बाळांतपण झाल्यानंतर बहुसंख्य महिलांना छळणारी गोष्ट म्हणजे स्ट्रेचमार्क. आपल्या पोटाला, मांड्यांना, स्तनांना पडलेले स्ट्रेचमार्क पाहून तर अनेक बायका मनोमन खूपच खट्टू होऊन जातात. साडी नेसताना, स्कर्ट घालताना किंवा शॉर्ट्स घालताना आपले हे स्ट्रेचमार्क कुणाला दिसणार तर नाही ना, अशी चिंताही अनेक जणींना कायम सतावत असते. या स्ट्रेचमार्ककवर उपाय काय करावा, हे देखील समजत नाही.
स्ट्रेचमार्क्स का पडतात?
गरोदरपणात त्वचा ताणली जाते. ही ताणलेली त्वचा जेव्हा पुन्हा मुळ रूपात येते तेव्हा त्वचेवर काही डाग राहतात. हे डाग म्हणजेच स्ट्रेचमार्क.
स्ट्रेच मार्क्स साधारणपणे त्वचेवर समांतर रेषांच्या पट्ट्यांसारखे असतात. या रेषांचा रंग, पोत आपल्या त्वचेच्या मूळ रंगापेक्षा वेगळा असतो. त्वचेमध्ये मजबूत आणि एकमेकांशी जोडलेले तंतू असतात, जे शरीराच्या वाढीसह ताणले जातात. जेव्हा अचानक वजन वाढते, तेव्हा त्वचेमध्ये खूप जास्त ताण येतो, ज्यामुळे हे तंतू तुटतात आणि त्याचा परिणाम स्ट्रेच मार्क्सच्या स्वरूपात दिसू लागतो. त्वचेखाली असलेल्या रक्तवाहिन्यांमुळे सुरुवातीला या स्ट्रेच मार्क्सला लाल किंवा जांभळा रंग असतो. रक्तवाहिन्या जशा लहान होत जातात, तसतसा स्ट्रेच मार्क्सचा रंग पांढरट दिसू लागतो.
असे घालवा स्ट्रेचमार्क-
१. अर्गन तेल
अर्गन तेलामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असते. आर्गन तेलाने त्वचेची मालिश केल्यास स्ट्रेचमार्क लक्षणीय प्रमाणात कमी होतात.
२. लिंबाचा रस
लिंबाचा रस त्याच्या नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्मांसाठी ओळखला जातो. लिंबाच्या रसाने स्ट्रेच मार्क्स खूपच फिकट होत जातात. ताज्या लिंबाचा रस तुमच्या स्ट्रेच मार्क्सवर चाेळून लावा. लवकरच फरक दिसेल.
३. अंडी
अंड्यांमध्ये असणारा पांढरा बलक त्वचेसाठी अतिशय पोषक असतो. त्वचेला घट्ट करण्याचे काम हा पदार्थ करतो. त्यामुळे अंड्याचा पांढरा बलक जर स्ट्रेचमार्क्सवर लावला तर तेथील त्वचाही टाईट होते.
४. बटाट्याचा रस
त्वचेचा रंग सुधारण्यास बटाट्यामध्ये असणारे स्टार्च खूप उपयुक्त ठरते. बटाट्याचा रस त्वचेला चोळून लावल्यास स्ट्रेच मार्क्स कमी होतात.
५. ऑलिव तेल
मॉईश्चरायझिंग गुणधर्म असलेल्या ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे त्याचा उपयोग त्वचेचा पोत सुधारण्यासाठी केला जातो. स्ट्रेच मार्क्सवर ऑलिव्ह ऑईलने नियमित मसाज केल्यास लवकरच स्ट्रेचमार्क अतिशय क्षीण होऊन जातात.
६. एरंडेल तेल
स्ट्रेच मार्क्स घालवण्याचा हा एक प्रभावी इलाज आहे. एरंडेल तेलाने स्ट्रेचमार्क असणाऱ्या भागाची १० ते १५ मिनिटे मालिश करा. यानंतर तो भाग सुती कापडाने झाकूण टाका. त्यानंतर हिटिंग पॅडने या जागेला शेक द्या. एखादा महिना जर नियमितपणे ही कृती केली, तर निश्चितच खूप चांगला फायदा होतो.
आहारात या पदार्थांचा समावेश करा
स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी आहारातून काही पदार्थ आपल्या पोटात जाणेही खूप गरजेचे आहे. म्हणूनच
कच्ची कोबी, किवी, खरबूज, मटार, काळी मिरी, ब्रोकोली, अननस, पालक, टोमॅटो, लिंबू, बदाम, भोपळा, पालक, एवोकॅडो, ब्रोकोली, पपई या पदार्थांचे सेवन वाढवावे.