थंडी सुरु झाली की त्वचेची, केसांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. या दिवसांत त्वचा जशी खरखरीत होते, तसेच हाल ओठांचेही होतात. ओठ कोरडे पडल्याने उलतात आणि मग काळवंडतात. अनेकदा तर वारंवार लिपबाम लावूनही उपयोग होत नाही. शिवाय काही जणींचे ओठ तर एवढे ड्राय होतात की काही खाताना- पिताना देखील ओठांना त्रास होतो. असा त्रास टाळायचा असेल आणि ओठ मऊ, मुलायम, गुलाबी करायचे असतील तर थंडीत तुमच्या ओठांसाठी घ्या हे ४ खास घरगुती उपाय...
१. रोज रात्री तुपाने मसाज (massage with ghee)
तूप हे आपल्या त्वचेसाठी, आरोग्यासाठी जसे चांगले आहे, तसेच ते ओठांसाठीही उत्तम आहे. राेज रात्री ओठ स्वच्छ धुवा. कोरडे करा. त्यानंतर बोटावर थोडेसे तूप घ्या आणि चांगल्या तुपाने ओठांना मसाज करा. एखादा मिनिट मसाज करून तूप ओठात जिरवण्यचा प्रयत्न करा. यानंतर सकाळी उठल्यावर ओठ ओले करा आणि एखाद्या मऊ कापडाने ओठ पुसून घ्या. यामुळे ओठांवरची डेड स्किन निघून जाईल आणि ओठ स्वच्छ होऊन गुलाबी होतील. ३ ते ४ दिवस सलग हा उपाय करावा.
२. ओठांना करा स्क्रब (scrub your lips)
ओठांचे काळवंडलेपण दूर करण्यासाठी त्याचं वेळोवेळी स्क्रबिंग करणं खूप गरजेचं आहे. ओठांना स्क्रब करण्यासाठी एक टीस्पून मध, एक टीस्पून पिठीसाखर आणि १ टीस्पून तूप हे साहित्य एकत्र करून कालवा. त्याने ओठांना मसाज करा. यामुळेही ओठांवरची डेड स्किन निघून जाईल आणि ओठांचं काळवंडलेपण दूर होईल.
३. भरपूर पाणी प्या (have plenty of water)
हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने आपण पाणी कमी प्रमाणात पितो. यामुळे त्वचेसोबतच ओठांचंही डिहायड्रेशन होतं आणि ते काळे पडून कोरडे, खरखरीत दिसायला लागतात. त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात प्या. यामुळेही ओठांचा रंग बदलण्यास सुरुवात होईल.
४ व्हिटॅमिन ई कॅप्सूल (vitamin e capsule)
त्वचा, केस यांचे आरोग्य सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल अतिशय उपयोगी ठरते, हे तर आपण जाणतोच. या कॅप्सूलचा उपयोग आता ओठांसाठीही करा. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील लिक्विड बोटावर घ्या आणि हलक्या हाताने ओठांना मसाज करा. यामुळे ओठांचा रंग निश्चितच बदलले. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास हरकत नाही.