामुळे चेहरा बॅलन्स व्हायला मदत होईल. यामध्येही आपण वेगवेगळे आकार आणि डिझाईन्स याचे प्रयोग करु शकता.
४. तसेच आपल्या कपड्यांप्रमाणे आणि मेकअपप्रमाणे आपण टिकलीची निवड करायला हवी. थोडा लाईट मेकअप असेल तर साधी नेहमीची काली किंवा मरुन रंगाची टिकली चांगली दिसेल. पण एखादा कार्यक्रम असेल तर कपड्यांना रंगीत किंवा थोडी डिझायनर टिकली चांगली दिसू शकेल.
५. खडा किंवा मोत्याची टिकली लावल्यावर आपल्याला जवळून चांगली दिसते. मात्र लांबून अशी टिकली दिसून येत नाही. त्यामुळे घरच्या घरी लहान कार्यक्रमासाठी अशी टिकली लावली तर चालते. पण मोठ्या कार्यक्रमात दूरवरच्या लोकांना ती दिसून येत नाही. तसेच फोटोतही अशी खड्याची टिकली उठून येत नसल्याने ती लावताना विचार करायला हवा.